आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, महेश सावंत या हनुमानाच्या मंदिरात जाऊन महाआरती करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्याआधीच भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मंदिराला मिळालेल्या नोटीसीला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली आहे, अशी घोषणा केली.
विश्व हिंदू परिषद आणि आमचे सर्व बजरंग दलाचे पदाधिकारी हे केंद्राशी संपर्कात होते. मी आमच्या पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी आलो आहे. आम्ही जनरल मॅनेजर आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली. काल आमचं मंडळ रेल्वे अधिकाऱ्यांना भेटले होते. काल करण्यात आलेल्या नोटीसीवर आता स्टे ऑर्डर काढण्यात आली आहे. मंदिराच्या विषयांमध्ये राजकारणाविषयी मी काही बोलू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया मंगलप्रभात लोढा यांनी दिली. तसेच हनुमान मंदिरात नित्यपूजा आणि आरती सुरूच राहणार असे मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे. आता स्थगिती दिल्यानंतर आदित्य ठाकरे हनुमान मंदिरात जाऊन आज महाआरती करणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र त्याआधी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
किरीट सोमय्या काय म्हणाले?
वास्तविकरित्या ज्यावेळी आमच्या हे लक्षात आलं, त्यावेळी आम्ही रेल्वे प्रशासनासोबत बोललो. त्यानंतर काल मला रेल्वे प्रशासनाने सांगितलं की ही चुकून नोटीस गेली आहे. त्यामुळे मंदिर पाडण्याचा काही प्रश्नच नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले.
आम्ही उद्धव ठाकरेची सेना नाही- किरीट सोमय्या
उद्धव ठाकरेंची अवस्था अशी झालीय की विधानसभेत निवडणुकीत त्यांच्या बनवाबनवीला, व्होट जिहादला धर्म युद्धाने रोखलं आणि पराभूत झाले. त्यामुळे ते निराश होऊन पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा धरत स्टंटबाजी करत आहे. त्यामुळे ज्यांनी हनुमान चालिसा बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकलं, ते हिंदुत्वाची भाषणा करताय..त्यांना हनुमानाच्या चरणी जावे लागत आहे, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली. तसेच मी आज हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. आम्ही काय उद्धव ठाकरेची सेना नाहीय, ज्याने बापाचं नाव बुडवलं, असा घणाघात देखील किरीट सोमय्या यांनी केला.