साप्ताहिक राशिभविष्य: १ ते ७ जून २०२५

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मेष : व्यवहार जपून करा
दिनांक ४, ५, ६ अशा या तीन दिवसांत कोणतेही काम करताना नियोजन करा. कारण नियोजन न करता अचानक काम करायला गेल्यास ते काम होणार नाही. त्यामध्ये अडथळा येऊ शकतो. परिणामी तुम्हाला काम करावेसे वाटणार नाही. घाईघाईने घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. इतरांच्या सांगण्या-बोलण्यावर लक्ष देण्यापेक्षा स्वत:ला जे पटते त्याला जास्त महत्त्व द्या. कोणतेही व्यवहार जपून करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात इतरांवर अवलंबून राहू नका. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे बोलणे खावे लागेल.

आर्थिकबाबतीत बचत करणे योग्य राहील. समाजसेवा करताना भान ठेवा. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. मुलांचे लाड करा, पण शिस्त बिघडू देऊ नका. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ : प्रस्ताव येईल
दिनांक ७, ८ हे दोन दिवस तसे फारसे अनुकूल नाहीत. म्हणजे या दिवसांत जे काही करायला जाल ते उलट होऊ शकते. रागाने कोणतीही गोष्ट करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रत्येक गोष्टीत आपले तेच खरे असे करू नका. इतरांचे ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा म्हणजे त्रास होणार नाही. कोणाच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणांहून प्रस्ताव येतील. हे प्रस्ताव चांगले असतील ते स्वीकारा. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त उलाढाल वाढेल. नोकरदार वर्गाला कामात येणारे अडथळे दूर होतील.

आर्थिकबाबतीत काटकसर करणे योग्य राहील. मैत्रीचे नाते दृढ होईल. मुलांची प्रगती होईल. भावंडांशी संवाद गोडीचा ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन : मनोबल वाढेल
सप्ताहातील सर्व दिवस चांगले आहेत, त्यामुळे आता चिंता करण्याची गरज नाही. शिवाय कोणावर अवलंबून राहण्याचीही गरज नाही. आपले काम वेळेत होणार हे मात्र निश्चित. चांगले दिवस असले की कोणत्याही कामाला वेळ लागत नाही. शिवाय आपली मानसिकताही चांगली राहते. परिणामी कामातील गती वाढते. सध्या फार धावपळ करावी लागणार नाही. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार आहे. प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते. सध्या हे यश मिळेल. व्यवसायात अनपेक्षित लाभ होईल. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात चांगले प्रस्ताव येतील. आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. राजकीय क्षेत्रातील ताण-तणाव कमी होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. शेजाऱ्यांपासून मात्र दोन हात लांब राहा. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल.

मनोबल वाढेल. प्रकृती उत्तम राहील.

कर्क : दुहेरी लाभ होईल
प्रत्येक आठवड्यात कोणता ना कोणता तरी दिवस असा असतो की त्या दिवशी काहीतरी काळजी निर्माण होत असते. सध्या या सप्ताहात असा कोणताच दिवस नाही की तो काळजी करायला लावेल. म्हणजे सर्व दिवस चांगले असतील. दरवेळी एखादा तरी दिवस चिंतेचा जातो. या आठवड्यात मात्र कोणतीही चिंता जाणवणार नाही, त्यामुळे कामात लक्ष लागेल. चांगल्या गोष्टींसाठी पाठपुरावा करावा लागणार नाही. त्या सहज मार्गी होणार आहेत. व्यवसायात गुंतवणूक कराल आणि त्या गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या दुहेरी लाभ होईल. राजकीय क्षेत्रातील जबाबदारी पार पाडाल. कुटुंबाची साथ राहील. जोडीदार आनंदी असेल. शेजाऱ्यांना मदत कराल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील मानसिक तणाव कमी होईल.

आरोग्य उत्तम राहील.

सिंह : धरसोड वृत्ती टाळा
दिनांक १ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला आहे. बऱ्याच दिवसांपासून ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत होता आणि ते काम होत नव्हते. ते काम आता होणार आहे. प्रत्येक गोष्टीत धीर धरावा लागतो याचा अनुभव मात्र तुम्हाला आला. सध्या कामाचे नियोजन अगदी वेळेत होणार आहे, पण कोणते काम आधी करू, कोणते नंतर करू ही जी तुमची धरसोड वृत्ती आहे ती टाळा. एका मतावर ठाम राहा, त्यामुळे निर्णय यशस्वी होतील. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल.

नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात ठोस उपाययोजना करावी लागेल. आर्थिकदृष्ट्या खर्च कमी करा. कौटुंबिक मतभेद दूर होतील. तरुण वर्गाला विवाहाचे प्रस्ताव येतील.

धार्मिक कार्याची आवड राहील.

कन्या : काटकसर करा
दिनांक २, ३ हे दोन दिवस ‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था होऊन बसेल. काय करावे काय करू नये हे सुचणार नाही. अशा वेळी स्पष्ट बोलण्याने दुरावा निर्माण होऊ शकतो व स्वत:ला त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा शांत राहा. सध्या वेळ आपली नाही असे समजून पुढे चला, म्हणजे त्रास होणार नाही. इतरांचे मत काय आहे यापेक्षा स्वत:ला काही करायचे आहे या गोष्टींचा विचार करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये थांबलेल्या कामांना गती येईल. व्यवसायात भागीदारी करावयास हरकत नाही. नोकरदार वर्गाला कोणताच त्रास जाणवणार नाही.

आर्थिक बाबतीत मात्र काटकसर करा. राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा अंदाज येईल. भावंडाशी संपर्क साधाल. मानसिकता जपा.

तूळ : शब्द जपून वापरा
दिनांक ४, ५, ६ अशा या तीन दिवसांत प्रयत्न वाढवावे लागतील. कोणावर अवलंबून राहून चालणार नाही, तरच कामे पूर्ण होतील. कामाचे नियोजन जरी केले तरी त्या कामांमध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात, तेव्हा काम उशिरा होणार आहे हे गृहीत धरून चाला, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. आपले काम भले आणि आपण भले हे सूत्र लक्षात ठेवा. समोरच्याशी बोलताना शब्द जपून वापरा. म्हणजे गोष्टी अंगलट येणार नाहीत. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातील परिस्थिती चांगली असेल. नोकरदार वर्गाला काम मिळत नाही. केले तर वरिष्ठांचे बोलणे खावे लागेल. आर्थिकदृष्ट्या सतर्क राहा. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. कामापुरते जवळ करणाऱ्या मैत्रीपासून लांब राहा. कुटुंबाची काळजी घ्या.

वृश्चिक : वातावरण अनुकूल
दिनांक ७ रोजीचा एकच दिवस शुभ नाही. या दिवसात कामात गुंतून राहा. नवीन काही खरेदी करू नका किंवा कुणाला शब्द देऊ नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला आहे. या कालावधीमध्ये काय काम करायचे आहे काय करायचे आहे याचे नियोजन करा. आळस बाजूला सारा. कामाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न वाढवा. सर्व दृष्टिकोनातून वातावरण अनुकूल राहील. व्यासंग उत्तम राहील. व्यापार व्यवसायाच्या दृष्टीने विचार करता जाहिरात माध्यमांचा वापर करावा लागेल. नोकरदार वर्गाला आपले मत वरिष्ठांना पटवून द्यावे लागेल.आर्थिकदृष्ट्या वायफळ खर्च टाळा. राजकीय क्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधाल.

धनू : उत्साह टिकून राहील
दिनांक १ रोजीचा एकच दिवस शुभ नाही. बाकी दिवसांत चंद्राचे भ्रमण भाग्यास्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. सध्या आपण म्हणाल ती पूर्व दिशा असेल. तुमच्याकडे समोरच्याला आपले मत पटवून कसे द्यायचे ही कला खूप चांगली आहे. एखादी गोष्ट तुम्हाला करून घ्यायची आहे असे ज्या वेळी तुम्ही ठरवता. त्या वेळी मात्र तुम्ही नम्रतेची वागणूक ठेवता आणि आपले काम करून घेता सध्या एवढे पण नम्र होण्याची गरज नाही. कारण ग्रहमानच तुम्हाला साथ देणारे आहे. कामातील उत्साह टिकून राहील. व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला कामाचा अंदाज येईल.

आर्थिकबाबतीत लाभ होईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधाल. संततीचे कौतुक कराल. शेजाऱ्यांशी मात्र जेवढ्यास तेवढे राहा. आरोग्य साथ देईल.

मकर : आरोग्याची काळजी घ्या
दिनांक २, ३, ४ असे हे तीन दिवस टांगती तलवार आहे असे म्हणायला हरकत नाही. ज्या वेळी असे दिवस असतात. त्या वेळी कारण नसताना तुम्ही खर्च करता व कर्ज झाले. म्हणून त्रास करून घेता. आपली आवक आहे तेवढाच खर्च करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे नुकसान होणार नाही आणि त्रासही होणार नाही. इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. वादविवाद या गोष्टींपासून लांब राहा. शांत राहून कामाचा आराखडा तयार करा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात उलाढाल वाढलेली असेल. नोकरदार वर्गाचे काम सुरळीत चालू राहील. आर्थिकबाबतीत अपेक्षित लाभ होईल.

समाजसेवेची आवड राहील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांशी संपर्क साधाल. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा.

कुंभ : संयम ठेवा
षष्ठ स्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. अशा या कालावधीत जपून पाऊल टाकावे लागेल. काही वेळेला आपण प्रामाणिक असूनसुद्धा आपल्याला न्याय मिळत नाही. असाच प्रकार या सप्ताहात जाणवणार आहे. त्यापेक्षा सध्या शांत राहिलेले चांगले. वेळकाळ पाहून निर्णय घेतलेला योग्य राहील. एखादी गोष्ट नाही आवडली तरी ती तुम्हाला करावी लागेल. म्हणूनच तुम्हाला संयम ठेवावा लागेल. सध्या आपल्या ताटात काय वाढले आहे तेवढेच बघा. इतरांच्यात डोकावू नका. म्हणजे नुकसान होणार नाही. व्यवसायात गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्या.

आर्थिकदृष्ट्या व्यवहार जपून करा. कुटुंबातील सदस्यांचा आदर करा. मानसिक ताण घेऊ नका. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. प्रकृती जपा.

मीन : शांतपणे मत मांडा
दिनांक २, ३ व ७ असे हे तीन दिवस चांगले कसे जातील या दृष्टीने प्रयत्न करा. म्हणजे हे दिवस वाईट आहेत का तर तसे नाही. या दिवसांत कामाला थोडा उशीर होतो. समोरच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. काम वेळेत न झाल्यामुळे चिडचिड होते. तेव्हा या दिवसांत आपले मत शांतपणे मांडा. आपल्या वैयक्तिक गोष्टी दुसऱ्यांसमोर मांडू नका. न झेपणाऱ्या गोष्टींची जबाबदारी घेऊ नका. बाकी दिवसांचा कालावधी ठीक राहील.

व्यवसायात मागील काही दिवसांपासून जो अनुभव आलेला आहे तो विसरू नका. उधारीचे व्यवहार टाळा. नोकरदार वर्गाचा कामाचा व्याप वाढेल. आर्थिकदृष्ट्या बचत करावी लागेल. मित्र-मैत्रिणींसोबत गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. मुलांचे लाड करा पण शिस्त बिघडू देऊ नका. कुटुंबाची काळजी घ्या.

शारीरिक, मानसिक स्वास्थ्य जपा.

 

 

(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *