मुंबईच्या ‘या’ रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक , जाणून घ्या लोकलचे वेळापत्रक

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

संपूर्ण मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य आणि हार्बर अशा तिन्हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे घराबाहेर पडल्यानंतर गैरसोय टाळायची असेल तर मुंबई लोकलचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

मुंबईकरांचा आज मेगाखोळंबा होणार आहे. आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर उपनगरीय रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे अनेक नियमित फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व उपनगरीय सेवा किमान 15 मिनिटे उशिराने सुरु असतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी शक्यतो पर्याय मार्गाचा वापर करावा आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मध्य रेल्वेचे वेळापत्रक काय?
माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.५६ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक
सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी जाणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

या ब्लॉक कालावधीत पनवेल -कुर्ला- पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर लाईनच्या प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील स्टेशन वरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *