लेखणी बुलंद टीम:
मेष : काटकसर करा
दिनांक १२, १३ हे दोन दिवस फारसे शुभ नाहीत. म्हणजे या दिवसांत काम करायचे नाही असे नाही, तर फक्त महत्त्वाचे काम करताना काळजी घ्यावी लागेल हे लक्षात ठेवा. कोणत्याही कागदपत्रांवर सही करताना घाई करू नका. कोणत्याही गोष्टीची जोपर्यंत स्वतःला खात्री होत नाही, तोपर्यंत निर्णय घेऊ नका. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात गुंतवणूक करताना विचार करा. नोकरदारवर्गाला कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा करून चालणार नाही. आर्थिक काटकसर करा. सध्या समाजसेवा करण्याची मनामध्ये इच्छा नसतानासुद्धा ती करावी लागेल. मुलांचे लाड करा, पण शिस्त बिघडू देऊ नका. स्वार्थी मित्र-मैत्रिणींपासून दोन हात लांब राहा. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : शांतपणे मत मांडा
दिनांक १४, १५ हे दोन दिवस, १६ तारखेला दुपारपर्यंत असे अडीच दिवस जेमतेम राहतील. या दिवसांत काही गोष्टी तुम्हाला न पटणाऱ्या असतील आणि त्याच गोष्टी तुमच्या समोर येतील. अशा वेळी तुम्हाला राग येतो आणि पटकन निर्णय घेता. त्याचा परिणाम म्हणजे समोरच्यापेक्षा तुम्हाला स्वतःला त्रास होतो. असे न करता शांतपणे मत मांडा म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात चढउतार असला तरी फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदारवर्गाला कामाकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल. आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. मानसिक ताणतणाव कमी कसा होईल याकडे लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन : आघाडी घेऊ शकाल
भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण अतिशय लाभदायक राहील. आता कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागणार नाही. कामे अगदी सरळ मार्गी होत राहतील. इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. परिणामी तुमचा कामातील उत्साह वाढेल. मागील दिवस कटकटीचे गेलेले असले तरी सध्याचे दिवस चांगले आहेत. सध्या आघाडी घेऊ शकाल. चांगल्या गोष्टींचा शुभारंभ होईल. कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. व्यवसायात भरभराट होईल. नफा चांगला होईल. नोकरदारवर्गाला वरिष्ठांची शाबासकी मिळेल. आर्थिकबाबतीत समाधानाची बाब राहील. राजकीय क्षेत्रात जबाबदारी वाढेल. मित्र-मैत्रिणींसोबत करमणूक होईल. संततीसौख्य लाभेल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. आरोग्य ठणठणीत राहील.
कर्क : बचतीत वाढ होईल
दिनांक १०, ११ हे दोन दिवस अनुकूल नाहीत. या दिवसांत कोणतेही काम करताना विचार करा. नुकसान तर होत नाही ना याचा पहिला विचार करा. कारण समोरून येणारे प्रस्ताव फसवणुकीचे असू शकतात. वेळ गेल्यानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा सतर्क राहून काम करा. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या. हत्ती गेला आणि शेपूट राहिले असे वातावरण असेल, त्यामुळे थोड्या कालावधीसाठी धीर धरा. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये थांबलेल्या कामांना गती येईल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. नोकरदारवर्गाला कामाच्या बाबतीत ठोस निर्णय घेता येतील. आर्थिक बचतीत वाढ होईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. नातेवाईकांच्या कामानिमित्त भेटीगाठी होतील. भावंडांशी संवाद साधाल. मानसिक समाधान लाभेल. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
सिंह : कुटुंबाची काळजी घ्या
दिनांक १२, १३ हे दोन दिवस कोणतेही काम करायला जा ते अडथळ्याचेच वाटेल. अशा वेळी थोडे थांबायला हवे. इतरांवर अवलंबून राहूनही चालणार नाही. अशा दिवसांमध्ये प्रयत्न वाढवावे लागतात. प्रत्येक गोष्टीत घाई करून चालणार नाही. इतरांनी आपले ऐकावे ही मानसिकता पहिला बाजूला ठेवा. आपले मत कोणावर लादण्याचा प्रयत्न करू नका, म्हणजे त्रास होणार नाही. इतरांचे ऐकून स्वतः त्रास वाढवून घेऊ नका. बाकी दिवस चांगले असतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नोकरदारवर्गाच्या कामकाजात वारंवार बदल होतील. आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होईल. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांना विश्वासात घेऊन मगच निर्णय घ्या. नातेवाईकांशी संवाद साधाल. भावंडांना तुमचा आधार वाटेल. धार्मिक कार्यात सहभाग राहील. कुटुंबाची काळजी घ्या. आरोग्य जपा.
कन्या : संयम बाळगा
षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण चांगले कसे जाईल ते पाहा. सर्व दिवसांत जपून पाऊल टाकावे लागेल. या कालावधीत सहनशीलता ठेवा. कोणाच्या मदतीविना काम करावे लागेल. कारण प्रत्येक जण आपापल्या कामाचा स्वार्थ पाहणार आहे ही गोष्ट तुम्हाला आवडणार नाही. तुम्हाला असे वाटेल की आपण इतरांचे काम करतो तर इतरांनाही आपल्याला मदत करावी, पण तसे होणार नाही. सध्या आपले काम वेळेत होईल असे दिवस नाहीत. उशीर गृहीत धरून चाला, म्हणजे त्रास होणार नाही. उग्र भूमिका टाळून संयम ठेवा. व्यवसायात गुंतवणूक करू नका. नोकरदारवर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. खर्च कमी करा. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप टाळा. जोडीदाराची साथ राहील. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. प्रकृतीची काळजी घ्या.
तूळ : सहनशीलता ठेवा
दिनांक १२, १३, १६ हे तीन दिवस टांगती तलवार असणार आहे. तेव्हा या दिवसांत कोणतेही काम करताना सहनशीलता वाढवा. एक घाव दोन तुकडे करून चालणार नाही. काही गोष्टी अशा असतील की तुम्हाला त्या पटणाऱ्या नसतील. अशा वेळी फार मनाला लावून न घेता सोडून द्या. स्वतःचे काम स्वतः करा. कोणाची मदत घेऊ नका. इतरांचे ऐकून घ्या, त्यावर प्रत्युत्तर करू नका. कारण या दिवसांत कोणतेही काम सरळमार्गी आहे असे वाटणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात उलाढाली वाढतील. नोकरदारवर्गाला कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर होतील. आर्थिक बचत करणे योग्य राहील. राजकीय क्षेत्रात सध्या तरी रस वाटणार नाही. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. प्रकृती जपा.
वृश्चिक : पर्याय स्वीकारा
दिनांक १४, १५, १६ या तीन दिवसांत ‘आपले काम भले नि आपण भले’ हे सूत्र लक्षात ठेवा. दुसऱ्यांच्या वैयक्तिक गोष्टींत हस्तक्षेप करू नका. कोणी काय करावे काय करू नये याचा सल्ला कोणालाही देत बसू नका. कारण नंतर याचा त्रास तुम्हालाच होईल. त्यापेक्षा शांत बसलेले चांगले. जुन्या गोष्टींवर चर्चा करून वाद वाढवून घेऊ नका. एखादी गोष्ट तुम्हाला आवडली नाही तरी ती आवडून घ्यावी लागेल. त्यासाठी पर्याय स्वीकारा. कायद्याचे पालन करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात मोठी गुंतवणूक टाळा. नोकरदारवर्गाला कामात व्यस्त राहावे लागेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रातही सातत्याने नवनवीन कार्यक्रमाचे आयोजन करावे लागेल. घरगुती वातावरण ठीक राहील. योगसाधनेला महत्त्व द्या.
धनू : अचूक निर्णय घ्याल
दिनांक १६ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये धडाडीचे निर्णय घ्याल ते अचूक असतील. नेहमीपेक्षा सध्याचे वातावरण चांगले असेल. नवीन गोष्टीचा शुभारंभ होईल. थांबलेल्या कामांना गती येईल. नवीन घडामोडी होतील. काही वेळेला तुम्हाला उगीचच कारण नसताना गैरसमज निर्माण होतात. अशा वेळी आपले मन कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मानसिकता बिघडणार नाही. व्यवसायात जाहिरात माध्यमांचा वापर कराल. नोकरदारवर्गाला कामासाठी जास्तीचा वेळ द्यावा लागेल. आर्थिक व्यवहार जपून करा. समाजसेवा करताना भान ठेवा. मुलांचे लाड कराल. ज्या पाहुण्यांविषयी तुमच्या मनामध्ये द्वेष आहे, अशाच पाहुण्यांची ऊठबस करावी लागेल. शेजाऱ्यांशी जेवढ्यास तेवढे राहा. आरोग्याची काळजी घ्या.
मकर : सकारात्मक गोष्टी घडतील
सध्या ग्रहमानाची साथ मिळेल. दिवस चांगले असले की ते दिवस कसे जातात हे तुम्हाला कळत नाही. अशा वेळी काम करायचे सोडून देता आणि नुसतीच करमणूक करता. अशा वेळी कामाच्या संदर्भात आळस न करता काम करणे हिताचे राहील. तुम्हाला जरी काम करायचे नसले तर ते तुम्ही इतरांकडून करून घेऊ शकता. कारण सध्या दिवस चांगले असल्यामुळे इतरांकडून प्रतिसाद चांगला मिळेल. प्रयत्न करूनही काही कामांना गती येत नव्हती. सध्या प्रलंबित कामांना गती येईल. सकारात्मक गोष्टी घडतील. व्यवसायात प्रगती होईल. उत्पन्न चांगले असेल. नोकरदारवर्गाला कामात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग येईल. संततीसौख्य लाभेल. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती चांगली राहील.
कुंभ : नियोजन उत्तम जमेल
सध्या शुभ ग्रहांची साथ उत्तम राहील. काय करावे काय करू नये अशी जी द्विधावस्था तुमची होत होती ती आता होणार नाही. त्यामुळे काम करायला सोपे जाईल. प्रत्येक गोष्टीतील नियोजन उत्तम जमेल. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. बऱ्याच दिवसांपासूनची कामे रखडलेली होती. ती कामे मार्गी लागतील. इतरांना मदत कराल. कामकाजातील गती वाढेल. व्यवसायात लाभदायक परिस्थिती निर्माण होईल. नोकरदारवर्गाचे काम सुरळीत चालू राहील. आर्थिकबाबतीतील चिंता मिटेल. राजकीय क्षेत्रात तुम्ही जे निर्णय घ्याल. ते निर्णय सर्वांना मान्य असतील. नातेवाईकांशी सलोखा वाढेल. भावंडांशी संपर्क साधाल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. तरुण वर्गाचे विवाह ठरतील. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती चांगली राहील.
मीन : समतोल साधा
दिनांक १०, ११ हे दोन दिवस तसे कष्टाचेच आहेत असे म्हणावे लागतील. कारण या दिवसांत कष्ट वाढवावे लागतील. सहज कोणतीही कामे होणार नाहीत. तुम्हाला असे वाटेल कमी वेळात यश मिळावे तर सध्या प्रयत्नपण वाढवावे लागतील. प्रत्येक वेळी आपल्या मर्जीने सर्व व्हावे, हे सध्या तरी डोक्यातून काढून टाका. प्रत्येक गोष्टीत समतोल साधण्याचा प्रयत्न करा. म्हणजे नुकसान होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये शुभ गोष्टींची सुरुवात होईल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. नोकरदारवर्गाच्या कामकाजात बदल होतील. आर्थिक व्यवहार जपून करा. राजकीय क्षेत्रात कामाच्या संदर्भात चर्चा करावी लागेल. शेजाऱ्यांना मदत कराल. कुटुंबाशी मते जुळतील. प्रकृती साथ देईल.
(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)