साप्ताहिक राशिभविष्य: १९ ते २५ जानेवारी २०२५

Spread the love

मेष

षष्ठ स्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. ज्यावेळी सप्ताहात असे ग्रहमान असते अशा वेळी प्रत्येक गोष्टीत सतर्कता बाळगावी लागते. कारण नसताना काही गोष्टी अंगलट येऊ शकतात आणि आपल्यालाही जास्त मोह होतो. नको त्या गोष्टीच्या नादी लागतो, त्यामुळे नुकसान वाढते. तेव्हा या कालावधीत एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालायचे नाही. कोणाच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप केल्यास त्याचा त्रास होऊ शकतो. समोरून येणाऱ्या प्रतिक्रिया या चांगल्याच असतील असे नाही. तेव्हा सहनशीलता ठेवा. व्यवसायात गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाने कामात लक्ष द्यावे. आर्थिक ताणतणाव येणार नाहीत याची काळजी घ्या. कौटुंबिक वादविवाद टाळा. प्रकृतीकडे लक्ष द्या.

वृषभ

दिनांक २१, २२, २३ हे तीन दिवस काय करावे काय करू नये याविषयी मनात गोंधळ राहील; कारण कामाचा व्याप वाढणार आहे. शिवाय काम करण्यासाठी वेळ मिळणार नाही. काम वेळेतच होईल याची शक्यता कमी आहे. जे काम ठरवलेले आहे त्या कामाव्यतिरिक्त काम करावे लागेल. त्यामुळे ठरवलेली कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत. परिणामी तुमची धावपळ होईल. स्वत:साठी वेळ मिळणार नाही. पण इतरांसाठी वेळ द्यावा लागेल. वादविवादापासून लांब राहा. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. कामात नोकरदार वर्गाला इतरांची मदत मिळेल ही अपेक्षा सोडून द्या. आर्थिकदृष्ट्या नियोजन करा. राजकीय क्षेत्रात कामासंदर्भात चर्चा होतील. मित्र-मैत्रिणींशी जेवढ्यास तेवढे राहा. जोडीदाराची साथ मिळेल. योग साधनेला महत्त्व द्या. आरोग्याकडे लक्ष द्या.

मिथुन

दिनांक २४, २५ हे दोन दिवस फारसे अनुकूल नाहीत. या दिवसांत महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करा, कारण फायदा कमी आणि नुकसान जास्त असा हा कालावधी आहे. या कालावधीत नियमांचे पालन करा. इतरांनी सांगितले म्हणून केले असे करू नका. प्रत्येक गोष्टीत व्यावहारिक राहणे महत्त्वाचे राहील. भावनिक गोष्टींपासून लांब राहा. इतरांकडून अपेक्षा ठेवू नका, म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात चढउतार राहिला तरी फायद्याचे प्रमाण चांगले असेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे बोलणी खावी लागतील. आर्थिक बचत करणे योग्य राहील. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. मुलांना हव्या असणाऱ्या गोष्टींची पूर्तता कराल. घरगुती वातावरण ठीक राहील. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. प्रकृतीची काळजी घ्या.

कर्क

या सप्ताहात सर्व दिवस चांगले आहेत. जे काम हाती घ्याल ते पूर्णत्वाला जाईल. प्रत्येक कामाला गती येईल. मात्र स्वत:साठी वेळ देता येणार नाही. धावपळीचा कालावधी आहे हे लक्षात ठेवा. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार आहे. म्हणजेच जे ठरवणार आहे ते तर काम होणार. शिवाय जे अपेक्षित नाही तेही काम होणार. इतरांची मदत मिळेल. येणारे प्रस्ताव स्वीकारा. ते चांगले असतील. व्यवसायातील आवक वाढेल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिक बाबतीत समाधानाची बाब राहील. समाजसेवेची आवड राहील. नातेवाईकांशी मनमोकळेपणाने गप्पा माराल. कौटुंबिक वादविवाद मिटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. धार्मिक गोष्टींसाठी वेळ द्यावा लागेल. मन प्रसन्न ठेवा.

सिंह

सप्ताहात अडथळा आणणारा असा कोणताच दिवस नाही, त्यामुळे काम करावेसे वाटेल. ज्यावेळी इतरांनी मदत करावी अशी अपेक्षा असते त्यावेळी ती मदत मिळत नाही. सध्या मात्र ही अपेक्षा नसतानासुद्धा मदत मिळणार आहे. तेव्हा या संधीचा फायदा घ्या आणि कामाला लागा. जी कामे बाकी आहेत त्या कामांचा आढावा घ्या. ती कामे पूर्ण होतील. सर्व दिवस चांगले असतील. व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतील. फायद्याचे प्रमाण हे चांगले असेल. नोकरदार वर्गाला नवीन संधी मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. नातेवाईकांशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे हलके वाटेल. भावंडांची मदत मिळेल. धार्मिक कार्य पार पाडाल. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती उत्तम राहील.

कन्या

शुभ ग्रहांची साथ उत्तम राहील. कोणत्याही कामासाठी संघर्ष करावा लागणार नाही. परिणामी तुमचा कामातील उत्साह टिकून राहील. ज्यावेळी तुम्हाला काहीच करण्याची मानसिकता नसते अशावेळी चांगले प्रस्ताव येतात. त्यावेळी तुम्हाला नाही म्हणावेसे वाटत नाही असेच प्रस्ताव येणार आहेत. हे प्रस्ताव आगामी काळासाठी चांगले असतील. चांगल्या कामासाठी उशीर करू नका. व्यवसायात मोठी उलाढाल होईल. नोकरदार वर्ग कामकाज व्यस्त राहील. आर्थिक व्यवहार चोख ठेवा. राजकीय क्षेत्रात अनपेक्षित घटना घडतील आणि त्या चांगल्याही असतील. भावंडांना वेळ देता येईल. शेजाऱ्यांना मदत कराल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. घरगुती वातावरण चांगले राहील. मानसिक समाधान लाभेल. मन प्रसन्न असल्याने तुमचे आरोग्यही उत्तम राहील.

तूळ
दिनांक १९, २० हे संपूर्ण दोन दिवस व २१ तारखेला दुपारपर्यंत असा हा अडीच दिवसांचा कालावधी चांगला कसा जाईल ते पाहा. कारण या दिवसांत नको तो व्याप मागे लागू शकतो. हे दिवस चांगले कसे जातील ते पाहा. कारण या दिवसांत तुम्हाला नको त्या गोष्टींचा सोक्षमोक्ष करायचा आणि त्रास वाढवून घ्यायचा अशीच मानसिकता होते; तेव्हा एखाद्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला जाऊ नका. परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. अनावश्यक गोष्टी टाळा. मानसिक समतोल साधण्याचा प्रयत्न करा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील परिस्थितीचा आढावा घ्या. नोकरदार वर्गाला कामाचे नियोजन करावे लागेल. आर्थिक व्यवहार जपून करा. सार्वजनिक ठिकाणी सहभाग राहील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. जोडीदाही आनंदी असेल. आध्यात्मिक गोष्टींची आवड राहील. प्रकृती ठीक राहील.

वृश्‍चिक

दिनांक २१, २२, २३ हे तीन दिवस टांगती तलवार आहे असे समजा. असे ग्रहमान असले की तुमची मानसिकता बिघडून जाते. चांगल्या असलेल्या गोष्टी तुम्ही स्वत:च बिघडून घेता. एखाद्याने चांगला सल्ला जरी दिला तरी तुम्ही त्याचा गैरसमज निर्माण करून घेता आणि वातावरण बिघडून ठेवता. कोणत्याही गोष्टीत योग्य पर्याय स्वीकारा, म्हणजे त्रासाचे प्रमाण कमी होईल. आपलेच खरे, आपणच बरोबर, मी म्हणेल तेच बरोबर असे करू नका. सध्या वेळ बरोबर नाही. इतरांचे मत ऐकून घ्या. नाही पटले तर त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. बाकी दिवस चांगले असतील. सध्या तरी नवीन व्यवसायाची सुरुवात नको. नोकरदार वर्गाने कामात पूर्णपणे लक्ष द्यावे. आर्थिक व्यवहार जपून करा. संततीचे लाड करा, शिस्त बिघडू देऊ नका. जोडीदाराचा सल्ला घ्या. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. प्रकृती जपा.

धनु

दिनांक २४, २५ हे दोन दिवस शुभ नाहीत. या दिवसांत महत्त्वाचे कोणतेही कार्य करू नका. थोडे थांबा. चांगल्या दिवसांत हे महत्त्वाचे काम तुम्ही करू शकता, पण नेहमी तुमची मानसिकता दिवस शुभ नसेल अशाच दिवशी महत्त्वाचे काम करण्याची राहते. ओढूनताणून तुम्ही काही गोष्टी करता आणि त्याचा त्रास तुम्हाला स्वत:लाच होतो. आपल्याला जमले नाही तरी इतरांकडून करून घ्यायचे अशी तुमची अवस्था होते. पण स्वत:वर नियंत्रण ठेवायला शिका. हे नियंत्रण ठेवले तर बाकी सर्व दिवस चांगले जातील. व्यवसायात रोखीचे व्यवहार करा. नोकरदार वर्गाने वरिष्ठांचे मत जाणून घ्यावे. खर्च सांभाळा. राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग येईल. मित्र-मैत्रिणींशी संवाद साधाल. संततिसौख्य लाभेल. घरगुती वातावरण ठीक राहील. धार्मिक कार्य कराल. प्रकृतीची काळजी घ्या.

मकर

भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. असे भ्रमण म्हणजे दुधात साखर. मग वेळ कशाला घालवता, चांगले दिवस आहेत. चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागणार नाही. पण तुमची मानसिकता चांगल्या कामापेक्षा करमणुकीकडे वेळ कसा घालवायचा अशीच असेल. मनसोक्तपणे आपल्याला वाटेल अशा गोष्टी करायच्या. त्याचा आनंद घ्यायचा आणि दिवस पुढे ढकलायचे ही सध्या तरी मानसिकता बदला. आपल्याला आपले ध्येय पूर्ण करायचे आहे हे विसरू नका. या कालावधीत भाग्य साथ देईल. व्यवसायात अपेक्षित फायदा होईल. नोकरदार वर्गाला कामाचा अंदाज येईल. आर्थिक मजबुती येईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. मित्र-मैत्रिणींना वेळ देता येईल. संततीचे लाड पुरवाल. घरगुती वातावरण चांगले राहील. प्रकृती साथ देईल. आनंदी राहाल.

कुंभ

दिनांक १९, २० हे दोन दिवस चढउताराचे असणार आहेत. या दिवसांत इतरांच्या वागण्या-बोलण्याकडे लक्ष देऊ नका, म्हणजे त्रास होणार नाही. कारण असे दिवस असले की समोरच्यांकडून आपल्याला त्रास होतो हे लक्षात ठेवा. अशा वेळी अशा व्यक्तींच्या नादी न लागलेले चांगले. उद्याचे काम आजच करण्याची मानसिकता ठेवा, म्हणजे अशा गोष्टींसाठी वेळ देता येणार नाही. या गोष्टी आपल्याला जमणार नाहीत अशा गोष्टींची हमी घेऊ नका. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातून मिळणारा फायदा चांगला असेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांची शाब्बासकी मिळेल. आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होईल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. कार्यक्रमानिमित्त नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांना मदत कराल. धार्मिक कार्याची आवड राहील. मानसिक ताणतणाव घेऊ नका.

मीन

दिनांक २१, २२, २३ या तीन दिवसांत मनाविरुद्ध घटना घडू शकतात, त्यामुळे तुमचा राग अनावर होईल. एखाद्या व्यक्तीची चूक असो किंवा नसो, मात्र तुम्ही राग समोरच्या व्यक्तीवर काढता आणि त्रास करून घेता. तेव्हा लक्षात ठेवा. संयम ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुम्ही अशा कालावधीत संयम ठेवलात तर त्रास होणार नाही. ज्या गोष्टी तुम्हाला जमणार नाहीत अशा गोष्टी इतरांनी कराव्यात ही अपेक्षा ठेवू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. भागीदारी व्यवसायातून फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाचे कामकाज धावपळीचे राहील. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करू नका. नातेवाईकांशी संपर्क वाढेल. जोडीदाराकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल. कुटुंबाचा आदर करा. प्रकृतीची काळजी घ्या.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *