सध्या राज्यातील काही भागात पावसाचा (Rain) जोर कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात तुरळक पाऊस हजेरी लावत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहिले आहेत. काही भागातील धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात हवामान कसं असेल? पावसाची शक्यता आहे का? याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डखांनी दिली आहे. तसेच शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
सध्या येत असलेलं वातावरण आज 2 जूनला मोकळे होईल. उद्याही खान्देश आणि विदर्भात असेच हवामान राहणार आहे. उघडीप ही 80 टक्के भागात कायम राहील तर 20 टक्के भागात जोरदार पाऊस किंवा मध्यम हलक्या सरी होत राहील अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. 7, 8 जून सुध्दा असेच वातावरण राहील. पहिला अवकाळी पाऊस जास्त झाल्याने ढग बनतात ते 20 टक्के भागात पाडतात. सर्वांना पाऊस नाही. सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी असे वातावरण एक दिवस आड बनत राहील असे डख म्हणाले.
मान्सूनचा पाऊस पुन्हा 15 जून पासून सक्रीय होणार
मान्सूनचा पाऊस पुन्हा 15 जून पासून सक्रीय होणार आहे. त्याची व्याप्ती भाग घेण्याची 45 टक्के प्रत्येक दिवस अशी राहिल, एकदाच एका दिवसात सर्व ठिकाणी मान्सून पडेलच असं नाही. मान्सून काळात मध्यम ते काही ठिकाणी थंड ढगाळ वातावरण राहतं त्यामुळे सगळे भाग घेण्यासाठी 15 जून पासून बराच वेळ लागेल. कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, 14 जूनपर्यंत 80 टक्के भागात पाऊस उघडझाप करेल अशी माहिती पंजाबराव डखांनी दिली. या काळात भाग बदलत 20 टक्के भागातच पाऊस पडेल. मान्सून येताच कमी दाबाचा पट्टा निवळणार असून उघडीप मिळणार आहे. मान्सून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जून महिन्यात असेच वातावरण राहतं, त्यात नवल नसल्याचे पंजाबराव डख म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसात राज्यात पावसात धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले होते. अनेक भागात पाणीच पाणी झाले होते. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता. तर काही भागात शेती पिकांना मोठा फटका बसला होता. विशेषत: फळबागांचे आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते.