‘आवरा स्वत:ला, नाहीतर आजीसारखीच गत होईल’,कोणी दिली राहुल गांधींना धमकी ?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

अमेरिकेत राहुल गांधी यांनी शीखांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे शीख समाजातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. देशातही त्यामुळे खळबळ माजली आहे. याच दरम्यान, राहुल गांधींच्या विधानावर आक्षेप घेत  शिखांनी बुधवारी (11 सप्टेंबर) दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. या निदर्शनादरम्यान भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांनी राहुल गांधींना उघडपणे धमकी दिल्याचा आरोप आहे. काँग्रेसने या धमकीचा व्हिडिओ शेअर करत कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेसतर्फे तरविंदर सिंग मारवाह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येऊ शकते.

अमेरिकेतील एका कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी शिखांचा उल्लेख करताना भारतातील धार्मिक स्वातंत्र्यावर भाष्य केले होते. मात्र शीख समुदायाने या टिप्पणीवर आक्षेप घेत राजधानीत निदर्शने केली. जनपथ रोडवरील पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्याचेही प्रयत्न करण्यात आले. याच निदर्शनांमध्ये सहभागी असलेले भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांनी राहुल गांधींना उघडपणे धमकी दिली, त्यावर आता काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

काय म्हणाले होते तरविंदर सिंग ?

दिल्ली भाजपचे नेते आणि माजी आमदार तरविंदर सिंग मारवाह यांनी या आंदोलनादरम्यान राहुल गांधींना धमकी दिली होती. ‘ राहुल गांधी वेळीच सावध व्हा ( आवरा स्वत:ला), नाहीतर येत्या काळात तुमचीसुद्धा आजीसारखीच गत होईल ‘असा इशारा त्यांनी दिला. हा व्हिडीओ काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. तसेच पंतप्रधान मोदींना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे. ‘ भाजपचा हा नेता उघडपणे विरोधी पक्षनेत्याला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे, नरेंद्र मोदीजी, तुमच्या पक्षाच्या या नेत्याच्या धमकीवर तुम्ही गप्प बसू शकत नाही’, अशी पोस्ट करत काँग्रेसने कारवाईची मागणी केली.

हे प्रकरण गंभीर

‘ हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. तुमच्या पक्षाच्या द्वेषाच्या फॅक्टरीचं हे प्रॉडक्ट आहे. या विरोधात कारवाई झालीच पाहिजे’, असेही पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय त्यांनी अमित शहा आणि जेपी नड्डा यांनाही पोस्टमध्ये टॅग केले. या धमकीवर तुम्ही गप्प बसू शकत नाही, असे सुप्रिया श्रीनेत यांनी लिहिले आहे. हे आम्ही कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला आहे. एका शीख व्यक्तीने भारतात पगडी अथवा कडे घालावे की नाही. एक शीख म्हणून ती व्यक्ती गुरुद्वारात जाऊ शकते की नाही. यासाठी लढाई आहे आणि ही केवळ त्यांच्यासाठीच नाही तर सर्व धर्मांसाठी आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले होते.

पहा व्हिडीओ:


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *