पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरद्वारे (Opration Sindhoor) भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे विलक्षण कोंडी झालेल्या व भेदरलेल्या पाकिस्तानने अखेर शनिवारी नांगी टाकली व शस्त्रसंधी करण्यासाठी बाबापुता केला. दोन्ही बाजूंनी घोषणाही झाली. भारत आणि पाकिस्तानने (India vs Pakistan War) शस्त्रसंधी करण्याची तयारी दर्शविल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शनिवारी (10 मे) जाहीर केले. अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
48 तासांत काय घडलं?
गेल्या 48 तासांत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी आणि मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ, लष्करप्रमुख असीम मुनीर आदी लोकांशी चर्चा केली. त्यानंतर युद्धबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला. अनेक फोन झाले. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील कॉन्फरन्स कॉलवर होते, अशी माहिती अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी दिली.
घोषणेच्या तीन तासांनंतरच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन-
घोषणेच्या तीन तासांनंतरच शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार करत उखळी तोफांचा मारा केला. यात 7 नागरिकांचा मृत्यू झाला. तर सीमा सुरक्षा दलाचे आठ जवानही जखमी झाले आहेत. सारासार विचारांती भारताने होकार दिल्यानंतर शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपासून शस्त्रसंधी लागू झाली होती.
चीनचा अजित डोवालांना फोन, म्हणाले….
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही फोनवरुन संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय पर्यटकांना ठार मारण्यात आल्यामुळे दहशतवादाविरुद्ध ठोस कारवाई करणे गरजेचे होते, असे अजित डोवाल यांनी म्हटले. भारताला युद्ध नको आहे. युद्ध कोणाच्याच हिताचे नसते. आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीच्या कराराशी कटिबद्ध आहोत. आम्ही क्षेत्रीय शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित होईल, अशी आशा करतो, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.