साप्ताहिक राशिभविष्य

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मेष
( १५ ते २१ सप्टेंबर २०२४ )

दिनांक १८, १९ या दोन दिवसांत कोणतेही महत्त्वाचे काम करू नका, ते पुढे ढकला. सध्या ‘आपण भले नि आपले काम भले’ हे सूत्र लक्षात ठेवावे लागेल. कोणतेही काम करताना आळस करून चालणार नाही. काय करावे काय करू नये हे काही सुचणार नाही. चंचल वृत्ती राहील. एखादे काम कमी करा, पण नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. पौर्णिमा कालावधी चांगला असेल. बाकी दिवसही चांगले असतील. व्यवसायातून उत्पन्न चांगले मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. वायफळ खर्च टाळा. समाजमाध्यमांचा वापर करताना दूरदृष्टीपणा ठेवा. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे हलके वाटेल. संतती सौख्य लाभेल. घरगुती वातावरण चांगले राहील. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहाल. प्रकृती स्वास्थ्य जपा.

वृषभ
( १५ ते २१ सप्टेंबर २०२४ )

दिनांक २०, २१ हे दोन दिवस चिंता वाढवणारे आहेत. या दिवसांत स्वत:साठी वेळ देता येणार नाही, त्यामुळे चिडचिड होऊ शकते. पण या दिवसांत विश्रांती घेणे गरजेचे राहील. कोणतेही व्यवहार करताना घाई करू नका, त्यामुळे नुकसान होणार नाही. बाकी दिवसांच्या कालावधीत शुभ ग्रहांचे संकेत उत्तम मिळतील. कोणत्याही प्रकारचा संघर्ष जाणवणार नाही. आपण म्हणाल ती पूर्व दिशा असेल. कामाला गती येणार आहे. अनेक माध्यमातून यश मिळेल. पौर्णिमा कालावधी उत्तम असेल. व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतील. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. आर्थिकदृष्ट्या व्यवहार पूर्ण होतील. सार्वजनिक ठिकाणी वेळ द्यावा लागेल. घरगुती वातावरण चांगले राहील. आरोग्य चांगले राहील.

मिथुन
( १५ ते २१ सप्टेंबर २०२४ )

दिनांक १५ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांच्या कालावधीत चंद्रग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. सप्ताहात दिवस चांगले असतील. चांगले दिवस म्हणजे आता चिंता करण्याचे कारण नाही. या दिवसांत चांगल्या कामाचा श्री गणेशा होईल. इतरांकडून आतापर्यंत जी तुम्हाला अपेक्षा होती आणि ती पूर्ण होत नव्हती ती आता पूर्ण होईल. कामे वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा आनंद वाटेल. व्यवसायातील परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली राहील. नोकरदार वर्गाला कामाचे स्वरूप कळाल्यामुळे काम करणे सोपे जाईल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. नवीन ओळखीचा फायदा होईल. नातेवाईकांच्या शुभेच्छा पाठीशी राहतील. भावंडांची साथ मिळेल. आरोग्य चांगले राहील.

कर्क
( १५ ते २१ सप्टेंबर २०२४ )

दिनांक १६, १७ या दोन दिवसांत कोणतेही काम करताना तडजोड स्वीकारा. स्वत:च्या इच्छा, अपेक्षा मर्यादित ठेवा. एखादी गोष्ट म्हणण्यापेक्षा काही गोष्टी पटणारच नाहीत म्हणून वादविवाद करणे योग्य राहणार नाही. न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे, तरच पुढील घडी सुरळीत चालू राहील. अन्यथा चांगल्या दिवसांमध्येसुद्धा दिवस चांगले आहेत असे वाटणार नाही. त्यामुळे सावरणे गरजेचे राहील. पौर्णिमा कालावधीत सतर्कता बाळगा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातील आवक वाढेल. नोकरदार वर्गाचे कामाचे नियोजन पक्के असेल. आर्थिकदृष्ट्या सक्षम बनाल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या घडामोडी होतील. नातेवाईकांशी जेवढ्यास तेवढा संवाद ठेवा. भावंडाशी मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. आहार सांभाळा.

सिंह
( १५ ते २१ सप्टेंबर २०२४ )

षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण म्हणजे दुधात मिठाचा खडा. प्रत्येक गोष्टीत माझेच खरे करून चालणार नाही. सध्या आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात ठेवा. एखादे काम मनासारखे झाले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका. सध्या उशीर होणारे ग्रहमान आहे. शिवाय अडथळाही येण्याची शक्यता आहे, त्यामुळे नियोजन करून काम करा म्हणजे त्रास होणार नाही. प्रत्येक गोष्टीत तडजोड स्वीकारावी लागेेल. पौर्णिमा कालावधी ठीक राहील. व्यवसायात जे चालले आहे ते योग्य आहे असे समजून पुढे चला. नोकरदार वर्गाने कामात पूर्णपणे लक्ष घाला. आर्थिकदृष्ट्या उधारीचे व्यवहार करणे टाळा. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करू नका. नातेवाईकांशी संवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य जपा. प्रकृतीची काळजी घ्या.

कन्या
( १५ ते २१ सप्टेंबर २०२४ )

दिनांक १६, १७, २०, २१ अशा या चार दिवसांत संयम ठेवावा लागेल. कारण या दिवसांत अशा काही गोष्टी समोर येतील, त्या तुम्हाला पटणाऱ्या नसतील. त्यामुळे तुम्ही तुमची प्रतिक्रिया पटकन देऊ नका, वाद निर्माण होतील. प्रतिक्रिया देणे टाळा. सध्या आपल्याला शांत बसायचे आहे हे लक्षात ठेवा. तुमचे मत योग्य जरी असले तरी ते इतरांना पटेल असे नाही. धरसोड वृत्तीमुळे काय निर्णय घ्यावे हे सुचणार नाही. अशा वेळी निर्णय पुढे ढकललेले चांगले. पौर्णिमा कालावधीत वादविवाद टाळा. व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत हस्तक्षेप करू नये. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करा. जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जा. म्हणजे नुकसान होणार नाही.प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा.

तूळ
( १५ ते २१ सप्टेंबर २०२४ )

दिनांक १८, १९ हे दोन दिवस फारसे अनुकूल नाहीत आणि अशाच वेळी काही प्रस्ताव येतात. हे प्रस्ताव तुम्हाला स्वीकारावेसे वाटतात. तुम्ही मागचापुढचा विचार न करता ते स्वीकारता आणि नुकसान करून घेता असे हे दोन दिवस आहेत. त्यामुळे या दोन दिवसांत कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना विचार करा. तुमच्याकडे किती जरी हुशारी असली तरी या दिवसांत ती उपयोगाची नाही. कारण भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घ्यावेसे वाटतात. तेव्हा धीर धरा. पौर्णिमा कालावधी उत्तम राहील. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात अनोळख्या व्यक्तीशी व्यवहार करताना जपून राहा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

वृश्चिक
( १५ ते २१ सप्टेंबर २०२४ )

दिनांक २०, २१ हे दोन दिवस चांगले कसे जातील ते पाहा. कारण या दिवसांत तुम्हाला एखादी गोष्ट बोलायची नाही, पण परिस्थिती अशी निर्माण होईल की तुम्हाला ती गोष्ट बोलायलाच लागेल. असे स्पष्ट बोलल्यामुळे समोरच्याला तुमचा राग येणार आणि वादाची परिस्थिती निर्माण होणार. पण स्वत:वरती नियंत्रण ठेवा. सध्या हे दोन दिवस चांगले नसल्यामुळे या दिवसांत काही बोलायला जाऊ नका. शांत राहा. वेळेचे भान ठेवा.पौर्णिमा कालावधी ठीक राहील. बाकी दिवस उत्तम असतील. व्यवसायात चढ-उतार जाणवेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या मर्जीने काम करावे लागेल. आर्थिकदृष्ट्या बचत करणे योग्य राहील. घरच्यांशी संवाद जपून करा. संततीची काळजी घ्या. स्वत:चे आरोग्यही जपा.

धनु
( १५ ते २१ सप्टेंबर २०२४ )

सध्या सप्ताहात सर्व दिवस चांगले आहेत. पौर्णिमा कालावधीत शेजाऱ्यांशी जेवढ्यास तेवढे राहा. चांगले दिवस म्हणजे कामातील अडथळा कमी, एखाद्या वेळी ठरवूनसुद्धा काम वेळेत होत नाही. सध्या मात्र ध्यानीमनी नसतानासुद्धा कामे वेळेत होऊ शकतात, त्यामुळे तुमचा कामातील उत्साह वाढेल. कोणत्याही गोष्टीत आळस वाटणार नाही. दिवस चांगले असतात. त्या वेळी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे भान राहत नाही. तुम्हाला ज्या गोष्टींची आवड आहे असेच कार्य तुम्ही कराल. व्यवसायातून उत्पन्न चांगले मिळेल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी मिळेल. आर्थिक ताण कमी होईल. समाजसेवेची आवड राहील. संततीचे आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक सौख्य मिळेल.

मकर
( १५ ते २१ सप्टेंबर २०२४ )

या सप्ताहात असा कोणताच दिवस नाही की तो दिवस अनुकूल नसेल. सध्या सप्ताहात सर्व दिवस चांगले आहेत. मनोबल वाढेल. चांगल्या दिवसांमध्ये वेळ वाया न घालवता महत्त्वाची कामे करून घ्या. कारण ज्या वेळी वेळ चांगली नसते त्या वेळी तुम्ही ही कामे करायला जाता आणि अडथळा निर्माण होतो. त्यामुळे तुमची मानसिकता बिघडते. सध्या सर्व गोष्टी चांगल्या असताना हातावर हात ठेवून बसणे आगामी काळासाठी तोट्याचे असेल. कामाला लागा. प्रश्न मार्गी लागतील.पौर्णिमा कालावधीत लाभ होईल. व्यवसायातील संघर्षदायक वातावरण कमी होईल. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीचे प्रस्ताव येतील. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. कोणतेही काम करताना कुटुंबाला विश्वासात घ्या. आरोग्य चांगले राहील.

कुंभ
( १५ ते २१ सप्टेंबर २०२४ )

दिनांक १५ रोजीचा दिवस अनुकूल नाही. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. पौर्णिमा तुमच्या राशीतूनच होत आहे. काही कामांमध्ये प्रयत्न करूनही काम मार्गी लागत नव्हते. सध्या काम मार्गी लागेल. स्वत:च्या कामाची जबाबदारी इतरांवर सोपवण्याची वेळ येणार नाही. स्वत:चे अस्तित्व स्वत: निर्माण कराल. इतरांचे मार्गदर्शन मिळेल. गोष्टी जमेच्या ठरतील. शुभ गोष्टींची सुरुवात ह़ोईल. ज्या गोष्टींची आवड आहे त्यातच रममाण व्हाल. व्यवसायात कर्ज काढून जी गुंतवणूक केली होती त्यातून नफ्याचे प्रमाण चांगले राहील. शासकीय नोकरदार वर्गाला सुविधांचा उपभोग घेता येईल.आर्थिक मदत मिळेल. नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. भावंडांशी संवाद साधाल. शेजाऱ्यांना मदत कराल. जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

मीन
( १५ ते २१ सप्टेंबर २०२४ )

दिनांक १६, १७ या दोन दिवसांत विनाकारण भटकंती करणे टाळा. मनामध्ये नियोजन नसताना काहीही केले तर इथे मात्र नुकसानीचे सावट निर्माण होईल. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणतेही काम करताना नियोजनाला महत्त्व द्या, त्यामुळे कामातील अडचणी कमी होतील. ज्या गोष्टीतून काहीच फायदा होणार नाही अशा गोष्टींचा मोह सोडून द्या. न झेपणारी जबाबदारी घेऊ नका. बेकायदेशीर गोष्टींपासून लांब राहा. पौर्णिमा कालावधीत कोणताही व्यवहार करू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातील आवकजावक लक्षात घेऊन गुंतवणूक करा. नोकरदार वर्गाच्या कामातील त्रुटी दूर होतील.आर्थिक बाबतीत काटकसर करा. मुलांच्या बाबतीत घेतलेले निर्णय योग्य असतील. कुटुंबातील मतभेद दूर होतील. जोडीदाराचा आदर करा. योगसाधनेला महत्त्व द्या.

 

 

 

(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *