शिवसेना युबीटी (Shivsena) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून आपल्या राजकीय प्रचार दौऱ्याला सुरुवात करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांची पहिली निवडणूक प्रचारसभा होईल. त्यानंतर, राज्यभरात त्यांच्या 15 सभा घेतल्या जाणार असल्याची माहिती आहे. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यातील पहिल्या सभेची तारीख ठरली आहे. नरेंद्र मोदींचा (Narendra modi) महाराष्ट्र दौरा निश्चित झाला असून विधानसभा निवडणुकांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येत आहेत.
राज्यात 8 तारखेला महायुतीची पहिली मोठी सभा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निवडणुकंच्या प्रचार सभांचा नारळ फुटणार आहे. नरेंद्र मोदींनी त्यांच्या दौऱ्यात उत्तर महाराष्ट्राला 2 सभा दिल्या आहेत. त्यापैकी, नाशिकला एक आणि धुळ्याला एक सभा होईल, मोदींच्या या दोन्ही सभा रेकॉर्ड ब्रेक होतील, असे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले. नाशिकच्या ग्राउंडला तर मोदी ग्राउंड नाव दिले आहे, येथे लाखोंची सभा होईल, असेही महाजन यांनी सांगितले.
भाजपने केंद्रीयमंत्र्यांनाही महाराष्ट्राच्या प्रचारयंत्रणेत उतरवले आहे. त्यामुळे, भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेल्या केंद्रातील नेत्यांच्याही सभा होणार आहेत. त्यातच, नरेंद्र मोदी हेही महाराष्ट्रात जास्त वेळ देतील, नाशिकला अजिबात दुर्लक्ष केलं नाही. याशिवाय, धुळ्याला, नंदुरबारलाही जाणार आहेत. अहमदनगरसह 5 जिल्ह्यांत मोदींच्या सभांचं दौऱ्याचं नियोजन असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
चार दिवसात मोदींच्या 9 सभा होणार
नियोजित कार्यक्रमानुसार 8 नोव्हेंबरला धुळे, नाशिक, 9 नोव्हेंबर रोजी अकोला, चिमूर, 13 नोव्हेंबर रोजी सोलापूर, कोल्हापूर आणि 14 नोव्हेंबर रोजी संभाजी नगर, नवी मुंबई व मुंबई याठिकाणी मोदींच्या सभा होणार आहेत.
दिवाळीनंतर फटाके फोडू
आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, दिवाळीनंर नंतर फटाके फोडू, यामध्ये अडचणी काय, फटाके फोडायची आणि लावायची फार घाई करू नका.
महायुतीतील 2 उमेवाराबाबत निर्णय होईल
राज्यातील काही मतदारसंघात महायुतीचे 2 उमेदवार उभे करण्यात आले आहेत. याबाबतही महाजन यांनी भूमिका स्पष्ट केली. उमेदवारी अर्ज माघारी घेईपर्यंत निर्णय होतील, ताणतणाव आहे पण चर्चेअंती निर्णय होईल. सावजी साहेब आमचे नेते, मार्गदर्शक आहेत, मान सन्मान ठेवला जाईल. पक्षाने, हरिभाऊंना राज्यपाल म्हणून पाठविले की नाही , आता मला मार्गदर्शक करू नका, असे म्हणत मिश्कील टिपण्णीही त्यांनी केली. तसेच, आंदोलन आणि पक्षात त्यांचं मोठं योगदान आहे, त्यांना मोठं पद मिळेल.