शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा होणार बंद? लाडकी बहीण योजना ठरतय कारण?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट झाल्यानं अनेक योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. एक लाख कोटी रुपयांची तूट भरुन काढण्यासाठी शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा सह इतर योजना बंद करण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळं तिजोरीवर भार वाढला आहे. आगामी अर्थसंकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या विविध विभागनिहाय बैठकांमध्ये इतर योजना बंद करण्यासंदर्भात चाचपणी केली जाणार आहे. शिवभोजन थाळी बंद करु नका अशी मागणी छगन भुजबळ यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

शिवभोजन थाळी उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना सुरु करण्यात आली होती. त्यावेळी छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, दोन लाख कोटींहून अधिक तूट आहे. त्यामुळं एक लाख कोटींची तूट भरुन काढली तर गाडा सुरळीत चालू शकतो, असं अर्थमंत्र्यांचं म्हणनं आहे. यासंदर्भात विभागवार बैठका झालेल्या आहेत. शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधासह इतर योजना बंद होण्याची शक्यता आहे.

शिवभोजन थाळीचे दिवसाचे लाभार्थी 190000 आहेत. या योजनेसाठी वार्षिक खर्च 263 कोटी रुपये लागतात. त्यामुळं ही योजना बंद करावी का अशी चाचपणी सुरु आहे. आनंदाचा शिधा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरु करण्यात आली होती. दिवाळी, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलं होतं. आनंदाचा शिधा म्हणून चार वस्तू 100 रुपयात दिल्या जातात. बाजारात याची किंमत 500 रुपये इतकी आहे. त्यामुळं उरलेली रक्कम राज्य सरकार आपल्या अनुदानातून भरत होतं.

दोन्ही योजना बंद करण्याची वेळ येते की काय अशी चर्चा आहे. अर्थमंत्र्यांनी काही आढावा बैठका घेतलेल्या आहेत. त्यामध्ये दोन्ही योजना बंद करायच्या का अशी चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितेलं आहे. यापूर्वी शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजना बंद करावी का अशा चर्चा झाल्या होत्या तेव्हा विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. आता अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामुळं या योजना बंद करायच्या का अशा चर्चा सुरु आहेत.

लाडकी बहीण योजनेमुळं तिजोरीवर भर वाढलेला आहे. कंत्राटदारांचं 89 हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्यानं आंदोलन सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजने बाबत काय निर्णय होतो ते पाहावं लागेल.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *