भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या राजीनामा दिला आहे. आरोग्याच्या कारणामुळे पद सोडत असल्याचे धनखड यांनी म्हटले आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात, ‘प्रकृतीला प्राधान्य देण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी संविधानाच्या कलम 67(अ) नुसार तात्काळ भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे’, असं म्हटलं आहे. धनखड यांच्यानंतर उपराष्ट्रपती कोण असेल आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडीची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊयात.
भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे त्यांच्यावर राज्यसभेचे कामकाज पार पाडण्याची आणि कायदे बनविण्याची जबाबदारी असते. जर काही कारणामुळे राष्ट्रपती पद रिक्त झाले तर उपराष्ट्रपती हे त्यांची जबाबदारी सांभाळतात. आता धनखड यांच्या जागी भाजपच्या एखाद्या अमुभवी चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
उपराष्ट्रपतींची निवड कशी होते?
उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करता. यात नामांकित सदस्यांचाही समावेश असतो. उपराष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी तो व्यक्ती भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्तीचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीला 15000 रुपयांचे डिपॉझिट भरावे लागते.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान कसे होते?
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही सभागृहांचे खासदार म्हणजेच राज्यसभेचे 245 खासदार आणि लोकसभेचे 543 खासदार भाग घेतात. यात राज्यसभेच्या 12 नामनिर्देशित खासदारांचाही समावेश असतो. हे खासदार पसंती क्रमानुसार मतदान करतात. मतदाराला प्राधान्य क्रमाने मतदान करावे लागते. मतपत्रिकेवर पहिल्या पसंतीला 1, दुसऱ्या पसंतीसाठी 2 असा क्रमांक लिहावा लागतो.
सोप्या पद्धतीने सांगायचे झाल्यास जर A, B आणि C हे 3 उमेदवार निवडणूक लढवत असतील, तर मतदाराला प्रत्येक नावासमोर त्यांची पहिली पसंती द्यावी लागते. मतदार A च्या समोर 2, B च्या समोर 3 आणि C च्या समोर 1 अशी पसंती देऊ शकतो.
मतमोजणी कशी होते ?
उपराष्ट्रपती निवडणुकीत विजयासाठी एक निश्चित आकडा गाठावा लागतो. सर्वात आधी मतदान करणाऱ्या सदस्यांची संख्या दोनने भागली जाते आणि नंतर त्यात 1 जोडला जातो. 720 खासदारांनी मतदान केले तर त्याला 2 ने भागले जाते. उत्तर 360 मिळेल, यात 1 जोडल्यानंतर 361 आकडा होईल जो निवडणूक जिंकण्यासाठी गाठावा लागतो.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीची मते मोजली जातात. जर यात एखाद्या उमेदवाराला 361 पेक्षा जास्त मते मिळाली तर त्याला विजयी घोषित केले जाते. मात्र कोणीही जिंकले नाही तर पुन्हा मतमोजणी केली जाते. दुसऱ्या वेळी सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराला वगळले जाते. त्यानंतर त्याची मते इतरांना वितरित केली जातात. त्यानंतर विजयी उमेदवाराची घोषणा केली जाते.