लेखणी बुलंद टीम:
मेष: पथ्यपाणी सांभाळा
६ तारखेला दुपारनंतर दिनांक ७ व ८ असा हा अडीच दिवसांचा कालावधी फार चांगला आहे असे म्हणता येणार नाही. कारण या दिवसांत नको तो व्याप मागे लागू शकतो. अशा कालावधीत आपल्याला स्वत:चे काम कमी, पण दुसऱ्यांच्या कामात डोकावून बघण्याची मानसिकता फार होईल. परिणामी स्वत:चे नुकसान करून घ्याल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, असे करण्यापेक्षा स्वत:च्या कामाकडे लक्ष दिलेले चांगले. बाकी दिवस चांगले असतील. पौर्णिमा कालावधी भाग्योदयाचा असेल. व्यवसायातील परिश्रम वाढतील. तशी आवकही वाढेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक ताणतणाव कसा कमी होईल ते पाहा राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होईल. मित्र-मैत्रिणींपासून सध्या तरी दोन हात लांब राहा. आपल्या बोलण्यामुळे कुटुंबात वाद होणार नाही याची काळजी घ्या. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. मानसिकता जपा. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
वृषभ : संयम ठेवा
षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. बऱ्याच दिवसांतून असे भ्रमण आले आहे असे म्हणायला हरकत नाही. या दिवसांमध्ये होता होईल तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी तुम्हाला न पटणाऱ्या असतील. अशा वेळी लगेचच प्रतिक्रिया देऊ नका. कारण या प्रतिक्रिया दिल्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करून चालणार नाही. इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. पौर्णिमा कालावधीत संयम ठेवा. व्यवसायात नवीन गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाला कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालता येणार नाही. खर्च करताना योग्य तो निर्णय घ्या. भावंडांची भेट होईल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. प्रकृतीच्या बाबतीत काळजी घ्या.
मिथुन : शांत राहणे उत्तम
दिनांक ६, ७, ८,११,१२ असा हा पाच दिवसांचा कालावधी चांगला कसा जाईल हे पाहा. कारण या दिवसांत आपल्या मनाविरुद्ध घटना घडू शकतात. काम करण्याचा उत्साह कमी राहील. या कालावधीत जे चालले आहे ते चांगले असे समजून पुढे चला. त्यावर फारसा विचार करत बसू नका. मात्र अशावेळी शांत राहणे उत्तम हे लक्षात ठेवा.
आपल्या कामाची जबाबदारी इतरांवर सोपवून चालणार नाही, त्यामुळे नुकसान होऊ शकते. गोड संवाद ठेवून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात स्वत: तुम्ही जातीने लक्ष दिले पाहिजे. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे वेळ द्यावा लागेल.
कर्क : नियोजनाला महत्त्व द्या
दिनांक ९, १० हे संपूर्ण दोन दिवस ११ तारखेला दुपारपर्यंत असे अडीच दिवस बेताचे राहतील. या दिवसांत महत्त्वाचे कोणतेही निर्णय घेऊ नका. अशी जर वेळ आली तर वरिष्ठांचा सल्ला घ्या. त्यानंतरच निर्णय घ्या. आपले काम आपणच केल्यास नुकसान होणार नाही. शिवाय कोणतेही काम करण्यापूर्वी नियोजनाला महत्त्व द्या. म्हणजे काम वेळेत पूर्ण होईल. पौर्णिमा कालावधीत वादविवाद टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल.
व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांची शाब्बासकी मिळेल. आर्थिक बचत करणे योग्य राहील. मुलांच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्याल. घरगुती वातावरण चांगले राहील. धार्मिक गोष्टींची आवड राहील आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : कायद्याचे पालन करा
दिनांक ११, १२ हे दोन दिवस शुभ नाहीत. त्यामुळे या दोन दिवसांत कोणत्याही गोष्टीवर चर्चा करताना त्याचे परिणाम काय होतील ते पहिले पाहा. तुम्हाला वाटले म्हणून बोलणे योग्य राहणार नाही. ज्या गोष्टीविषयी तुम्हाला काहीच कल्पना नाही, तुम्ही प्रत्यक्षात जी गोष्ट पाहिलेली नाही अशा गोष्टीविषयी चर्चा करू नका. कायद्याचे पालन करा. बाकी दिवस चांगले असतील. पौर्णिमा कालावधीही उत्तम असेल. व्यवसायातील आवक-जावक वाढेल. नोकरदार वर्गाला पूर्वीपेक्षा सध्याची परिस्थिती चांगली आहे असेच वाटेल आर्थिकदृष्ट्या बचत हा महत्त्वाचा उपाय असेल.
कन्या : नवीन संधी प्राप्त होईल
चांगल्या गोष्टींसाठी वेळ लागतो हे मात्र तुम्ही चांगलेच अनुभवले आहे आणि सध्या तुम्हाला नेमके हेच जाणवणार आहे. आपण दुसऱ्यांना जरी मदत केली तरी आपले काम आपल्यालाच करावे लागणार आहे हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. प्रत्येक वेळी वेळापत्रकाप्रमाणे काम करायचे असे ठरवले तरी ते होत नव्हते, सध्या मात्र वेळापत्रकाप्रमाणे काम होईल, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. कामे अगदी वेळेत पूर्ण होतील. पौर्णिमा कालावधी चांगला राहील. व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात ताणतणाव जाणवणार नाही.आर्थिक परिस्थिती समाधानाची असेल. समाजसेवेचे पुण्य पदरी पडेल. घरगुती वातावरण आनंदी असेल. मानसिक समाधान लाभेल.प्रकृती उत्तम राहील.
तूळ : पारडे जड होईल
सप्ताहातील वातावरण एक नंबर असेल. सध्या तुम्हाला कोणाची हांजी हांजी करावी लागणार नाही. जे काम हाती घ्याल ते पूर्ण होईल. इतरांच्या मागे लागण्याची गरज भासणार नाही. संघर्षदायक वातावरण कमी होईल. सध्या आपली डाळ शिजणार आहे ,असेच म्हणावे लागेल. आपण म्हणाल ती पूर्व दिशा असेल. कामामध्ये आत्तापर्यंत अडथळे येत होते, सध्या तसे अडथळे येणार नाहीत. प्रयत्नांना यश मिळेल. तुमचे पारडे जड होईल. पौर्णिमा कालावधी उत्साहाचा असेल. व्यवसायातील चढउतार वेळीच लक्षात येईल. फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला आपल्या मर्जीप्रमाणे काम करता येईल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रातील हेवेदावे दूर होतील. जोडीदाराची साथ लाभेल. धार्मिककार्यांसाठी खर्च कराल.
वृश्चिक : शुभ संकेत मिळेल
दिनांक ६ तारखेला दुपारपर्यंत एवढा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. चांगल्या कालावधीमध्ये तुम्हाला सांगावेच लागत नाही की काय करावे आणि काय करू नये. तुम्ही मात्र मस्त मनोरंजन करून घेता. अशा वेळी तुम्हाला कोणाचीच गरज लागत नाही. तुम्ही तुमच्या कामांमध्ये गुंतून राहता. आपले मनोरंजन कसे होईल याव्यतिरिक्त तुमची कोणतीच प्रगती तुमच्या मनामध्ये राहत नाही. मात्र असे ग्रहमान असेल तर कामाच्या बाबतीत विचार करायला हवा की, आपले काम थांबले आहे त्या कामाला गती कशी येईल. हेच तुम्ही पाहिले पाहिजे. पौर्णिमा कालावधी धनस्थानातून होत आहे. व्यवसायातील आवक वाढेल. नोकरदारवर्गाला शुभ संकेत मिळेल. आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होईल. जोडीदाराची मदत मिळेल. कुटुंब आनंदी असेल. मानसिक शांतता लाभेल. प्रकृती उत्तम राहील.
