साप्ताहिक राशिभविष्य: १७ ते २३ ऑगस्ट २०२५

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मेष : प्रगती होईल
या आठवड्यात असा कोणताच दिवस नाही की त्या दिवशी तुम्हाला त्रास सहन करावा लागला आहे. सर्व दिवस चांगले असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आतापर्यंत इतरांना तुम्ही तुमच्या गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. त्या समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टी पटत नव्हत्या. सध्या मात्र दिवस असे आहेत की, तुम्ही जे काही सांगणार आहात. ते समोरच्याला पटणारे आहे. त्यामुळे संधी सोडू नका. तुम्हाला जे काम करून घ्यायचे आहे त्यासाठी ही आत्ताच वेळ आहे. अमावास्या कालावधी चांगला जाईल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. राजकीय क्षेत्रातील डावपेच वेळीच लक्षात येतील. घरगुती वातावरण चांगले राहील.

वृषभ : मानसिक समाधान लाभेल
ज्यावेळी शुभ ग्रहांची साथ असते, त्यावेळी कोणताही त्रास होत नाही याचा अनुभव या आठवड्यामध्ये येणार आहे. काही वेळेला हे काम करू की ते काम करू काय करावे काय करू नये हे कळत नसते. सध्या मात्र काम अगदी ठरवून ठेवल्याप्रमाणे आणि वेळेत पूर्ण होईल. त्यामुळे तुमचा कामातील उत्साह वाढेल. कामे मार्गी लागतील. अमावास्या कालावधीत शेजाऱ्यांशी मात्र जपून राहा.व्यवसायात नफा चांगला मिळेल. नोकरदार वर्गाला कामाची काही सूत्रे हातात येतील. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात जबाबदारी पार पाडावी लागेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. धार्मिक कार्याची आवड राहील. मानसिक समाधान लाभेल.

मिथुन : अनावश्यक खर्च टाळा

दिनांक १७, १८ हे दोन दिवस शुभ नाही. तेव्हा या दिवसांत कोणतेही काम करताना काळजी घ्या. घाईगडबडीने काम करणे त्रासाचे राहील. उशीर झाला तरी चालेल, पण विचार करून काम करा. इतरांच्या सांगण्या-बोलण्यावर विश्वास ठेवू नका. जे तुम्हाला पटते तेच करा. ज्या ठिकाणी तुमच्या प्रतिक्रियेमुळे वाद होणार आहे, अशा ठिकाणी शांत राहणे सर्वात उत्तम. बाकी दिवस चांगले असतील. अमावास्या कालावधी ठीक राहील. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले जरी असले तरी त्या उत्पन्नाचा योग्य ठिकाणी वापर करणे गरजेचे राहील. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्या. आर्थिकदृष्ट्या अनावश्यक खर्च टाळा. समाज सेवा करताना भान ठेवा. कुटुंबाशी तुमची मते जुळतील. जोडीदार आनंदी असेल.

कर्क : व्यवस्थापन नीट करा
दिनांक १८, १९, २० हे तीन दिवस धावपळीचे राहतील. या दिवसांत कारण नसताना प्रत्येक कामाला उशीर होईल. कोणतेही काम तुमच्यासाठी अनपेक्षित असेल. ज्या कामासाठी तुम्ही वेळ द्यायचा ठरवला आहे, ते काम होणारच नाही. दुसरेच काम करावे लागेल, त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थापन नीट करा. म्हणजे त्रास होणार नाही. कोणावर अवलंबून राहू नका. आपले काम आपणच करा. अमावास्या कालावधीत वादविवाद टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल.

सिंह : चर्चा करणे टाळा
दिनांक २१, २२ या दोन दिवसांत इतरांना कोणतेही वचन देऊ नका. वचन देणे टाळा. ज्या गोष्टी तुम्हाला जमणार नाहीत अशा गोष्टींसाठी दुसऱ्यांना शब्द देणे म्हणजे नुकसान करून घेण्यासारखे आहे. विनाकारण जबाबदारी घेऊ नका. आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष देऊ नका. होऊन गेलेल्या गोष्टींवर चर्चा करणे टाळा. कोणतेही व्यवहार करताना जपून करा. अमावास्या कालावधीत वादविवाद करणे टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात आवक पाहून जावक ठरवा. नोकरदार वर्गाचे कामातील स्वरूप बदलते राहील. खर्च जपून करा. सार्वजनिक ठिकाणी जनसंपर्क व मित्र-मैत्रिणींशी सलोखा वाढेल. संततीच्या बाबतीत घेतलेले निर्णय योग्य असतील. घरगुती वातावरण चांगले राहील. तरुण वर्गाचे विवाह ठरतील. मानसिक शारीरिक स्वास्थ्य जपा.

कन्या : भाग्योदय होईल
दिनांक २३ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. चांगल्या कालावधीमध्ये चांगल्या घडामोडी घडतील. आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी वेळ मिळेल. बऱ्याच दिवसांपासून आपली काही स्वप्ने बाकी आहेत. ही स्वप्ने पूर्ण होणारा हा कालावधी आहे असे म्हणावे लागेल. कारण अचानक काही असे प्रस्ताव येतील जे तुमच्यासाठी आनंददायक असतील. हे प्रस्ताव स्वीकारा. व्यवसायातील आवक वाढेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून चांगल्या कामाची पोचपावती मिळेल. आर्थिक लाभ होईल. समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. भावंडांच्या बाबतीत काही गैरसमज निर्माण झालेले असतील तर ते दूर होतील. कुटुंबासमवेत मनोरंजन करण्याचा बेत आखाल. धार्मिक कार्याची आवड राहील. एकूण सप्ताह भाग्योदयाचा असेल. आरोग्य उत्तम राहील.

तूळ : श्रेय मिळेल
दिनांक १७, १८ या दोन दिवसांत वेळेचे भान ठेवा. वेळेनुसार काम करा; मनात आले म्हणून केले असे केले तर नुकसान होऊ शकते. तेव्हा योग्य नियोजन केल्याशिवाय काम करू नका. नियमांच्या चौकटीत राहा. बेकायदेशीर गोष्टींपासून लांब राहा. मोबदला चांगला मिळावा म्हणून घाईने निर्णय घेऊ नका. इतरांशी संवाद करताना तो जपून करा. अमावास्या कालावधी ठीक राहील. बाकी दिवस उत्तम असतील. चांगले दिवस यशदायक असतील. व्यवसायात वैयक्तिक उत्कर्ष साधाल. नोकरदार वर्गाला सामूहिक गोष्टींची आवड राहील. चांगल्या कामाचे श्रेय मिळेल. खर्च कमी करा. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नातेवाईकांची कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. भावंडांशी संवाद साधाल. धार्मिक कार्य पार पाडाल. आहाराचे पथ्य पाणी सांभाळा.

वृश्चिक : आहार सांभाळा
१८ तारखेला दुपारनंतर व दिनांक १९ या दिवसांत विचार करून पाऊल उचलले पाहिजे. दोन दिवस हा अडीच दिवसांचा कालावधी चांगला कसा जाईल ते पाहा. दिवस चांगले असो किंवा वाईट तुमची नेहमी द्विधा अवस्था होते. स्वत:च्या मर्जीने तुम्ही कोणतेच निर्णय घेत नाही. नेहमी इतरांवर अवलंबून राहता. शिवाय इतरांच्या काही गोष्टी तुम्हाला पटतही नाहीत. सध्या असेच होणार आहे. काही जरी करायचे झाले तरी दुसऱ्याला विचारायचे आणि नाही पटले म्हणून वाद घालायचे; तेव्हा असे न करता विचारपूर्वक निर्णय घ्या. बाकी दिवस चांगले असतील. अमावास्या कालावधी चांगला जाईल.

धनू : तोंडावर ताबा ठेवा

षष्ठ स्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण म्हणजे दुधात मिठाचा खडा. भ्रमण चांगले असो किंवा वाईट असो. मात्र तुमचे विचार करण्याची बुद्धिमत्ता ही दुधात मिठाचा खडा टाकल्यासारखीच असते. चांगले दिवस असले की काम करत नाही, नुसती करमणूक करता आणि ज्यावेळी दिवस खराब असतात. त्यावेळी स्वत:ही काम करत नाही आणि इतरांनाही करून देत नाही. प्रत्येक गोष्टीत खो घालण्याचा प्रयत्न करता. इतराने आपल्या मर्जीनेच वागावे ही तुमची मानसिकता राहते. त्यामुळे वातावरण बिघडून जाते. सध्याचे दिवस असे आहेत. तुम्हाला इतरांचे ऐकून घ्यावे लागेल. बोलताना तोंडावर ताबा ठेवा. म्हणजे काही होणार नाही. अमावास्या कालावधी शांत कसा जाईल ते पाहा. व्यवसायात गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्या. खर्च जपून करा. प्रकृतीची काळजी घ्या.

मकर : मर्यादा ओलांडू नका
दिनांक १८, १९, २० आणि २३ असे चार दिवस शुभ नाहीत. त्यामुळे या दिवसांत तुमची मानसिकता चांगली कशी राहील ते पाहा. काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला त्या पटणाऱ्या नसतात. अशा वेळी तुम्ही स्पष्ट प्रतिक्रिया देता आणि भांडण ओढवून घेता. पण आपला ज्या गोष्टीशी संबंध नाही अशा गोष्टीत न पडलेले चांगले. हे लक्षात ठेवा. दिवस असे असले की तुम्ही मात्र कारण नसताना उठाठेवी करता. तेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडू नका. याचा त्रास तुम्हालाच होऊ शकतो. अमावास्या कालावधीत शांत राहा. व्यवसायात जेवढ्या झेपतील. तेवढ्याच गोष्टींसाठी वेळ द्या. नोकरदार वर्गाला कामासाठी जास्ती वेळ द्यावा लागेल. आर्थिक नियोजन करा. कुटुंबाशी मिळून मिसळून राहा. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा.

कुंभ : नियमांचे पालन करा
दिनांक २१, २२ हे दिवस अनुकूल नाहीत. त्यामुळे या दिवसांत महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावे लागतील. शिवाय या कालावधीत इतरांकडून अपेक्षा ठेवणे त्रासाचे राहील. कोणत्याही महत्त्वाच्या करारावर सही करण्यापूर्वी वेळ घ्या. तो करार पूर्ण वाचा. त्यानंतर सही करा. कर्जासाठी इतरांना जामीन होऊ नका. नियमांचे पालन करा. आपल्याला ज्या गोष्टींचे निर्णय घेता येत नाही. अशा वेळी ज्येष्ठांची मार्गदर्शन घ्या. अमावास्या कालावधीत गप्प राहणे उत्तम. शांततेच्या मार्गाने गोष्टी हाताळल्यास त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील दिनचर्या व्यस्त राहील. नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. समाजसेवा करताना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवा. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. योग साधनेला महत्त्व द्या.

मीन : मंगल कार्य घडेल
दिनांक २३ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. अमावास्या कालावधीत कोणतेही व्यवहार करू नका. सध्या अनेक प्रश्नातून सुटका मिळणार आहे. अडचणीचा कालावधी कमी होईल. इतरांची मदत मिळेल. कामे वेळेत पूर्ण होतील. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार आहे. चांगल्या गोष्टीचा मोबदला मिळेल. कामातील उत्साह चांगला राहील. सुलभ गोष्टी घडतील. व्यवसायातील आवक चांगली असेल. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी होणारे त्रास कमी होतील. आर्थिक चिंता मिटेल. संततीसाठी वेळ द्याल. घरगुती वातावरण आनंदी राहील. मंगल कार्य घडेल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

 

 

(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *