संशयाचं भूत डोक्यावर स्वार झालं की माणसाचा हैवान कधी होतो कळत नाही. त्या भरात एखाद्याचा जीव घ्यायलाही माणूस पुढेमागे बघत नाही. जाणारा जातो, पण मागे राहणाऱ्यांचं काय ? संशयाच्या राक्षसाने कुटुंब उद्ध्वस्त केल्याची भयानक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिची ह्त्या केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली. शहरातील पालेगाव रिसरातील एका रहिवासी संकुलात मंगळवारी हे हत्याकांड झालं असून त्या दांपत्याची एक वर्षांची मुलगी आईच्या मायेला हरपली. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण असून कुटुंबियांमध्ये, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी आरोपी पतीला अटक घेण्यासाठी पोलिसांची दोन पथक तैनात करण्यात आली असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
3 वर्षांतच संसार उद्ध्वस्त
मिळालेल्या माहितीनुसार, अबंरनाथच्या पालेगाव परिसरातील पार्श्व हिल्स सोसायटीत विकी लोंढे हा त्याची पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह रहात होता. विकी आणि त्याच्या बायकोचा अवश्य 3 वर्षांपूर्वीच प्रेमविवाह झाला. त्यांची मुलगी अवघी एका वर्षाचीच आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून विकी व त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद होत होते. मंगळवारी संध्याकाळी देखील त्यांच्यात असाच वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात विकी याने त्याच्या पत्नीवर चाकूने वार करत गळा चिरून तिची हत्या केली आणि घरातून पसार झाला.
रात्रीच्या सुमारास पोलिसांना या हत्याकांडाची माहिती मिळाली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. प्रथमदर्शनी चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आला आहे. तर आरोपी विकी लोंढे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथकं रवाना झाल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.