लेखणी बुलंद टीम:
मेष
सप्ताहातील सर्व दिवस चांगले आहेत. ज्या वेळी सर्व दिवस चांगले असतात त्या वेळी वेळ वाया घालवू नका. चांगल्या कामाचा श्रीगणेशा लवकरच करा. इतरांवर अवलंबून राहू नका, नाहीतर वेळ होऊ शकतो. स्वत:चे काम स्वत: करा, म्हणजे कामे मार्गी लागतील. त्यामुळे तुम्हाला काम करण्यासाठी स्फूर्ती मिळेल. उत्साहाचे वातावरण निर्माण राहील. पौर्णिमा कालावधी धडाडीचा राहील. व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक कराल. नोकरदार वर्गाचे काम सुरळीत चालू राहील. आर्थिकबाबतीत जो ताणतणाव येत होता तो जाणवणार नाही. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने संवाद साधाल. शेजाऱ्यांशी मात्र जेवढ्यास तेवढे राहा. धार्मिक गोष्टींसाठी वेळ द्या. मानसिकता चांगली राहील. आरोग्य साथ देईल.
वृषभ
शुभ ग्रहांची साथ उत्तम राहील. काही वेळेला काम पूर्ण होवो किंवा न होवो, तुम्हाला स्वप्न बघायला मात्र फार आवडतात; आणि सध्या खरंच चांगल्या गोष्टी घडल्यामुळे तुम्हाला असे वाटेल हे स्वप्नच आहे. मात्र प्रत्यक्षात चांगल्या गोष्टी घडणार आहेत ते लक्षात ठेवा. कुठे आणि कसे नशीब साथ देईल हे सांगू शकत नाही. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करण्याची वेळ येणार आहे. समोरून येणारे प्रस्ताव चांगले असतील. संधी आलेली आहे ती सोडायची नाही, असे विचार मनात येतील. पौर्णिमा धनस्थानातून होत आहे. या दिवशी नक्कीच धनस्थान मजबूत होणार आहे. व्यवसायातील नफा चांगला असेल. नोकरदार वर्गाची कामाची नवीन जबाबदारी वाढेल. आर्थिक लाभ होईल. समाजमाध्यमांद्वारे प्रतिष्ठा वाढेल. घरगुती वातावरण चांगले राहील. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन
‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’ खरेच सध्या असाच आनंद असणार आहे. म्हणजे आपण जे ठरवू तेच होणार. आपल्या ज्या इच्छाअपेक्षा आहेत त्या पूर्ण होणार आहेत. कोणाच्या मागे लागण्याची वेळ येणार नाही. उलट इतरांनाच मदत करण्याची तुमची मानसिकता होईल आणि तुम्ही ते कराल. पौर्णिमा तुमच्या राशीतूनच होत आहे. ज्या कामाला हात घालाल त्या कामांमध्ये यश मिळेल हे मात्र निश्चितच आहे. व्यावसायिक लाभ होईल. नोकरदार वर्गाचा रुबाब वाढेल. आर्थिकदृष्ट्या कोणतेही व्यवहार हे रोखीने होतील. समाजसेवेची आवड नसली तरी समाजसेवा करावी लागेल. नात्यातील दुरावा कमी होईल. शेजाऱ्यांविषयी आपुलकी वाटेल. जोडीदारासोबत बोलता बोलता काही वेगळे वळण लागणार नाही याची काळजी घ्या. म्हणजेच जुने वादविवाद टाळा. आरोग्य चांगले राहील.
कर्क
दिनांक १२, १३ हे दोन दिवस अळीमिळी गुपचिळी असे वातावरण ठेवा. काही गोष्टी तुम्हाला पटणाऱ्याच नसतील, पण त्याकडे सरळ दुर्लक्ष करा. कारण तुम्ही एखाद्याला चांगला सल्ला द्यायला गेलात तर तो तुमच्यावरच उलटणार आहे. मग त्यापेक्षा शांत बसलेले चांगले. दुसऱ्याने काय करावे काय करू नये याचा सल्ला सध्या तरी देऊ नका. आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. पौर्णिमा कालावधीत वादविवाद टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मत ग्राह्य धरावे लागेल. आर्थिकगोष्टींचे तोंडी व्यवहार टाळा. राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा अंदाज घ्या. जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जा. योगसाधनेला महत्त्व द्या. प्रकृती उत्तम राहील.
सिंह
दिनांक १४, १५ हे संपूर्ण दोन दिवस व १६ तारखेला दुपारपर्यंत असा कालावधी चांगला कसा जाईल ते पाहा. कारण या दिवसांत नको त्या गोष्टीला वाटा फुटतात; आणि ज्या गोष्टी करायच्या नाहीत अशाच गोष्टी समोर येतात. अशा कालावधीत सहनशीलता वाढवा. कोण काय म्हणेल याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वत:ला त्रास होणार नाही या गोष्टींची जास्त काळजी घ्या. कोणाच्याही वैयक्तिक गोष्टीवर चर्चा करू नका. म्हणजे त्या गोष्टी तुमच्या अंगलट येणार नाहीत. बाकी दिवस चांगले असतील. पौर्णिमा कालावधी लाभदायक असेल. व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना भान ठेवा. नोकरदार वर्गांना चांगले काम मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा. संततीचे लाड करा, पण शिस्त बिघडू देऊ नका. जोडीदाराची मदत मिळेल.
कन्या
दिनांक १६, १७, १८ हे तीन दिवस चढउतारांचे राहतील. या दिवसांत तुमची भूमिका स्पष्ट राहील. तुम्ही मागचापुढचा कोणताही विचार करणार नाही. जे शब्द तुमच्या जिभेवर घोळतील ते तुम्ही स्पष्ट बोलून दाखवाल, त्यामुळे वादविवाद होऊ शकतात. याचा त्रास सर्वात जास्त तुम्हालाच होईल. कारण वेळ निघून गेल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की आपण उगीचच एवढा त्रास करून घेतला. तेव्हा संयम ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. पौर्णिमा कालावधीत ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. व्यवसायातील आवकजावक पाहून निर्णय घ्या. नोकरदार वर्ग व्यस्त राहील. आर्थिक बचत करणे योग्य राहील. समाजसेवा करताना दूरदृष्टी हवी. मुलांसाठी वेळ द्याल. जोडीदाराचा आदर करा. प्रकृती जपा.
तूळ
भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण लाभदायक राहील. खरेच हे शुभ भ्रमण शुभ असणार आहे का? तर हो! याचा अनुभव तुम्हाला येणार आहे. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करूनही यश मिळत नाही. सध्या मात्र फार ताकद लावावी लागणार नाही. सहजपणे कामे मार्गी लागतील. परिणामी तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की, ज्या गोष्टींसाठी इतका त्रास करून घेतला आणि ती काही क्षणातच पूर्ण झाली असेच हे वातावरण असणार आहे. या सप्ताहात नावलौकिक होईल. पौर्णिमा कालावधी शुभ असेल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. नोकरदार वर्गाला नवीन संधी मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. मित्र-परिवारासाठी वेळ काढाल. घरगुती वातावरण चांगले राहील. धार्मिक कार्यात सहभाग राहील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक
दिनांक १२, १३ हे दोन दिवस तुम्हाला फारसे चांगले नाहीत. तेव्हा या दिवसांत नको तो व्याप वाढवून घेऊ नका. जे चालले आहे ते चांगले असे समजून पुढे चला, म्हणजे त्रास होणार नाही. त्यावर काही बोलत बसू नका. इतरांच्या मर्जीने असे हे दोन दिवस पुढे ढकला. त्याने तुमचे काहीही बिघडत नाही. मात्र माझेच बरोबर, याप्रमाणेच झाले पाहिजे असे करू नका. मग गोष्टी बिघडू शकतात, त्यापेक्षा शांत राहा. पौर्णिमा कालावधीत वादविवाद टाळा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. आर्थिक नियोजन व्यवस्थित करा. राजकीय क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया टाळा. नातेवाईकांशी संवाद साधाल. कुटुंबाचा आदर करा. मानसिक ताण-तणाव घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या.
धनु
दिनांक १४, १५ हे संपूर्ण दोन दिवस व १६ तारखेला दुपारपर्यंत असा हा अडीच दिवसांचा कालावधी अनुकूल कसा जाईल ते पाहा. दिवस चांगले असो किंवा वाईट असो, तुमच्या शब्दातली धार काही कमी होत नाही. मग असे दिवस असल्यानंतर तर तुमचा रागाचा पारा खूप वाढतो. आपल्या मर्जीनेच इतरांनी वागावे हे पहिले डोक्यातून काढून टाका. एखादे काम कमी करा, पण दुसऱ्याला कमी लेखू नका. बोलताना शब्द जपून वापरा. बाकी दिवस चांगले असतील. पौर्णिमा कालावधी ठीक राहील. मात्र या कालावधीत जोडीदाराचा आदर करा. व्यावसायिक उलाढाल वाढेल. नोकरदार वर्गाला कामाचा व्याप कमी होईल. आर्थिकदृष्ट्या अनावश्यक खर्च टाळा. समाजसेवा करा, पण फळाची अपेक्षा ठेवू नका. नातेवाईकांशी दुरावा येणार नाही याची काळजी घ्या. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
मकर
षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण म्हणजे बरेचसे दिवस अनुकूल नसतात. अशा दिवसांत बऱ्याच काही गोष्टी मनामध्ये येतात आणि काहीही नियोजन न करता आपण ते काम करून बसतो आणि त्यात नुकसान होते. मग चिडचिड होते. राग येतो. समोरच्याला स्पष्ट शब्दांत सुनावले जाते. असे वाटते, सध्या ग्रहमान चांगले नाही. अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कोणतेही काम करताना नियोजन हवे. नियोजनाअभावी केलेले काम वाया जाईल. वेळेत काम पूर्ण झाले पाहिजे. वेळेचे भान ठेवा. पौर्णिमा कालावधीत बेकायदेशीर गोष्टींपासून लांब राहा. व्यवसायात मोठा व्याप सध्या तरी नको. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नये. कौटुंबिक वादविवाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ
दिनांक १४, १५ हे संपूर्ण दोन दिवस व १६ तारखेला दुपारपर्यंत असे हे दिवस शुभ नाहीत. तेव्हा या दिवसांत महत्त्वाचे काम करू नका. कोणतेही करार करताना मागील गोष्टींचा अनुभव विसरू नका. एक घाव दोन तुकडे करणे योग्य राहणार नाही. आपल्यालाच शांतपणे मत मांडावे लागणार आहे. जबाबदारी घेताना आपल्याला ती झेपणार आहे का, याचा पहिला विचार करा. दिलेला शब्द पाळा, म्हणजे नुकसान होणार नाही. पौर्णिमा कालावधी चांगला असेल. बाकी दिवसही चांगले असतील. व्यवसायातून जास्त उत्पन्न मिळावे म्हणून जाहिरात माध्यमांसाठी खर्च करू नका. नोकरदार वर्गाची कामातून सध्या तरी सुटका होणे शक्य नाही. खर्च जपून करा. मुलांच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्या. मित्र-मैत्रिणींशी जेवढ्यास तेवढे राहा. घरगुती वातावरण ठीक राहील. आरोग्याची काळजी घ्या.
मीन
१६ तारखेला दुपारनंतर व दिनांक १७ व १८ संपूर्ण दोन दिवस अशा या अडीच दिवसांच्या कालावधीत जपून पाऊल टाका. प्रत्यक्षात तुम्ही जोपर्यंत एखादी गोष्ट पाहत नाही तोपर्यंत त्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. अंदाजे तर्कवितर्क लावू नका. घेतलेले निर्णय योग्यच असतील असे नाही. काही वेळेस नुकसान होण्याची शक्यता असते. अशा वेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. पौर्णिमा कालावधी चांगला जाईल. बाकी दिवसही चांगले असतील. व्यवसायात भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय फसू शकतात. तेव्हा भावनिक होऊ नका. नोकरदार वर्गाने वरिष्ठांचे मत ऐकून घ्यावे, त्यावर प्रतिउत्तर करू नये. खर्चाची बाजू सांभाळा.