धनू : वेळेचे भान ठेवा
६ तारखेला दुपारनंतर दिनांक ७, ८ हे संपूर्ण दोन दिवस म्हणजे अडीच दिवसांचा कालावधी शुभ नाही. त्यामुळे तुम्हाला सतर्क राहून काम करावे लागेल. प्रत्येक वेळी तुम्हाला असे वाटत असते की, मी म्हणेल ती पूर्व दिशा अशी जरी तुमची विचार करण्याची पद्धत चुकीची असली तरीसुद्धा तुम्हाला असेच वाटते. सध्या या कालावधीमध्ये तुम्हाला असेच होणार आहे. माझे जरी चुकत असले तरी समोरच्याने माझे ऐकून घ्यावे अशी तुमची मानसिकता नेहमी राहते. या मानसिकतेत बदल करा. वेळेचे भान ठेवा. पौर्णिमा कालावधीत तुम्हाला ज्या गोष्टी जमतील त्याच करा. दुसऱ्यांनी केले म्हणून तुम्ही करायला जाऊ नका. तिथे तुमचे नुकसान होऊ शकते. व्यवसायात गुंतवणूक करताना विचार करा. नोकरदार वर्गाने कामात लक्ष द्यावे. जोडीदाराला विश्वासात घेऊन निर्णय घ्या. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. योगसाधनेला महत्त्व द्या.
मकर : सामूहिक गोष्टींची आवड
दिनांक ९, १० हे संपूर्ण दोन दिवस आणि ११ तरखेला दुपारपर्यंत असे हे अडीच दिवस ‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था होणार आहे. त्यामुळे सावधानता बाळगून काम करावे लागेल. तुम्ही बिनधास्तपणे इतरांवर अवलंबून राहता व विश्वासही ठेवता. सध्या तसे न करता स्वत:चे काम स्वत: करा. कोणावर अवलंबून राहू नका, म्हणजे नुकसान होणार नाही. स्वत:ची काळजी घ्या. पौर्णिमा कालावधीत वादविवाद होणार नाही याची दक्षता घ्या. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करा. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी पार पाडावी लागेल. आर्थिक व्यवहार जपून करा. सामूहिक गोष्टींची आवड राहील. मित्र-मैत्रिणींसोबत करमणूक होईल. जोडीदार मदत करेल. प्रकृतीची काळजी घ्या.
कुंभ : सकारात्मक गोष्टी घडतील
११ तारखेला दुपारनंतर आणि १२ तारखेचा संपूर्ण दिवस असा हा दीड दिवसांचा कालावधी अनुकूल नाही. या दिवसांत कोणतेही काम करताना भान ठेवा. इतरांनी केले म्हणून तुम्ही करू नका. तुम्हाला त्यात फायदा काय ते पाहा. स्वत:च्या कामाची सुरुवात स्वत: करा. कोणावर अवलंबून राहू नका. त्यामुळे कामात चुका होणार नाहीत. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. पौर्णिमा कालावधी लाभदायक राहील. चांगल्या कालावधीमध्ये सकारात्मक गोष्टी घडतील. व्यवसायात मोठ्या प्रमाणात फायदा होईल. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. शाब्बासकी मिळेल. आर्थिक चिंता राहणार नाही. समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. मित्र-मैत्रिणींचा सहवास हवाहवासा वाटेल. संततीचे कौतुक कराल. धार्मिक कार्याची आवड राहील. आरोग्य उत्तम राहील.
मीन : मानसिक समाधान लाभेल
६ तारखेला दुपापर्यंत असा हा अर्धाच दिवस फारसा अनुकूल नाही. बाकी दिवसांत चंद्रग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानात होत आहे. या कालावधीत महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. आत्तापर्यंत ज्या गोष्टींची भीती वाटत होती की, हे काम होईल की नाही तशी भीती आता वाटणार नाही. कारण काम वेळेत पूर्ण होईल. त्यामुळे तुमचा कामातील उत्साह वाढेल. चांगल्या गोष्टींचा शुभारंभ होईल. पौर्णिमा कालावधीत ज्येष्ठांची कृपा राहील. व्यवसायातील धाडसी निर्णय घेताना आगामी काळाचा विचार करा. नोकरदार वर्गाला नवीन कामाची संधी प्राप्त होईल. आर्थिक व्यवहार चोख ठेवा. समाजसेवा करण्याची इच्छा होईल. कुटुंब पाठीशी राहील. मुलांच्या बाबतीत घेतलेले निर्णय योग्य असतील. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती ठणठणीत राहील.
(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)