मेष : समतोल साधा
दिनांक २९, ३० व ३१ तारखेला दुपारपर्यंत असा हा अडीच दिवसांचा कालावधी चांगला कसा जाईल त्या दृष्टीने प्रयत्न करा. कारण असे दिवस असले की नको त्या गोष्टींचा मोह निर्माण होतो आणि स्वत:चेच नुकसान होते. इतरांच्या वैयक्तिक गोष्टींत हस्तक्षेप करू नका. नाही तर गोष्टी अंगलट येऊ शकतात. कामामध्ये उशीर झाला तरी चालेल, पण घाई-गडबड करू नका. इतरांचे फक्त ऐकून घ्या. त्यावर प्रत्युत्तर करू नका. प्रत्येक गोष्टीत समतोल साधा, म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात वारंवार बदल करणे त्रासाचे राहील. नोकरदार वर्गाने कामकाजाव्यतिरिक्त गोष्टीत लक्ष घालू नका. खर्च कमी करा. समाजसेवा करताना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवा. मित्र-मैत्रिणींशी दोन हात लांब राहा. कुटुंबातील सदस्यांचा आदर करा. मानसिक ताण घेऊ नका. आरोग्य जपा.
वृषभ : काटकसर करा
दिनांक ३१, १ व २ या तीन दिवसांच्या कालावधीत महत्त्वाचे काम करू नका. कारण या दिवसांत घाई होण्याची शक्यता आहे. परिणामी काही गोष्टी चुकू शकतात. इतरांनी काय करावे, काय करू नये याचा विचार करू नका. जे चालले आहे ते चांगले समजून पुढे चला. तुम्ही जे काम करणार आहात त्यासाठी समोरच्याचा प्रतिसाद तुमच्या अनुकूल राहील याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कोणावर अवलंबून राहू नका. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात उधारीचा व्यवहार करू नका. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी वाढेल. आर्थिकदृष्ट्या काटकसर करा. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. मुलांचे लाड करा, पण शिस्त बिघडू देऊ नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. स्वत:चेही आरोग्य जपा.
मिथुन : शुभ गोष्टींची सुरुवात
सप्ताहातील सर्व दिवस चांगले असतील. ज्या वेळी दिवस चांगले असतात, त्या वेळी फार संघर्ष जाणवत नाही. काम अगदी ठरवून ठेवल्याप्रमाणे होत राहते. अपेक्षा नसतानासुद्धा इतरांची मदत मिळते. कामातील वेग वाढतो. सकारात्मक विचार मनामध्ये येतील आणि त्याप्रमाणेच तुमचा कामाचा उरक राहील. यामध्ये नुकसान होणार नाही. शुभ गोष्टींची सुरुवात होईल. तोंडचा घास हिरावून घेतला जाणार नाही. अनेक माध्यमांतून यश मिळेल. आतापर्यंत तुमचे मत समोरच्याला पटणारे नव्हते. सध्या हे पटणारे असेल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. नोकरदार वर्गाला ठरवलेले ध्येय गाठता येईल.आर्थिक ताण-तणाव कमी होईल. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांशी वरच्या स्वरात बोलू नका. घरच्यांचा पाठिंबा राहील. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती ठणठणीत राहील.
कर्क : सवलत मिळेल
सर्व दिवसांचा कालावधी चांगला असल्यामुळे त्रास जाणवणार नाही. तुमचा कामातील उत्साह चांगला राहील. आत्तापर्यंत ज्या गोष्टींची तुम्ही फक्त मनामध्ये कल्पना करत होता त्या प्रत्यक्षात उतरतील. चांगल्या दिवसांमध्ये आलेले प्रस्ताव हे आगामी काळासाठी चांगले असतील. चांगल्या गोष्टींसाठी आता वेळ लागणार नाही. यश हमखास मिळेल. परिस्थिती पूर्णत: अनुकूल असेल. लांबलेले प्रश्न सुटतील. सर्वच स्तरांवर प्रगतिपथावर वाटचाल असेल.व्यवसायात मोठ्या प्रमाणात उलाढाल होईल. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात जो तांत्रिक अडथळा येत होता तो दूर होईल. आर्थिकदृष्ट्या सवलत मिळेल. शेजाऱ्यांशी जेवढ्यास तेवढे राहा. नातेवाईकांशी जपून संवाद करा.धर्मिक गोष्टींची आवड नसली तरी खर्च करावा लागेल. प्रकृती उत्तम राहील.
सिंह : पारडे जड होईल
‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे’ असे ऐकायलाही चांगले वाटते ना! तर हो, हे असेच दिवस आहेत. या दिवसांत शुभ गोष्टींची सुरुवात करा. चांगल्या कामासाठी वेळ वाया घालवू नका. असे दिवस असले की काम अगदी वेळेत होत राहते. सध्या आपण जी म्हणाल ती पूर्व दिशा असणार आहे; तेव्हा या संधीचे सोने करा. तुमचे पारडे जड होईल. कामातील उत्साह टिकून राहील. मंगल कार्यात सहभाग राहील. व्यवसायात उत्कर्ष होईल. नोकरदार वर्गाला धाडसी निर्णय घेता येतील. आर्थिक खर्च कमी करावा लागेल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. भावंडांच्या बाबतीत घेतलेले निर्णय योग्य असतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. धार्मिक गोष्टींची आवड राहील. कुटुंबामध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. आरोग्य उत्तम राहील.
कन्या : देवाणघेवाण टाळा
दिनांक २७, २८ हे दोन दिवस तसे अनुकूल नाहीत, त्यामुळे या दिवसांत कोणतेही काम करताना सतर्कता बाळगा. कोणाच्या वागण्या-बोलण्याकडे लक्ष देऊ नका. कारण या दिवसांत याचाच त्रास होऊ शकतो. चांगले सांगायला गेलात तर त्याचा त्रास तुम्हालाच होईल. त्यापेक्षा शांत राहा. कोणाला सल्ला देऊ नका. आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. या दिवसांत देवाणघेवाण टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये थांबलेल्या गोष्टींना गती येईल. सध्या व्यवसायात मोठी गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाला वेळेचे भान ठेवावे लागेल. आर्थिकदृष्ट्या कोणावर अवलंबून राहू नका. सार्वजनिक ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया देताना विचार करा. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या. कुटुंबाची मदत मिळेल. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. योगसाधनेला महत्त्व द्या.
तूळ : गैरसमज टाळा
दिनांक २९, ३० हे दोन दिवस व ३१ तारखेला दुपारपर्यंत असा अडीच दिवसांचा कालावधी धरसोड वृत्तीचा राहील. म्हणून या कालावधीत कोणतेही काम करताना भान ठेवा. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार नाही. आपले मत इतरांना पटेलच असे नाही. ‘आपले काम भले ने आपण भले’ हे सूत्र लक्षात ठेवा. या दिवसांत कारण नसताना गैरसमज निर्माण होऊ शकतात. तेव्हा हे गैरसमज टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये प्रयत्नांना यश मिळेल. व्यवसायात नवी दिशा मिळेल. नोकरदार वर्गाला आपला अहवाल योग्य प्रकारे सादर करता येईल. आर्थिक बचत करणे योग्य राहील. मित्र-मैत्रिणींशी संवाद जपून करा. मुलांची काळजी घ्या. जोडीदाराची मदत मिळेल. प्रकृतीची काळजी घ्या.
वृश्चिक : उधारी करू नका
दिनांक ३१, १, २ अशा या तीन दिवसांत तुमची तारेवरची कसरत आहे. ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी गत होऊन बसेल. अशा वेळी काय निर्णय घ्यायचे, काय घ्यायचे नाहीत हे सुचणार नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी त्रासदायकच ठरतो. सध्या तुमची एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तर तुम्ही एकाच मतावर ठाम राहाल, त्यामुळे नुकसान होऊ शकते. सध्या आपल्या मनमर्जीप्रमाणे काही होणार नाही. आपल्यालाच इतरांची हांजी हांजी करावी लागेल. त्यापेक्षा दोन शब्द कमी बोललेले चांगले. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील दिनचर्या व्यस्त राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मत जाणून घ्यावे लागेल. आर्थिक व्यवहारात उधारी टाळा. राजकीय क्षेत्रात सध्या रस वाटणार नाही. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. प्रकृती जपा.
धनू : उत्साह वाढेल
भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण अतिशय लाभदायक राहील. मागील काही दिवस कटकटीचे आणि त्रासाचे गेले असले तरी सध्या सप्ताह उत्साह वाढवणारा असेल. आपल्या मर्जीने इतरांनी वागावे असे दरवेळी तुम्हाला वाटत असते. सध्या मात्र असेच होणार आहे. त्यासाठी तुम्हाला फार कष्ट घ्यावे लागणार नाही. तुम्ही म्हणाल तीच गोष्ट पूर्ण होणार असे वातावरण आहे. या चांगल्या दिवसांचा तुम्ही मनसोक्त आनंद घ्याल. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. नोकरदार वर्गाला चांगल्या कामाची जबाबदारी मिळेल. आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. समाजमाध्यमाद्वारे प्रसिद्धी मिळेल. मित्र-मैत्रिणींशी सलोखा वाढेल. संततिसौख्य लाभेल. नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. धार्मिक गोष्टींची आवड राहील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
मकर : आरोग्य जपा
दिनांक २७, २८ हे दोन दिवस शुभ नाहीत, त्यामुळे या दिवसांत नियोजन केल्याशिवाय कोणतेही काम करू नका. मनात आले म्हणून केले असे केल्यास नुकसान होऊ शकते. ज्या व्यक्तींशी तुमची ओळख नाही अशा व्यक्तींशी कोणतेही व्यवहार जपून करा. नाही तर फसवणुकीचे व्यवहार होऊ शकतात. कालावधी चांगला असो किंवा नसो, तुम्हाला काही गोष्टी पटणाऱ्या नसतील. त्यामुळे तुमची चिडचिड होईल, तेव्हा शांत राहून काम करायचे आहे हे लक्षात ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. नोकरदार वर्गाला चांगला मोबदला मिळेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रातील वाटचाल सोपी होईल. भावंडांशी वाद होणार नाही याची काळजी घ्या. स्वत:साठी वेळ द्या. मानसिक ताण घेऊ नका. आरोग्य जपा.
कुंभ : कुटुंबाची काळजी घ्या
दिनांक २९, ३० हे संपूर्ण दोन दिवस, ३१ तारखेला दुपारपर्यंत असे हे अडीच दिवस बेताचे राहतील. या दिवसांत कोणतेही धाडसी निर्णय घेऊ नका. आगामी काळाचा विचार करून आत्ताच हतबल होऊ नका, त्यामुळे नुकसान होऊ शकते. ज्या वेळी इतरांनी आपले ऐकावे असे वाटत असते, त्या वेळी तुम्हालाही बदल करावा लागतो. स्पष्ट बोलल्यामुळे घडी विस्कळीत होऊ शकते. तेव्हा शांत राहून आपले काम करून घ्यायचे हे लक्षात ठेवा. इतरांवर अवलंबून राहायचे नाही. वादविवादापासून लांब राहा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात चाललेल्या घडामोडींत बदल होतील. नोकरदार वर्गाचे कष्ट सार्थकी लागतील. अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. कुटुंबाची काळजी घ्या. जोडीदाराचा आदर करा. धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
मीन : संयम ठेवा
षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. सध्याचे दिवस फार चांगले आहेत असे म्हणता येणार नाही. सर्व दिवसांचा कालावधी जपून हाताळावा लागेल. अशा कालावधीत काम कमी केले तरी चालेल. पण त्रास करून घ्यायचा नाही. आपले काम वेळेत होईल याची शक्यता कमी आहे. त्यामुळे काम उशिरा होणार आहे असे गृहीत धरून चला, म्हणजे त्रास होणार नाही. प्रत्येक वेळी आपण बरोबरच असतो असे नाही. काही वेळेला आपले निर्णय चुकू शकतात. आपले मत कोणावर लादण्याचा प्रयत्न करू नका. संयम ठेवा. व्यवसायात नको त्या उलाढाली टाळा. नोकरदार वर्गाला कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालणे नुकसानीचे राहील. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा.