आमच्यातले (उद्धव ठाकरेंसोबतचे) वाद, भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे. त्यामुळे एकत्र येणं, राहणं कठीण नाही, असं मोठं विधान मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे. मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या (Uddhav Thackeray) युतीवर भाष्य केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. (Shivsena UBT And MNS Alliance)
शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का?, असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना मुलाखतीमध्ये विचारला. यावर मराठी माणसाच्या अस्तित्वापुढं वाद भांडणं क्षुल्लक आहे. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहाणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही, असं राज ठाकरेंनी उत्तर दिलं. राज ठाकरेंच्या या विधानानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
भरत गोगावले काय म्हणाले?
राजकारणात आणि खेळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. राज ठाकरेंनी जे काही वक्तव्य केलं मला माहिती नाही. ते दोघे भाऊ आहेत. ते एकत्रित येणार असेल तर आमचं काही म्हणणं नाही. महाराष्ट्र हितासाठी आम्ही देखील सोबत होतो. शिवसेना कोणी हॅन्डल करायची हा त्या दोघा भावांचा विषय आहे, असं भरत गोगावले म्हणाले.
उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युती करण्यास तयार होणार नाही- संजय शिरसाट
राज ठाकरे यांनी जी भूमिका आज घेतलेली आहे, ती काही नवीन नाही. यापूर्वी त्यांनी अशी भूमिका घेतली होती, आणि त्यावेळी ते असे म्हणाले होते की, एका हाताने टाळी वाजत नाही, त्यांच्या मागच्या प्रस्तावाचे काय झाले, तोच अनुभव त्यांना याही वेळी येईल. पक्ष चालवताना किंवा एखादी संघटन चालवताना जो संयम असावा लागतो, जे धाडस असावा लागतो ते राज ठाकरे यांच्यामध्ये निश्चित आहे, परंतु त्याचा युतीमध्ये गेल्याने काय परिणाम होईल याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे. कारण उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या संघटनेमध्ये इतरांनी येणे उचित वाटत नाही. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. महाविकास आघाडीवरून काय झालं..? शरद पवारांनी त्यांचे जमले नाही.. काँग्रेस आणि त्यांचे जमले नाही.. आणि राज ठाकरे यांच्याशी तर जमणारच नाही. कारण राज ठाकरे यांना सर्व माहिती असल्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युती करण्यास तयार होणार नाही असे मला वाटते, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले.
ज ठाकरे यांना कधीही पक्ष सोडायचा नव्हता- संजय शिरसाट
उद्धव ठाकरे यांचा इगो, त्यामुळे हे कुटुंब विभक्त झाले आहे. राज ठाकरे यांना कधीही पक्ष सोडायचा नव्हता आणि त्यांनी तशी भाषा ही कधी केली नव्हती. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव दिला असेल तरी उद्धव ठाकरे स्वीकारणार नाही, कारण त्यांना वेगळं राहायचं आहे आणि एकटं राहायचंय आजचा प्रस्ताव राज ठाकरेंचा आहे, उद्धव ठाकरेंचा नाही. भविष्यातही उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबत जाणार नाही. त्यांची लाईन आणि विचार वेगळे झालेले आहेत. उद्धव ठाकरेंना आता शरद पवार काँग्रेस बाकी इतर काही घटक पक्ष त्यांच्यासोबत जाण्यास स्वारस्य आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.