६ तारखेला दुपारनंतर, दिनांक ७ व ८ असे संपूर्ण दोन दिवस अशा या दिवसांत कोणतेही महत्त्वाचे काम करू नका. महत्त्वाची कामे चांगल्या कालावधीमध्ये करा. आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. एक घाव दोन तुकडे करणे योग्य राहणार नाही. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवावा लागेल. सकारात्मक विचार करा. बाकी दिवस उत्तम असतील. दसऱ्यानिमित्त खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. हा सण आनंदाचा राहील. व्यवसायात आवक वाढेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभ होईल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. घरगुती वातावरण चांगले राहील. मित्र-मैत्रिणींमार्फत प्रस्ताव येतील. आध्यात्मिक गोष्टींची आवड राहील.
वृषभ
षष्ठ स्थानातून अष्टम स्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. ६ तारखेला दुपारनंतर, दिनांक ९, १० व ११ तारखेला दुपारपर्यंत अशा या कालावधीत आपण कितीही चांगले वागण्याचा प्रयत्न केला तरी समोरून येणाऱ्या प्रतिक्रिया आपल्याला आवडणाऱ्या नसतील. परिणामी तुमची चिडचिड होईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, असे दिवस असले की अनुकूल वातावरण राहत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाची तयारी ठेवा की, या दिवसांत चढ-उतार राहील. स्वत:तच बदल करायचा म्हणजे त्रास होत नाही. दसरा भाग्योदयाचा असेल. हा दिवस अगदीच आनंदाचा असेल. व्यवसायातून उत्पन्न चांगले मिळेल. नोकरदार वर्गाच्या कामकाजात बदल होतील. खर्च जपून करा. कौटुंबिक वादविवाद टाळा. धार्मिक कार्यात सहभाग राहील.
मिथुन
६ तारखेला दुपारनंतर, दिनांक ७ व ८ संपूर्ण दिवस, ११ तारखेला दुपारनंतर, दिनांक १२ तारखेला संपूर्ण दिवस असा हा कालावधी जेमतेम राहील. शुभ ग्रहांची साथ कमी राहील, त्यामुळे या कालावधीत सतर्क राहून काम करावे लागेल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. स्वत:ची जबाबदारी इतरांवर टाकल्यास ते काम वेळेत पूर्ण होणार नाही. वादविवादापासून लांब राहा. स्वत:चे काम स्वत: करा. रागावर नियंत्रण ठेवा. बाकी दिवस चांगले असतील. दसऱ्यानिमित्त मोठ्या खरेदीचे बेत करताना विचार करा. हा दिवस आनंदी कसा जाईल ते पाहा. व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करा. जोडीदाराला विश्वासात घ्या. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. मानसिक ताणतणाव घेऊ नका. प्रकृतीची काळजी घ्या.
कर्क
दिनांक ९, १० संपूर्ण दोन दिवस, ११ तारखेला दुपारपर्यंत अशा या अडीच दिवसांच्या कालावधीत कोणतेही काम करताना भान ठेवा. कारण या दिवसांत मनाची चलबिचल अवस्था होऊ शकते. त्यामुळे निर्णय घेणे अवघड जाते. अशा कालावधीत इतरांकडून चांगला सल्ला मिळेल असे नाही. त्यामुळे कोणाचाही सल्ला घेताना सतर्क राहा. नवीन कोणताही प्रस्ताव या कालावधीत स्वीकारू नका. बाकी दिवस चांगले असतील. विजयादशमी, दसरा कुटुंबासोबत अगदी उत्साहाने साजरा कराल. व्यवसायातून मनासारखे उत्पन्न मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या मर्जीने काम करावे लागेल. आर्थिक बाबतीत तोंडी व्यवहार टाळा. समाजसेवेची आवड राहील. मुलांच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्याल. जोडीदाराची साथ मिळेल.
सिंह
दिनांक ११, १२ हे दोन दिवस फारसे अनुकूल नाहीत, त्यामुळे या दिवसांत कोणत्याही गोष्टीचा सोक्षमोक्ष लावत बसू नका. परिणामी तुमचे नुकसान होऊ शकते. एखादी गोष्ट नाही पटली तर सोडून द्यायला शिका आणि तुमचेच मत मांडायचे झाले तर ते शांतपणे मांडा, म्हणजे वादविवाद होणार नाहीत. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करू नका. इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. स्पष्ट बोलण्याने बरेच काही बिघडू शकते हे लक्षात ठेवा. बाकी दिवस चांगले असतील. दसऱ्याचा दिवस चांगला कसा जाईल, आनंद कसा घेता येईल हाच दृष्टिकोन ठेवा. व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला नवीन कामाचे नियोजन करावे लागेल. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. शेजाऱ्यांशी वैरभाव निर्माण होणार नाही. योगसाधनेला महत्त्व द्या.
कन्या
सप्ताहात सर्व दिवस चांगले आहेत. ज्या वेळी दिवस चांगले असतात, त्या वेळी मात्र तुमचा कामाचा उत्साह म्हणावा तसा नसतो. पण ज्या वेळी ग्रहमानाची साथ नसते अशा वेळी मात्र तुम्हाला काम करण्याची उत्सुकता वाढते आणि नको त्या लोकांच्यात हस्तक्षेप करता. सध्या वेळ वाया घालवू नका. चांगल्या दिवसांचा उपयोग करून घ्या. संधी आलेली आहे असे समजा. चांगल्या कालावधीमध्ये शुभ घडामोडी होतील. दसरा हा जणू तुमच्यासाठी आनंदाचा सोहळाच आहे. व्यवसायात श्रमाचे फळ मिळेल. नोकरदार वर्गाचा कामातील संघर्ष कमी होईल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. मित्र-मैत्रिणींशी चांगले जमेल. घरगुती वातावरण आनंदाचे असेल. आरोग्य उत्तम राहील.
तूळ
सध्या सप्ताहात असा कोणताच दिवस नाही की तो दिवस त्रासाचा असेल. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करण्याची वेळ आली आहे असे समजा. सध्या तुमचे काम होणार आहे. अशा वेळी मागे हटून चालणार नाही. जोमाने कामाला सुरुवात करणे गरजेचे राहील. शुभ कामाची सुरुवात करणे सध्या सहज शक्य होणार आहे. उत्साह वाढेल. आतापर्यंत जे गैरसमज निर्माण झाले होते ते दूर होतील. ‘साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ असा हा दसरा तुमच्यासाठी शुभदायक असेल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाला कामाचा व्याप कमी होईल. सार्वजनिक ठिकाणी सहभाग राहील. आर्थिक सफलता मिळेल. नातेवाईकांशी संवाद साधताना मागील गोष्टींवर चर्चा करू नका. मानसिक समाधान लाभेल. अध्यात्मातील गोडी वाढेल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक
दिनांक ६ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. चांगल्या कालावधीमध्ये बरेच काही बदल होतील आणि हे बदल तुमच्यासाठी चांगले असतील. प्रयत्न करूनही ज्या गोष्टींना यश मिळत नव्हते त्यांना यश मिळेल. इतरांची मदत मिळेल. मनासारख्या गोष्टी घडतील, त्यामुळे कामातील उत्साह वाढेल. दसऱ्यानिमित्त खरेदीचे मनसुबे पूर्ण होतील. व्यावसायिक चढ-उतार जरी असला तरी फायद्याचे प्रमाण चांगले असेल. नोकरदार वर्गाला कामाचा अनुभव चांगला असेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात सध्या मन रमणार नाही. नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. जोडीदाराची साथ मिळेल. तरुण वर्गाचे विवाह ठरतील. आरोग्य उत्तम राहील.
धनु
६ तारखेला दुपारनंतर, दिनांक ७ व ८ असे संपूर्ण दोन दिवस म्हणजेच अडीच दिवसांचा कालावधी अनुकूल नाही. त्यामुळे या कालावधीत सहनशीलता वाढवावी लागेल. आपण म्हणाल तीच पूर्व दिशा असे सध्या तरी असणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला स्वत:वर नियंत्रण ठेवावे लागेल. हे नियंत्रण जर सुटले तर वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि याचा जास्तीत जास्त त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्यापेक्षा शांत राहून मार्ग काढणे सर्वांत उत्तम राहील. बाकी दिवस चांगले असतील. दसऱ्याचे औचित्य साधून खरेदीचे स्वप्न पूर्ण करून घ्याल. मात्र ही खरेदी करताना आपली आवक पाहूनच करा. व्यावसायिक वाढ होईल. नोकरदार वर्गाचे काम वेळेत पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करा. जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जा. योगसाधनेला महत्त्व द्या.
मकर
दिनांक ९, १० हे संपूर्ण दोन दिवस, ११ तारखेला दुपारपर्यंत असा हा कालावधी फार चांगला आहे असे म्हणता येणार नाही. या कालावधीत कारण नसताना तुम्ही विनाकारण होऊन गेलेल्या गोष्टींवर चर्चा कराल. तुमच्यासमोर एखादी गोष्ट अशी घडेल की ती तुम्हाला पटणारी नसेल आणि त्यामुळे तुम्ही स्पष्ट प्रतिक्रिया द्याल. या स्पष्ट प्रतिक्रियेमुळे समोरच्याचे मन दुखावले जाऊ शकते. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. निर्णय विचारपूर्वक घ्या, म्हणजे नुकसान होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांत कामे यशस्वी होतील. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक, त्यामुळे तुमचा खरेदीचा बेत यशस्वी होईल. व्यवसायातील आवक वाढेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांची कृपा राहील. आर्थिकदृष्ट्या बचत करा. मित्र-मैत्रीणींचे सहकार्य मिळेल. घरगुती वातावरण ठीक राहील.
कुंभ
दिनांक ११, १२ हे दोनच दिवस काळजी घेऊन काम करा, म्हणजे नुकसान होणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहू नका.न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले केव्हाही चांगले. ज्या गोष्टीतून मानसिक त्रास आहे अशा गोष्टींचा नाद सोडा. मागील कसर भरून काढण्यासाठी नको ते धाडस करू नका. सध्या शांतपणाने निर्णय घ्या. दसरा मंगलमय आणि आनंदी वातावरणात साजरा करा. या दिवशी मनामध्ये किंतु-परंतु ठेवू नका. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या कालावधीमध्ये ध्येय गाठाल. समीकरण जुळून येईल. आर्थिकदृष्ट्या उधारी करणे टाळा. राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. मित्र-मैत्रिणींची मदत घ्याल. पाहुणे मंडळींचे आगमन होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल.
मीन
भाग्य स्थानातून लाभ स्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण अपेक्षित फलप्राप्ती करून देणारे आहे. या कालावधीत कोणता संघर्ष जाणवणार नाही. अगदी ठरवून ठेवल्याप्रमाणे कामे होत राहतील, त्यामुळे तुमचा उत्साह दहापट वाढेल. जिथे जिथे तुम्ही मदतीची अपेक्षा ठेवाल अशा ठिकाणी नकाराची घंटा वाजणार नाही. कामे वेळेत पूर्ण होत असल्यामुळे तुमच्या मनाला एक प्रकारचा आनंद वाटणार आहे. अपेक्षित संधी मिळेल. दसरा लाभदायक राहील.व्यवसायात श्रमाचे फळ मिळेल. नोकरदार वर्गाला अचूक संकेत मिळतील. आर्थिक बाबतीत समाधानाची बाब राहील. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या घडामोडी होतील. नातेवाईकांशी संपर्क साधाल. पाहुण्यांचे स्वागत कराल. मानसिक समाधान लाभेल.आरोग्य उत्तम राहील.