आरोपीचे वकील अमित कटाकनवरे यांनी पण अक्षय शिंदे याचा मृतदेह असाच आहे, त्यावर तुम्ही काहीतरी निर्णय घ्या? अशी विनंती कोर्टाला केली. त्यावर कोर्टाने सरकार तुम्हाला योग्य ते सहकार्य करेल, असे आदेश दिले.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला. त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी अनेक ठिकाणी विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आता अक्षय शिंदे याच्या पालकांनी हायकोर्टात धाव घेतली होती. नुकतंच याबद्दल हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने सोमवारपर्यंत अक्षय शिंदेंचा मृतदेह दफन करा असे महत्त्वपूर्ण आदेश दिले.
बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून दोन दिवसांपूर्वी एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी विरोध होत आहे. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी याबद्दल हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. याबद्दल आता सुनावणी पार पडली. यावेळी वकील अमित कटाकनवरे यांनी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचे बाजू कोर्टात मांडली. यावेळी आरोपी अक्षय शिंदेचे आई-वडीलही कोर्टात उपस्थित होते.
या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी याप्रकरणी बाजू मांडली. स्थानिक पोलीस हे अक्षय शिंदे यांच्या आई वडिलांच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहेत. मात्र अक्षय शिंदेच्या बाजूने असणारे वकील हे कोर्टाच्या बाहेर जाऊन चुकीची माहिती माध्यमांना देत आहेत. राज्य सरकारकडून अक्षय शिंदेच्या आई वडिलांना पूर्णपणे सहकार्य केले जात आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
त्याचे आई वडील मृतदेह घेऊन फिरतात – आरोपीच्या वकिलांचा दावा
त्यावर अक्षय शिंदेचे वकील अमित कटाकनवरे यांनी सरकारी वकील इथे कोर्टात चुकीची माहिती देत आहेत, असा युक्तीवाद केला. अक्षय शिंदे याचे आई वडील त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी मागणी करत आहेत. पण त्यांना खूप विरोध होत आहे. मात्र सरकारी वकील इथे कोर्टात चुकीची माहिती देत आहेत. त्याचे आई वडील मृतदेह घेऊन बाहेर फिरत आहेत. अक्षय शिंदे यांच्या आई वडिलांना मारण्याच्या संदर्भात धमक्या येत आहेत, असे अमित कटाकनवरे यांनी म्हटले.
यावर न्यायधीशांनी याबद्दल पोलीस खबरदारी घेतील. त्यांना यासंदर्भातील सूचना आम्ही पूर्वीच केली आहे, असे सांगितले. यानंतर सरकारी वकिलांनी आम्ही मृतदेहला दफन करण्यासंदर्भात आम्ही जागा उपलब्ध करून देऊ, असे कोर्टात सांगितले. त्यावर न्यायधीशांनी सरकारला सहकार्य करा ते यासंदर्भात जबाबदारी घेत आहेत, असे आदेश दिले. त्यावर अमित कटाकनवरे यांनी पण अक्षय शिंदे याचा मृतदेह असाच आहे, त्यावर तुम्ही काहीतरी निर्णय घ्या? अशी विनंती कोर्टाला केली.
पोलीस तुम्हाला मृतदेह दफन करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देतील, कोर्टाचे आदेश
यावर न्यायधीशांनी महत्त्वाचे आदेश दिले. सरकार तुम्हाला योग्य ते सहकार्य करेल. तसेच पोलीस तुम्हाला मृतदेह दफन करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देतील. यावर पुढील सुनावणी सोमवारी होईल, असे न्यायधीशांनी म्हटले. यानंतर आरोपीच्या वकिलांनी मी बाहेर जाऊन माध्यमांना काय उत्तर देऊ, त्यांनाही याप्रकरणातील सत्य समजलं पाहिजे, असा प्रश्न न्यायधीशांना विचारला. त्यावर न्यायाधीशांनी सरकारला सोमवारपर्यंत मृतदेह दफन करण्यासंदर्भात कारवाई करा. उद्या जरी दफन करण्यात आले तर सोमवारी आम्हाला याबद्दलची माहिती द्या, असे आदेश दिले.