लोकसभेनंतर राज्यातील विधानसभा निवडणूक मोठी चुरशीची आणि चर्चेची ठरलेली दिसून येत आहे. राज्यात गेल्या अडीच वर्षात दोन मोठे पक्ष फुटले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षांचं फुटलेल्या दोन गटांमुळे सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूंना अस्तित्व होतं. त्याचा काहीसा फटका लोकसभा निवडणूक निकालांमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांचा परिणाम विधानसभा निवडणूक निकालांवर होण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र, निकाल हाती येईपर्यंत उमेदवारांना आणि पक्षांना धाकधूक लागून राहिली आहे. पण एग्झिट पोलमधून मात्र चित्र वेगळंच दिसत असल्यामुळे निकालांबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अशातच फुटीनंतर पक्षांना सहानुभूती आणि नेत्यांची पळवापळवी यामुळे देखील चित्र काहीसं बदलेलं दिसेल. अशातच बारामती मतदारसंघ जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, तो महाविकास आघाडीला मिळणार की महायुतीला याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्या आहे. मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय? तो जाणून घेऊयात.
मतदारांचा कौल कोणाच्या बाजुने?
बारामतीतील पत्रकार म्हणाले, शरद पवारांची सांगता सभा लक्षात घेतल्यास आपल्याला हे दिसून येईल की शरद पवारांनी बारामतीतील मतदारांना युगेंद्र पवार यांना संधी देण्याचं आवाहन केलं होतं. युगेंद्र पवार देखील बारामतीचा चांगला विकास करू शकतील त्याचबरोबर ते उच्चशिक्षित आहेत. तरुण आहेत. संपूर्ण गोष्टीची त्याला जाण आहे. शेती विषयी कारखानदारी याबद्दलची त्यांना माहिती आहे. त्यांना तुम्ही संधी द्या आतापर्यंत तुम्ही मला तीस पर्यंत तीस वर्ष संधी दिली. त्यानंतर अजित पवारांना संधी दिली. आता योगेंद्र पवारांना पुढच्या काळात तुम्ही संधी द्यायला हवी. शरद पवारांच्या या आवाहनानंतर उलट अजित पवारांनी आपल्या सांगता सभेमध्ये मी विकासाचा मुद्दा घेऊन पुढे आलेलो आहे. मी विकास पुरुष आहे. मी काम करतो पुढच्या काळात देखील मी विकासावर भर देईल. त्यामुळे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा असं अजित पवारांनी आवाहन केलं होतं. त्यामुळे दोघं विकासाच्या मुद्द्यावर पुढे जात आहेत. वास्तविक शरद पवारांचे आणि अजित पवारांचे विचार जरी वेगळे असले तरी शरद पवारांना मानणारा गट आणि अजित पवारांना मानणारा गट हा बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे. आता हा नेमका तरुण आणि वयस्कर वयोगटातला मतदार कोणत्या उमेदवाराला संधी देईल हे सांगणं आता थोडं कठीण असलं तरी शहरांमध्ये अजित पवारांचा माप थोडं झुकतं आहे, असं दिसून येते मात्र ग्रामीण भागामध्ये युगेंद्र पवारांनी बाजी मारल्याचं दिसत आहे.
युगेंद्र पवार यांना संधी द्या; शरद पवारांचं वाक्य महत्त्वाचं
एक जमेची बाजू म्हणजे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कोणत्याही नेत्याने जाहीरपणे शरद पवारांवर बोलणं टाळलं. मात्र, दुसरीकडं शरद पवारांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर तोफ डागत त्यांना पाडा असं सांगितलं. शरद पवार यांनी पक्ष फुटीनंतर गेलेल्या गद्दारांना पाडायचं असं म्हटलं होतं. पण त्यांनी बारामतीतील सांगता सभेमध्ये अजित पवारांना पाडा असा कोणताही उल्लेख केला नव्हता. तर युगेंद्र पवार यांना संधी द्या असं म्हटलं. अजित पवारांनी देखील शरद पवारांवर टीका करणे टाळलं आपल्या सांगता सभेत त्यांनी फक्त आपल्या विकासाचे मुद्दे आणि आगामी काळात करायची काम यावर भर दिला त्यामुळे दोन्हीकडून एकमेकांवर टीका करणे टाळल्यामुळे मतदारांमध्ये नेमकं कोणाला संधी द्यायची याबाबत चर्चा सुरू झाली.
मात्र यावेळी बोलताना एका पत्रकाराने म्हटलं, इतर मतदारसंघांच्या तुलनेत बारामतीचा मतदार हा पूर्णपणे वेगळा आहे. जर मतदारांच्या समोर शरद पवारांनी म्हटलं असतं, अजित पवारांना पाडा तर त्याची उलट सहानुभूती अजित पवारांना मिळाली असती म्हणून ते अजित पवार यांच्यावर सांगता सभेत बोलले नसावेत असाही अंदाज यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.
शहरात अजित पवारांना तर ग्रामीण भागात युगेंद्र पवारांना मतदार साथ देतील
बारामती शहरात अजित पवारांना तर ग्रामीण भागात युगेंद्र पवारांना मतदार साथ देतील, अशा चर्चा आहे. तर सरतेशेवटी पुढे कोण जाईल याबाबत बोलताना पत्रकार म्हणाले, अजित पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर फळी होती. स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आहेत, मात्र दुसरीकडे युगेंद्र पवार यांच्याकडे अशी फळी नव्हती. लोकसभेनंतर युगेंद्र पवारांना ही जुळवाजुळव करण्यात थोडाफार यश मिळालं. ग्रामीण भागातील पाण्याचा मुद्दा युगेंद्र पवारांनी पुढं आणला, याच मुद्द्यावरून ग्रामीण भागात प्रचार सुरू होता, गेल्या 30-35 वर्षांमध्ये अजित पवारांकडे सत्ता असताना त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, यावर प्रामुख्याने भर दिला गेला, तर दुसरीकडे पाणी प्रश्नावरून बोलताना शरद पवारांनी म्हटलं होतं मी मुख्यमंत्री असताना पुरंदर उपसासारख्या सिंचन योजनांची मंजुरी दिली, पण त्यांचा विस्तार करणे अजित पवारांना जमलं नाही असं थेट म्हटलं होतं, हाच मुद्दा आणि पाणी प्रश्न हे घेऊन युगेंद्र पवार मतदारसंघात उतरलेत, यामुळे ग्रामीण भाग युगेंद्र पवारांना संधी देईल अशी शक्यता वाटते. महत्त्वाची गावे आहेत त्यांचं 60 टक्के मतदान हे युगेंद्र पवारांना जाऊ शकतं.
लोकसभेला सुप्रिया सुळे तर विधानसभेला अजित पवार असं वारंवार बोललं जातं, हे मतदारसंघात जाणवलं का याबाबत पत्रकार म्हणतात, मतदारसंघाचा कल अद्याप समजलेला नाही. काल दुपारपर्यंत मतदार कमी प्रमाणात दिसत होते, मात्र तीन नंतर मतदारांचा जो उत्साह वाढला त्यानुसार अजित पवारांकडे लोकांचा कल काही प्रमाणात दिसून येतो आहे, मात्र निकालांती आपल्याला सर्व चित्र स्पष्ट होईल. ग्रामीण भागात चांगलं मतदान झालेलं दिसून येते ग्रामीण भागात त्यामुळे थोडं गणित आणि समीकरण वेगळं दिसून येण्याची शक्यता आहे.
लोकसभेपेक्षा वेगळं चित्र दिसण्याची शक्यता
लोकसभेमध्ये मोठा जनसंपर्क असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध तसा राजकारणाचा जास्त अनुभव नसलेल्या सुनेत्रा पवार उभ्या होत्या, त्यावेळी मतदारांनी सुप्रिया सुळे यांना संधी दिली. त्याचप्रमाणे आता पहिल्यांदा निवडणूक लढणाऱ्या युगेंद्र पवार आणि आत्तापर्यंत राजकारणाचा चांगला अनुभव असलेले अजित पवार यांच्यात हा सामना झाला, त्यामुळे लोकसभेसारखं चित्र म्हणजेच ज्याला दांडगा अनुभव आहे त्याला संधी असा काहीसा प्रकार मतदारसंघांमध्ये दिसेल का? याबाबत बोलताना पत्रकार म्हणाले युगेंद्र पवार नवखे असले तरी त्यांच्या मागे शरद पवारांसारखी मोठी ताकद उभी आहे. ही त्यांच्या दृष्टीने मोठी जमेची बाजू आहे. मात्र अजित पवारांनी लोकसभेमध्ये झालेल्या चुकांची पुन्हा एकदा पुनरावृत्ती टाळून त्या गोष्टी न करता विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. जो सायलेंट वोटर आहे. तो लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र जो नवा मतदार आहे तो त्याचा कल अद्याप कोणालाच समजलेला नाहीये. आत्ताच्या स्थितीत अजित पवारांचं पारड काही सजड वाटत असलं तरी लोकसभेचा विचार करता बारामतीच्या मतदारांचा कौल अद्याप अस्पष्ट दिसत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागात योगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा आहे.
शरद पवारांनी नवं नेतृत्व म्हणून युगेंद्र पवारांना पुढे केलं, मात्र लोकसभेमध्ये सुनेत्रा पवारांचे नव नेतृत्व बारामतीकरांनी स्वीकारलं नाही, तसंच युगेंद्र पवारांच्या बाबतीत प्रथम दर्शनी तसं वाटत नाही बारामतीत सुरुवातीच्या काळात अजित पवार पुढे वाटत आहेत, परंतु हे शहरातच जाणवत आहे, ग्रामीण भागात युगेंद्र पवारांची हवा दिसते. सांगता सभेवेळी शरद पवार यांनी युगेंद्र पवारांना संधी द्या किंवा नवीन नेतृत्वाला पुढे जाऊ द्या, असं म्हटलं. त्यावेळी त्यांनी टीका करणे टाळालं. त्यावेळी त्यांच्या हावभावातून नवीन नेतृत्वाला संधी देण्याची आवाहन करण्यात आलं. मात्र निवडणुकीवेळी किंवा दोन गेल्या दोन दिवसांमध्ये अजित पवार चांगलेच कॉन्फिडंट दिसून आले. शहरात जरी अजित पवारांचे हवा दिसत असली तरी ग्रामीण भागातलं थोडं चित्र वेगळं आहे. ज्या भागात विकास झाला आहे. तो भाग अजित पवारांना पुन्हा एकदा संधी देईल. तर भाग यावेळी मतदान करताना नक्कीच विचार करून उमेदवाराला संधी देईल असे दिसून येते. लाडकी बहीण योजनेचा थोडा फरक शहरात दिसून येतोय त्यामुळे शहरातील जनता अजित पवारांना संधी देईल असे वाटते.