ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटाचे ‘हे’ तीन खासदार शिंदेंच्या घरी जेवायला

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

शरद पवार यांनी दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थिती लावल्यावरुन सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ हा पुरस्कार देण्यात आला होता. शरद पवार यांची ही कृती ठाकरे गटाला प्रचंड झोंबली होती. यानंतर दिल्लीतील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिंदे गटाच्या नेत्यांकडून सातत्याने ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख केला जात आहे. त्या अनुषंगाने दिल्लीत सध्या महत्त्वाच्या घडामोडी सुरु आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांनी तातडीने दिल्लीत धाव घेतल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

आतापर्यंत दिल्लीत शरद पवार, रावसाहेब दानवे यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या घरी महाराष्ट्रातील खासदारांच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडत असते. यामध्ये काही वावगे नसले तरी सध्या शिंदे गटाकडून राबवण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय घडामोडीकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांच्या घरी नुकताच आयोजित करण्यात आलेला स्नेहभोजनाचा कार्यक्रम चर्चेत आहे. प्रतापराव जाधव यांनी या स्नेहभोजनाला महाराष्ट्रातील सर्व खासदारांना आमंत्रण दिले होते. ठाकरे गटातील आमदार या कार्यक्रमाला जाणार नाहीत, असे सांगितले जात होते. परंतु, ऐन कार्यक्रमाच्यावेळी ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर त्याठिकाणी पोहोचले होते. तर खासदार नागेश आष्टीकर यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि श्रीरंग बारणे हे दोघेजण उपस्थित होते. या स्नेहभोजनाच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गटाचे खासदार वारंवार एकत्र येताना दिसत आहेत.

इतकेच नव्हे तर एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनीही स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वितुष्टामुळे ठाकरे गटाच्या खासदारांनी या स्नेहभोजनाला जाण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील श्रीकांत शिंदे यांच्या घरी गेले होते. एवढेच नव्हे तर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या ज्या सत्कार सोहळ्यावरुन शरद पवार यांच्यावर जोरदार आगपाखड केली होती, त्या सोहळ्यालाही संजय दिना पाटील उपस्थित होते. संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेऊनही संजय दिना पाटील यांनी सत्कार सोहळ्याचे फोटो बिनधास्त सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कितीही टोकाची भूमिका घेतली असली तरी ठाकरे गटाचे खासदार दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्याशी आपले वैयक्तिक संबंध जपताना दिसत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे हे खासदार आता शिंदे गटात जाऊ शकतात, ही शक्यता बळावली आहे.

ठाकरेंचे दोन तृतीयांश खासदार शिंदेच्या संपर्कात, ऑपरेशन टायगर फत्ते?
शिंदे गटाकडून सध्या ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील नाराज नेत्यांना गळाला लावले जात आहे. मात्र, या ऑपरेशनच्यानिमित्ताने ठाकरे गटाचे काही खासदार शिंदेंच्या गळाला लागले आहेत का, अशी चर्चा रंगली आहे. पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाई टाळण्यासाठी दोन तृतीयांश खासदारांचा गट वेगळा होऊन बाहेर पडण्याची गरज आहे. ठाकरे गटाकडे एकूण नऊ खासदार आहेत. शिंदे गटाला यापैकी दोन तृतीयांश म्हणजे 6 खासदारांना सहीसलामत आपल्या गोटात आणण्याची गरज आहे. यापैकी अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहतील, असा अंदाज आहे. आतापर्यंत परभणीचे आमदार बंडू जाधव हे शिंदे गटाच्या गळाला लागत नसल्याची चर्चा होती. मात्र, ते प्रतापराव जाधव यांच्या घरी स्नेहभोजनाला गेल्याने आता संजय जाधव यांनाही शिंदे गटाशी जुळवून घेण्याचे ठरवले आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाने ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार गळाला लावण्यात यश मिळवल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात रंगली आहे. तसे घडल्यास हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूप मोठा धक्का असेल.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *