लेखणी बुलंद टीम:
मेष
षष्ठ स्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. अशा कालावधीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. कारण घाईगडबडीने घेतलेले काही निर्णय चुकू शकतात. वेळ गेल्यानंतर पश्चात्ताप करत बसण्यात अर्थ नाही; तेव्हा आधीच सावधानता बाळगा. एखादे काम कमी झाले तरी चालेल, पण शांतपणे निर्णय घ्या. इतरांनी काय करावे काय करू नये यापेक्षा आपल्याला स्वत:ला काय करायचे आहे ते पाहा. सध्या आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. प्रत्येक गोष्टीत सहनशीलता बाळगा. व्यवसायात जे चालले आहे ते ठीक आहे असे समजून पुढे चला. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्यावे. आर्थिक बाबतीत निष्काळजीपणा टाळा. समाजमाध्यमांपासून सावध राहा. जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जा. कुटुंबाची काळजी घ्या. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. प्रकृती जपा.
वृषभ
दिनांक १८, १९ हे संपूर्ण दोन दिवस आणि २२ तारखेला दुपारनंतर असा अडीच दिवसांचा कालावधी अनुकूल नाही. शुभ ग्रहांची साथ कमी आहे असे म्हणायला हरकत नाही. वेळेत काम पूर्ण होईल याची शक्यता कमी आहे, त्यामुळे कामे उशिरा होतील हे गृहीत धरून चाला म्हणजे त्रास होणार नाही. सध्या आपले मत इतरांना पटणारे असेलच असे नाही. त्यामुळे कोणालाही कुठलाही सल्ला न देता शांत राहणे उत्तम. वादविवाद टाळा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात कष्ट वाढतील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मत जाणून घ्यावे लागेल. आर्थिकदृष्ट्या नियोजन केले तर घडी सुरळीत चालू राहील. सध्या राजकीय क्षेत्रात उत्साह वाटणार नाही. मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी धीर धरावा लागेल. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा.
मिथुन
दिनांक २०, २१, २२ असा तीन दिवसांचा कालावधी चांगला कसा जाईल या दृष्टीने प्रयत्न करा. ज्यावेळी असे दिवस असतात, त्यावेळी तुम्हाला नको त्या गोष्टी सुचतात. म्हणजेच जे काम करायचे नाही ते मुद्दामहून करायचे आणि त्रास वाढवून घ्यायचा. त्यापेक्षा धीर धरा. काम वेळाने झाले तरी हरकत नाही. बेकायदेशीर गोष्टींच्या नादी लागू नका. नियम पाळा. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करू नका. दुसऱ्यांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात परिस्थितीनुसार निर्णय घ्या. नोकरदार वर्गाने वरिष्ठांना विश्वासात घेऊन काम करावे. खर्च जपून करा. सार्वजनिक ठिकाणी सहभाग राहील. मित्र-मैत्रिणींसोबत करमणुकीचे बेत आखाल. मुलांना वेळ द्याल. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. उपासना फलद्रूप होईल.
कर्क
सप्ताहात सर्वच दिवस चांगले आहेत. चांगले दिवस असतात त्यावेळी कुठे कमी पडायचे नाही हे लक्षात ठेवा. कारण अशा दिवसांत काम पूर्णच होते. आपण फक्त प्रयत्न वाढवणे गरजेचे असते. जे काम हाती घ्याल ते विनाअडथळा पूर्ण होईल. त्यासाठी इतरांची मदतही मिळेल. प्रत्येक गोष्टीत माझेच खरे, मीच बरोबर हे सूत्र सध्या उपयोगात आणायला हरकत नाही. कारण तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असणार आहे. तेव्हा संधी सोडू नका. व्यवसायात उत्कर्ष होईल. नोकरदार वर्गाला कामामध्ये होणारा त्रास कमी होईल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात मनासारख्या गोष्टी घडतील. मुलांची प्रगती होईल. घरगुती वातावरण आनंदाचे राहील. धार्मिक गोष्टीत तुमचा सहभाग नसला तरी त्यासाठी खर्च कराल. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती उततम राहील.
सिंह
बऱ्याच दिवसातून शुभ ग्रहांची साथ मिळणार आहे असेच म्हणावे लागेल. आत्तापर्यंत ज्या ज्या कामात अडथळा येत होता तो आता येणार नाही. त्यामुळे काम करण्याची मानसिकता राहील. कामातील उत्साह टिकून राहील. एका कामासाठी दोन वेळा हेलपाटे घालावे लागत होते ते आता घालावे लागणार नाहीत. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार आहे. अनपेक्षितपणे आलेले प्रस्ताव चांगले असतील आणि ते स्वीकारा. इतरांना काय वाटते यापेक्षा स्वत:ला काय करायचे आहे या गोष्टींकडे लक्ष द्याल. व्यवसायातील उलाढाल वाढेल. फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. आर्थिक प्रश्न सुटेल. सामाजिक स्नेह वाढेल. घरामध्ये वरिष्ठांचे वर्चस्व राहील. आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
कन्या
या आठवड्यात कोणताच असा दिवस नाही की त्या दिवशी तुम्हाला त्रास होणार आहे. आता फार विचार करण्याची गरज नाही. दरवेळी काय आणि कसे नियोजन करावे याचा विचार मनात घोळत राहायचा. सध्या चिंता करण्याची गरज नाही. कारण कामाचा श्री गणेशा वेळेत पूर्ण होणार आहे. कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. आपली वाहवा होणार आहे, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे स्मितहास्य असणार आहे. बघा, असे ग्रहमान म्हणजे चांगले आहे ना! व्यवसायात मनासारखी परिस्थिती निर्माण होईल. नोकरदार वर्गाला चांगल्या कामाबद्दल शाब्बासकी मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मानसिक समाधान लाभेल.
तूळ
दिनांक १६, १७ हे दोन दिवस म्हणावे असे चांगले नाहीत. या दिवसांत कोणतेही काम करायला जा, त्या कामामध्ये त्रास होणार आणि असे दिवस असले की तुम्ही मात्र जिद्दीने याच दिवसांत काम पूर्ण करण्याचे ठरवता; परंतु ते काम काही पूर्ण होत नाही. परिणामी तुमची चिडचिड होते. तुम्हाला जर हे दिवस अडचणीचे आहेत असे माहीत झाले आहे तर घाईगडबड कशाला करता. सावकाशपणे काम करा, चिडचिड करू नका.
इतरांच्या मदतीशिवाय काम होऊ शकते, पण ते या दिवसांत नाही; जे दिवस चांगले आहेत त्या दिवसांत. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहार जपून करा. नोकरदार वर्गाने कामात लक्ष घालावे. जपून खर्च करा. समाजमाध्यमांचा वापर करताना भान ठेवा. जोडीदाराचा सल्ला घ्या. प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा.
वृश्चिक
१७ तारखेला दुपारनंतर आणि दिनांक १८ व १९ संपूर्ण दोन दिवस असा हा अडीच दिवसांचा कालावधी चढउतारांचा असणार आहे. असे दिवस असले की तुमची मानसिकताही चढउताराची राहते. रागावर नियंत्रण राहत नाही आणि तुम्ही वाट्टेल ते बोलता. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की असे वागल्याने तुमचेच नुकसान होऊ शकते. त्यापेक्षा आपले मत कोणावर लादू नका. सध्या ही वेळ चांगली नाही असे समजून सोडून द्या.
बोलताना शब्द जपून वापरा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये कामे मार्गी लागतील. व्यवसायात नफ्याचे प्रमाण चांगले राहील. आर्थिक व्यवहार जपून करा.
धनु
दिनांक २०, २१, २२ हे तीन दिवस टांगती तलवार आहे असे समजा. एका गोष्टीतून बाहेर पडला की दुसरी गोष्ट उभी राहील. अशा वेळी तुमचे मानसिक संतुलन हरवते. काय करावे, काय करू नये याचे भान राहत नाही. नुकसान झाले तरी चालेल, पण मी म्हणेन तेच बरोबर अशी वृत्ती निर्माण होते आणि स्वत:चं नुकसान करून घेता. तेव्हा पुढे जाऊन त्रास करून घेण्यापेक्षा एक पाऊल मागे या, म्हणजे त्रास कमी होईल. कोणतेही काम करताना नियोजन करायला शिका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात व्यवहार करताना दूरदृष्टी हवी. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. आर्थिक बचत करणे योग्य राहील. राजकीय क्षेत्रात चर्चा करणे टाळा. घरगुती वातावरण ठीक राहील. योगसाधनेला महत्त्व द्या.
मकर
भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण अतिशय लाभदायक आहे. बरेच दिवस काम एके काम असेच वातावरण होते. इकडेतिकडे बघायलाही वेळ नव्हता आणि असला तरी तो अनेकांच्या समस्या सोडवण्यातच जात होता. त्यात तुमचीही समस्या असायची. सध्या ना कोणती समस्या, ना अडचण. बघा दिवस कसे चांगले आहेत. चांगल्या दिवसांचा सुखद अनुभव येईल. ज्या गोष्टींचे स्वप्न आत्तापर्यंत पूर्ण होत नव्हते ते पूर्ण होणार आहे. व्यवसायात मागील काही दिवस त्रासाचे असले तरी सध्या सप्ताह फायदा मिळवून देणार आहे. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष देता येईल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रातील ताणतणाव कमी होईल. घरच्यांचा पाठिंबा राहील. एकूणच सप्ताह भाग्योदयाचा असेल, त्यामुळे मन प्रसन्न राहील. प्रकृती उत्तम राहील.
कुंभ
दिनांक १६, १७ हे दोन दिवस शुभ नाहीत. या दिवसांत महत्त्वाचा निर्णय पुढे ढकला. इतरांचे काम पूर्ण झाले, आपले झाले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका. कारण सध्या घाई करणे त्रासाचे राहील. दुसऱ्यांवर किती अवलंबून राहायचे याचा अनुभव या सप्ताहात येणार आहे. त्या वेळी असे वाटेल की आपले काम आपणच केलेले चांगले. तेव्हा कोणावर अवलंबून राहू नका. स्वत:चे काम स्वत:च करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. चांगल्या कालावधीमध्ये कामात अडथळा येणार नाही. व्यवसायात चांगला लाभ होईल. नोकरदार वर्गाला नवीन संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या सक्षम बनाल. घरगुती स्तरावर स्थावर मालमत्तेचा प्रश्न सुटेल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
मीन
१७ तारखेला दुपारनंतर, दिनांक १८ व १९ हे दोन दिवस अशा या अडीच दिवसांच्या कालावधीत जपून पाऊल टाका. प्रत्यक्षात परिस्थिती चांगली वाटत असली तरी ती तशी नसणार आहे. अचानक येणाऱ्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागेल. एखादे काम उशिरा होणार आहे असे धरून चला. म्हणजे काय होईल, तुम्हाला त्रास होणार नाही. एखाद्या कामात अडथळा येणार आहे, त्यावर मार्गपण निघेल. इतरांनी न विचारता त्यांना सल्ला देणे सध्या महागात पडू शकते. तेव्हा कोणालाही सल्ला देत बसू नका. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात नवीन गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाचे कामात मन रमेल. अनपेक्षित लाभ होईल. राजकीय क्षेत्रात चर्चा करताना संयम ठेवा. कुटुंबाशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. मानसिकता जपा. आरोग्याची काळजी घ्या.