पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. तर पंपावर दुचाकीमध्ये सीएनजी भरत असताना गॅसचे नोझल निघून मोठा अपघात झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुचाकीमध्ये सीएनजी गॅस भरत असताना नोझल उडून तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याला धडकल्याने त्याच्या एका डोळ्याला गंभीर दुखापत झाली.
सदर घटना पुण्यातील तीन हत्ती चौकातील सीएनजी पम्पावर घडली.हर्षद गणेश गेहलोत असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पंप मालक यांच्याविरुद्ध सहकार नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, हर्षद गणेश गेहलोत (रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी)हा एस स्वेअर सीएनजी पंपावर कार्यरत आहे. तो बाईक्स , गाड्यांमध्ये सीएनजी भरण्याचे काम करतो. रविवारी संध्याकाळी तो पंपावर ड्य़ुटीवर होता. समोर उभ्या असलेल्या एका बाईकमध्ये तो सीएनजी भरत होता. त्याने त्याचा पाईप बाईकवर ठेवला आणि बटन ऑन करण्यासाठी तो गेला.
मात्र तेवढ्यात त्या गॅसचे नोझल अचानक सुटलं आणि ते जोरात येऊन हर्षदच्या डोळ्यावर आदळले. त्याचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूचे लोक घाबरले आणि सैरावैरा पळू लागले. तर नोझल डोळ्याला लागल्याने गंभीर जखमी झालेला हर्षद धाडकन खालीच कोसळला.त्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली, हर्षदला उपचारांसाठी तातडीने डॉक्टरांकडे नेलं. मात्र त्याच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.