साप्ताहिक राशिभविष्य: २० ते २६ एप्रिल २०२५

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मेष : प्रकृती उत्तम राहील
दिनांक २५, २६ हे दोन दिवस फारसे अनुकूल नाहीत; तेव्हा चांगल्या गोष्टीचा श्रीगणेशा या दिवसांत करू नका. चांगल्या गोष्टीसाठी उशीर लागणार आहे हे गृहीत धरा, म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. चांगल्या दिवसांमध्ये चांगल्या घटना घडतील. मागील काही दिवसांमध्ये व्यवहाराचे गणित फसले होते तसे सध्या होणार नाही. कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. परिस्थितीत चांगले बदल होतील. व्यवसायात आवक-जावक वाढेल. नोकरदार वर्गाच्या कामामध्ये बदल होतील आणि ते चांगले असतील. आर्थिक बचत करणे योग्य राहील. राजकीय क्षेत्रात कामाची जबाबदारी वाढेल. मित्र-मैत्रिणींबरोबर करमणूक होईल. संततीसौख्य लाभेल. घरगुती वातावरण चांगले राहील. प्रकृती उत्तम राहील.

वृषभ:नावलौकिक होईल

दिनांक २० रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी शुभ असेल. चंद्र ग्रहाचे भ्रमण २१ तारखेपासून ते २६ तारखेपर्यंत भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. असे भ्रमण म्हणजे दुधात साखर. कितीही अडचणी येऊ देत तुम्ही डगमगून जात नाही हे तुमच्या राशीचे वैशिष्ट्य. आत्तापर्यंत गप्प राहून सोसलेल्या गोष्टींचा सोक्षमोक्ष होईल. म्हणजेच काय की, प्रयत्न करूनही आपले कार्य मोठ्या प्रमाणात यशस्वी होत नव्हते. सध्या नावलौकिक होणार आहे, त्यामुळे तुमचा कामातील उत्साह अजूनही वाढेल. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीचे प्रस्ताव येतील. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. मित्र-मैत्रिणीसोबत करमणूक होईल. संततीसौख्य लाभेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. प्रकृती उत्तम राहील.

मिथुन : तुलना करणे टाळा

दिनांक २१, २२ या दोन दिवसांत काय करावे काय करू नये हे सुचणार नाही; कारण नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागेल. परिणामी कामाचे नियोजन व्यवस्थित होणार नाही. विनाकारण धावपळ होईल आणि ती झाली की तुमची मानसिकता बिघडणार. काहीच करू नये असे वाटेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त दोनच दिवस आहेत कायमस्वरूपी नाहीत. या कालावधीत इतरांशी तुलना करणे टाळा, म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. सध्या व्यवसायात गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात चांगल्या गोष्टी ऐकावयास मिळतील. आर्थिक व्यवहार जपून करा. समाजसेवेची आवड राहील. घरामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन कार्यक्रम आयोजित कराल. धार्मिक गोष्टींची ओढ राहील. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा.

कर्क : संयम ठेवा

षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. असे भ्रमण म्हणजे दुधात मिठाचा खडा, त्यामुळे सतर्क राहून काम करावे लागेल. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करून चालणार नाही. इतरांचे ऐकून घेण्याची मानसिकता ठेवावी लागेल आणि तरच दिवस चांगले जातील. न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा, म्हणजे तुमचा रागाचा पारा वाढणार नाही. शांत राहिलात तर सर्व काही सुरळीत होईल. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा. कोणत्याही गोष्टीचा प्रयत्न सोडू नका. आपल्या कामाव्यतिरिक्त इतर कोणाकडे लक्ष देऊ नका. सध्या व्यवसायातील आवक मनासारखी नसेल. नोकरदार वर्गाने काम करताना ताण घेऊ नये. खर्च जपून करा. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करू नका. कुटुंबामध्ये वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. आरोग्याचीही काळजी घ्या.

सिंह : तडजोड स्वीकारा

सध्या शुभ ग्रहांची साथ कमी मिळणार आहे असे धरून चला. म्हणजे काय तर, जास्त प्रयत्न करावे लागतील. मनासारखे यश मिळणार नाही. प्रत्येक गोष्टीत घाई करावीशी वाटेल. इतरांनी सल्ला दिलेला आवडणार नाही. पण काय असते, काही वेळा इतरांचा सल्लाही आपल्याला उपयोगी पडतो. म्हणून सल्ला घेणे आवश्यक आहे. वादविवाद न करता पर्यायी मार्ग कसा काढता येईल ते पाहा. सध्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष देऊ नका. प्रत्येक गोष्टीत तडजोड स्वीकारा, म्हणजे त्रास होणार नाही. व्यवसायातील धाडसी निर्णय टाळा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे बोलणे खावे लागेल. आर्थिक बचत करणे योग्य राहील. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. कुटुंबातील सदस्यांचा आदर करा. मानसिक ताण घेऊ नका. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. प्रकृतीची काळजी घ्या.

कन्या : प्रयत्न वाढवा

दिनांक २३, २४ हे दोन दिवस फारसे अनुकूल नाहीत. तुमच्या राशीचे वैशिष्ट्य म्हणजे सगळे दिवस सारखे समजून पुढे चालायचे हे बरोबर आहे. मात्र ज्यावेळी दिवस अनुकूल नसतात, त्यावेळी काही गोष्टी अंगलट येतात हे विसरू नका. त्या दिवशी काम करायचे नाही असे नाही. फक्त काय, आपली गोष्ट कोणावर लादायची नाही आणि आपली प्रतिक्रिया देऊ नये. दोन शब्द कमी बोलले म्हणजे हे दिवस चांगले जातात. चांगल्या दिवसांत प्रयत्न वाढवा, यश नक्की मिळेल. व्यवसायातील ताणतणाव कमी होईल. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात ठोस निर्णय घेता येतील. आर्थिक खर्च मात्र जपून करा. समाजसेवेत सहभाग राहील. कुटुंबामध्ये ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. संतती संदर्भात घेतलेले निर्णय योग्य असतील. उपासना फलद्रूप होईल. प्रकृतीची काळजी घ्या.

तूळ : धार्मिक गोष्टींची आवड

दिनांक २५, २६ या दोन दिवसांत महत्त्वाचे निर्णय घेताना विचार करा. अनोळखी व्यक्तीशी दोन हात लांब राहा. कोणतीही गुंतवणूक करताना विचार करा. काम वेळेत व्हावे म्हणून पर्यायी मार्ग स्वीकारू नका. इथेच तुमची फसगत होऊ शकते. प्रत्येक कामाचा आराखडा व्यवस्थित तयार करा आणि मगच कामाला लागा. ते काम व्यवस्थित होईल. आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करावे लागेल आणि ते यशस्वी होईल. आर्थिक बाबतीत समाधानाची बाब राहील. सार्वजनिक ठिकाणी सहभाग राहील. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य मिळेल. भावंडांना मदत कराल. धार्मिक गोष्टींची आवड राहील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.

वृश्चिक : कामांना गती मिळेल

शुभ ग्रहांची साथ असल्यावर प्रलंबित कामांना गती नक्कीच येणार. आतापर्यंत फक्त मनामध्ये तुमच्या ठरत होते की, हे असे करायचे, ते तसे करायचे. पण सध्या मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे, त्यामुळे तुम्हाला कोणतेही काम करताना अडचणीचे वाटणार नाही. मात्र यासाठी इतरांच्या मार्गदर्शनाची गरज भासेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन नक्कीच फायद्याचे ठरेल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. उधारी वसूल होईल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी पार पाडावी लागेल. आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. राजकीय क्षेत्रातील डावपेच लवकरच लक्षात येतील. मागील पोकळी भरून काढाल. घरगुती वातावरण आनंदी राहील. पर्यटनस्थळाला भेट द्याल. धार्मिक गोष्टींची आवड राहील.

धनू : मानसिक समाधान लाभेल

या आठवड्यात सर्व दिवस आनंदाचे असतील. बऱ्याच दिवसांतून असे ग्रहमान आले आहे असे म्हणायला हरकत नाही; पण एक गोष्ट मात्र तुमच्या बाबतीत नक्कीच खरी आहे. ती म्हणजे मिळालेले सुख बोचते. ज्या वेळी दिवस चांगले असतात त्या वेळी तुम्ही तुमचे काम करून घेत नाही. तुम्ही इतरांसाठी वेळ देता. इतरांसाठी कामे करता आणि स्वत:चे काम बाजूला ठेवता. वेळ आली की बोलून दाखवता, त्यामुळे नुकसान होते. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा- आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष देऊ नका. सध्या संधी आली आहे, या संधीचा उपयोग करून घ्या. व्यवसायातील स्थिती चांगली असेल. नोकरदार वर्गाला कामात होणारा त्रास कमी होईल. आर्थिक लाभ होईल. कुटुंब मजेत असेल. जोडीदार आनंदी असेल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

मकर : चंचल वृत्ती राहील

दिनांक २० रोजीचा एकच दिवस शुभ नाही. या दिवशी कोणत्याही महत्त्वाच्या करारावर सही करू नका. कोणाला भेटण्याचा आग्रह करू नका. चंचल वृत्ती राहील. हा दिवस सोडल्यानंतर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. दिवस चांगले जरी असले तरी तुमची वृत्ती नेहमी चंचल राहते. नेमके काय करावे हे तुम्हाला सुचत नाही. परिस्थितीनुसार निर्णय घेता. आधी कोणत्याही कामाचा आराखडा तयार करत नाही, त्यामुळे त्रासाचे प्रमाण वाढते. वादविवादांपासून लांब राहा. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये यश मिळेल. व्यवसायातील परिस्थिती उत्तम असेल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. आर्थिक बाबतीत व्यवहारात फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार जरा जपूनच करा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जोडीदार मदत करेल.

कुंभ : व्यावहारिक राहा

दिनांक २१, २२ हे दोन दिवस अनुकूल कसे जातील ते पाहा. कारण या दिवसांत ‘एक गाव बारा भानगडी’ असे होऊन बसेल. म्हणून कोणाच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. ‘आपले काम भले नि आपण भले’ हे सूत्र लक्षात ठेवा, म्हणजे त्रास होणार नाही. इतराने काय केले आणि काय केले नाही याचा या दिवसांत विचार करणे म्हणजे स्वत:हून त्रास वाढवून घेण्यासारखे आहे; भावनिक गोष्टींच्या आहारी जाऊ नका. व्यावहारिक राहा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात सरळ मार्ग स्वीकारा. नोकरदार वर्गाने प्रत्येक काम काळजीपूर्वक हाताळावे लागेल. आर्थिक व्यवहार जपून करा. समाजमाध्यमांचा वापर करताना भान ठेवा. मित्र-मैत्रिणींसोबत प्रवासाचे बेत आखाल. संततीबाबतीत काळजी वाटणार नाही. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. योगसाधनेला महत्त्व द्या.

मीन : देवाणघेवाण टाळा

दिनांक २३, २४ हे दोन दिवस चढउतारांचे आहेत. म्हणजे याच दिवसांत तुम्हाला कर्ज करण्याचा मोह निर्माण होतो. कारण नसताना याला जामीन हो, त्याला जामीन हो असे उद्याोग सुचतात आणि आगामी काळात गोष्टी अंगलट येतात.

आत्ताच एक गोष्ट लक्षात ठेवा, जबाबदारी घेणे त्रासाचे राहील. स्वत:साठीही कर्ज काढणे टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीमध्ये बाकी राहिलेली कामे पूर्ण कशी होतील ते पाहा. व्यवसायातील गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करा. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात अपेक्षित फलप्राप्ती होईल. आर्थिक देवाणघेवाण टाळा. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांकडून येणाऱ्या नियमांचे पालन करावे लागेल. मित्र-मैत्रिणींना मदत करावी लागेल. घरगुती वातावरण चांगले राहील.

 

 

(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *