साप्ताहिक राशिभविष्य: १५ ते २१ डिसेंबर २०२४

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

मेष

दिनांक १५ रोजी दुपारपर्यंत पौर्णिमेचा प्रहर राहणार आहे. शुभ ग्रहांची साथ चांगली राहील. प्रत्येक गोष्टीत होणारा संघर्ष कमी होईल, त्यामुळे काम करण्यासाठी उत्साह वाढेल. सध्या आपण म्हणाल ते बरोबर असणार आहे. स्वत:चे काम स्वत: पूर्ण करायचे. कोणावर अवलंबून राहायचे नाही, अशी तुमची भूमिका राहील. त्यामुळे या चांगल्या कालावधीत भरीव कार्य नक्कीच कराल. ताणतणाव कमी होईल. व्यवसायात मागील दिवसांपेक्षा सध्याचे दिवस चांगले आहेत. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत धावपळ करून चालणार नाही. अगदी शांतपणे काम करावे लागेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. संतती सौख्य लाभेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. धार्मिक कार्य पार पाडाल. आरोग्य चांगले राहील.

वृषभ

काही वेळेला प्रयत्न करूनही म्हणावे तसे यश मिळत नव्हते. सध्या मात्र तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. अगदी जिद्दीने काम सफल कराल. कोणत्याही गोष्टीचे ओझे मनावर राहणार नाही. चांगले दिवस असले की बरेच काही चांगले होते याचा अनुभवही तुम्हाला येईल. तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल. इतरांची मदत मिळेल. हाती घेतलेले काम तडीस न्याल. आश्वासने वेळेत पूर्ण कराल. सामूहिक गोष्टींची आवड राहील. व्यावसायिक उलाढाली वाढतील. नोकरदार वर्गाला नवीन कामाची संधी मिळेल. आर्थिक बचत कराल. राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग येईल. घरगुती वातावरण चांगले राहील. भावंडांविषयी चिंता वाटेल. धार्मिक कार्यात सहभाग राहील. प्रकृती साथ देईल.

मिथुन

दिनांक १५ रोजी दुपारपर्यंत पौर्णिमेचा प्रहर असल्यामुळे महत्त्वाचे काम दुपारनंतर करा. बाकी सप्ताहातील सर्व दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये मिळालेल्या संधीची साथ सोडू नका. प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टी तुमच्यासमोर येतात. त्या कराव्या की करू नये अशी द्विधा अवस्था होते. सध्या मात्र ही द्विधा अवस्था होणार नाही, त्यामुळे कामाला गती येईल. जबाबदारीची जाणीव होईल. ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता त्या गोष्टींची शुभ सुरुवात होईल. उत्साह वाढेल. व्यवसायात उत्पन्न वाढीसाठी जे काही निर्णय तुम्ही घ्याल ते यशस्वी होतील. नोकरदार वर्गाला कामात गुंतून राहावे लागेल. उधारीचे व्यवहार मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रातील पारडे जड होईल. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. भावंडांना मदत कराल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. प्रकृती उत्तम राहील.

कर्क

१५ तारखेला दुपारनंतर १६, १७ हे संपूर्ण दिवस असा हा अडीच दिवसांचा कालावधी फारसा अनुकूल नाही, त्यामुळे या कालावधीत येणारे प्रस्ताव स्वीकारू नका. इतरांनी कितीही गळ घालण्याचा प्रयत्न करू द्या, पण तुम्ही फसू नका. मग तिथे बोलणे असू दे किंवा व्यवहार असू दे विचारपूर्वक वागा. इतरांच्या सल्ल्याने कोणतेही निर्णय घेऊ नका. तुम्हाला जे पटते त्याच गोष्टींचा विचार करा. कामात व्यस्त राहिलेले चांगले राहील. बाकी दिवस चांगले असतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नवे काही संकल्प मार्गी लागतील. नोकरदार वर्गाला कामातील नियोजन बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. खर्च जपून करा. कौटुंबिकदृष्ट्या घेतलेली जबाबदारी पार पाडाल. जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जा. योगसाधनेला महत्त्व द्या.

सिंह

दिनांक १८, १९ हे दोन दिवस काय करावे काय करू नये हे सुचणार नाही. अशावेळी तुम्ही इतरांचा सल्ला घेता आणि तोही तुम्हाला पटत नाही तेव्हा हे दोन दिवस महत्त्वाचे काम पुढे ढकला. म्हणजे नुकसान होणार नाही. बेकायदेशीर गोष्टींपासून लांब राहा. नियमांचे पालन करा म्हणजे त्रास होणार नाही. जिथे वादविवाद निर्माण होणार आहेत अशा ठिकाणी थांबूच नका. प्रतिक्रिया व्यक्त करणे त्रासाचे ठरेल. या कालावधीत कमी बोललेलेच चांगले राहील. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे सध्यातरी टाळा. नोकरदार वर्गाला कामात येणारे अडथळे दूर करावे लागतील. राजकीय क्षेत्रात कमी बोलणे चांगले. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य मिळेल. मुलांसाठी वेळ द्याल. जोडीदाराची साथ राहील. आरोग्य ठीक राहील.

कन्या

दिनांक २०, २१ हे दोन दिवस अनुकूल कसे जातील ते पाहा. कारण या दिवसांत तुम्हाला ज्या गोष्टी पटणार नाहीत अशाच गोष्टी समोर येतील आणि तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया स्पष्टपणे द्याल. समोरच्याला समजून घेणे अवघड होईल. तेव्हा न पटणाऱ्या गोष्टींकडे सरळ दुर्लक्ष करा. म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. स्वत:चे काम स्वत: करा. इतरांवर अवलंबून राहू नका. समतोल साधा. म्हणजे सारे सुरळीत चालेल. बाकी दिवस ठीक राहतील. व्यवसायातील व्याप कमी होईल. नोकरदार वर्गाला कामाची जबाबदारी पार पाडताना धावपळ होईल. आर्थिक बचत करा. राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा अंदाज येईल. मुलांचे लाड करा, पण शिस्त बिघडू देऊ नका. घरगुती वातावरण चांगले राहील.

तूळ

१५ तारखेला दुपारपर्यंत पौर्णिमेचा प्रहर राहील. हा एवढाच अर्धा दिवस सोडला तर बाकी दिवसांत भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण अतिशय शुभदायक राहील. असे ऐकायलाही छान वाटते ना आणि हो, ही गोष्ट खरीच आहे. या कालावधीत योग्य पावले पडतील. उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी घडतील. स्वप्न पूर्ण होणार आहे. चांगल्या कालावधीतला वेळ वाया घालवू नका. बदलत्या परिस्थितीनुसार काम कराल. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात शुभेच्छा पाठीशी राहतील. भावंडांशी संवाद साधाल. शेजाऱ्यांना मदत कराल. धार्मिक गोष्टींत सहभाग राहील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक

१५ तारखेला दुपारनंतर व १६, १७ असे हे अडीच दिवस बेताचे राहतील. असे दिवस असले की तुम्ही स्वत:च त्रास वाढवून घेता. होऊन गेलेली गोष्ट पुन:पुन्हा गिरवत बसता, परिणामी त्रास वाढतो. त्यापेक्षा शांत राहून काम करा म्हणजे नुकसान होणार नाही. इतरांच्यात हस्तक्षेप करणे टाळा. कोणाचे बरोबर कोणाचे चुकीचे याबद्दल तुमचे मत व्यक्त करू नका. आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. कोणाची मध्यस्थी करायला जाऊ नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहार चांगले होतील. नोकरदार वर्गाला कामाचे स्वरूप कळेल. आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करा. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. कौटुंबिक वाद टाळा. मानसिकता जपा. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.

धनु

१५ तारखेला दुपारपर्यंत पौर्णिमा कालावधी राहील. या कालावधीत वाद टाळा. इतरांशी बोलताना संवाद जपून करा. दिनांक १८, १९ हे दिवस चांगले कसे जातील याचा प्रयत्न केला पाहिजे. असे दिवस असले की तुम्हाला गप्प बसावेसे वाटत नाही. एखाद्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा म्हणजे लावायचा अशी मन:स्थिती निर्माण होते. अशावेळी जे तोंडात येईल ते बोलून त्रास करून घेता. तेव्हा या दिवसांचा आधीच अंदाज आलेला आहे. तेव्हा शांत राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हे दिवस चांगले जातील. बाकी दिवसांचा कालावधी ठीक राहील. व्यवसायात उत्पादन वाढ चांगली होईल. नोकरदार वर्गाला संयम ठेवावा लागेल. उधारी उसनवारी करून नका. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मागील अनुभव विसरू नका. आरोग्य जपा.

मकर

षष्ठ स्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे होणारे भ्रमण हे चढउतारांचे असेल. म्हणजेच या दिवसांत तुम्हाला एक घाव दोन तुकडे करावेसे वाटेल. जितका संयम तुम्ही ठेवणार, तितका त्रास कमी होणार. संयम सोडला तर गोष्टी उलट होऊ शकतात. त्यामुळे जे काही करायचे आहे ते विचारपूर्वक करायचे आहे हे लक्षात ठेवा. रागाच्या भरात बोललो, रागाच्या भरात केले असे करून चालणार नाही. तेव्हा आपणच दोन पावले मागे आलेले चांगले. हे दिवस चांगले नाहीत एवढेच लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचार करा म्हणजे नुकसान होणार नाही. व्यवसायात तोटा होणार नाही याची काळजी घ्या. नोकरदार वर्गाने कामात लक्ष घातलेले चांगले. आर्थिक नियोजन करा. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.

कुंभ

दिनांक १८, १९ या दोन दिवसांत विनाकारण भटकंती करणे टाळा. प्रत्येक वेळी आपण घेतलेले निर्णय योग्य असतील असे नाही. कोणतीही घाईची कृती करू नका. स्वत:च्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष देणे त्रासाचे राहील. एखाद्या गोष्टीचा ऊहापोह करण्यापेक्षा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेले चांगले. प्रत्येकाने आपले ऐकावेच हे सूत्र सध्यातरी बाजूला ठेवा. भावनिक गोष्टींपेक्षा व्यवहारात्मक गोष्टींकडे लक्ष द्या. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील आवक वाढावी म्हणून नको त्या जाहिरात माध्यमांचा वापर करू नका. नोकरदार वर्गाने कामात व्यस्त राहा. आर्थिकबाबतीत नियोजनाला महत्त्व द्या. मित्र-मैत्रिणींसोबत मनोरंजन होईल. मुलांची प्रगती होईल. उपासना फलद्रूप होईल.

मीन

दिनांक २०, २१ या दोन दिवसांत कोणतेही नवे प्रस्ताव येऊ देत, ते प्रस्ताव स्वीकारू नका. त्यासाठी थोडा वेळ घ्या. चांगल्या गोष्टींसाठी वेळ लागणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. दरवेळी तुम्ही कोणताही मागचा पुढचा विचार न करता प्रत्यक्ष कृतीवर भर देता आणि नेमके नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी तडजोड हिताची राहील. न जमणाऱ्या गोष्टींची जबाबदारी घेऊ नका. स्वत:चे मत स्वत: तयार करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. आर्थिक व्यवहार चोख ठेवा. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होईल. मित्र-मैत्रिणींशी संवाद जपून करा. कुटुंबाला विश्वासात घेऊन काम कराल. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा.

 

 

(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *