पुण्यातील ट्रॅफिक ही एक कायम चर्चेची आणि वैतागाची गोष्ट आहे. रोजच्या वाहतुकीच्या गोंधळामुळे पुणेकर अक्षरशः हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर तर ‘पुण्याचं ट्रॅफिक’ हा एक वेगळाच मीम ट्रेंड बनतो. पण फक्त आपणच ट्रॅफिकमध्ये अडकतो हे चूक ठरेल. कारण थेट इंग्लंडमध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघ ट्रॅफिक जॅममध्ये अडकला. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्याला उशीर झाला आहे.
तिकडे वेस्ट इंडिजचा संघच ट्रॅफिकमध्ये अडकला!
मंगळवारी (3 जून) इंग्लंड क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना उशिरा झाला आहे. खरं तर, वेस्ट इंडिज संघ हॉटेलमधून मैदानाकडे निघाला होता, पण रस्तात तो ट्रॅफिकमध्ये अडकला. अशा परिस्थितीत मैदानावर वेळेवर न पोहोचल्याने सामना उशिरा झाला. यानंतर, सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे. आता वेस्ट इंडिज संघ आल्यावर टॉस होईल.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचा टॉस स्थानिक वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता) होणार होता, परंतु वेस्ट इंडिज संघ ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे तो वेळेवर होऊ शकला नाही.
आता संघ आल्यानंतर टॉस स्थानिक वेळेनुसार दुपारी 01:00 वाजता होईल आणि पहिला चेंडू दुपारी 01:10 वाजता टाकला जाईल. हा पूर्ण 50 षटकांचा सामना असेल आणि त्यात कोणतीही ओव्हर रिडक्शन लागू होणार नाही.
इंग्लंडची मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी
या मालिकेत इंग्लंड संघाने 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. 29 मे रोजी खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाने 238 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्याचप्रमाणे 1 जून रोजी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघाने 3 विकेट्सने शानदार विजय मिळवला. त्या सामन्यात जो रूटने इंग्लंडसाठी नाबाद 166 धावांचे शतक ठोकले आणि संघाला विजय मिळवून दिला.