राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती, विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे, अध्यापन सोडून करावी लागणारी प्रशासकीय कामे अशा विविध मुद्द्यांवर राज्यभरातील शिक्षक सामुहिक रजा घेऊन संपावर गेले आहेत. यावेळी रत्नागिरीत भरपावसात जिल्ह्यातील शिक्षकांनी बुधवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
संपूर्ण राज्यात शिक्षक संघटनांतर्फे राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले. शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे राज्यातील शालेय शिक्षणावर विपरित परिणाम होणार असल्याची शिक्षक संघटनांची भूमिका आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्णयांविरोधात प्राथमिक शिक्षकांची काही दिवसांपूर्वी पुण्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असलेले व्हॉट्सॲप समूह सोडणे, काळी फीत लावून काम करणे अशा प्रकारे विरोध दर्शवण्यात आला. त्यानंतर बुधवारी सामुहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
कमी पटाच्या शाळांवर तात्पुरत्या शिक्षकांची नियुक्ती, पुढे त्या शिक्षकालाही काढून टाकल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार आहे. शाळा सुरू होऊन तीन महिन्यांनंतरही कित्येक विद्यार्थी गणवेशाविना आहेत. मिळालेले गणवेश विद्यार्थ्यांच्या मापाचे नाहीत. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला बाके नाहीत, काही ठिकाणी पुस्तकेही पोहोचलेली नाहीत, शाळांच्या इमारतीची दुरवस्था आहे. शाळेत पोषण आहारात रोज वेगवेगळे पदार्थ द्यायला सांगून त्यासाठी आवश्यक अनुदान दिले जात नाही. शिक्षकांना शिकवायची इच्छा असताना कागदपत्रे तयार करणे, ऑनलाइन बैठका, सातत्याने माहिती पाठवणे, उपक्रम करण्यात वेळ जातो. त्यामुळे अध्यापनासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. अशा सर्व अडचणी सोडवून विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा, शिक्षकांना वेळ मिळण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांकडून आंदोलन करण्यात आले.