लेखणी बुलंद टीम:
मेष
षष्ठ स्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. ज्यावेळी सप्ताहात असे ग्रहमान असते, त्यावेळी पाऊल जपून टाकावे लागते. म्हणजे सर्वच दिवस काळजी घ्यावी लागते. सध्या प्रत्येक गोष्टीत फायदा मिळावा याचसाठी प्रयत्न करावा हे चुकीचे राहील. नुकसान होणार नाही याची काळजी घेणे म्हणजेच फायदा मिळवण्यासारखे आहे. तेव्हा कोणतीही गोष्ट करताना दूरदृष्टी ठेवा. इतरांच्या तुलनेत आपले चांगले-वाईट हा विचार सध्यातरी बाजूला ठेवा. प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचार करा. अमावास्या कालावधीत वादविवाद टाळा. व्यवसायात नको ती गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाने कामात लक्ष घालावे. आर्थिकदृष्ट्या बचतीकडे लक्ष द्या. कुटुंबासाठी वेळ द्या. प्रकृतीची काळजी घ्या.
वृषभ
दिनांक २८, २९ हे दोन दिवस असे फारसे चांगले नाहीत. या दिवसांत काय करावे काय करू नये याची चलबिचल अवस्था होईल. तेव्हा अशा परिस्थितीत निर्णय न घेतलेले चांगले. सर्व दिवस चांगले नसतात असे होत नाही. चढउतारांचे हे दिवस राहतात. तेव्हा स्वत:च्या मनाची समजूत स्वत:च घालायची. जाऊ दे हे दोन दिवस गेल्यानंतर का होईना प्रगती होईल असा विचार करा आणि या दिवसांतसुद्धा चांगले प्रयत्न करा. इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत कसलाच हस्तक्षेप करू नका. अमावास्या कालावधीत जोडीदारापासून मात्र सावध राहा म्हणजे वाद करू नका. बाकी दिवस चांगले असतील. या चांगल्या दिवसांत आवडीचे कार्य कराल. व्यवसायात प्रगती चांगली होईल. नोकरदार वर्गाला कामासाठी वेळ देता येईल. घरगुती वातावरण चांगले राहील.
मिथुन
३० तारखेला अमावास्या आहे. हा दिवस चांगला कसा घालवता येईल ते पाहा. कारण नसताना वादविवाद करू नका. शांतपणे हा दिवस पुढे ढकला म्हणजे त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या कालावधीमध्ये समीकरण जुळून येईल. काही वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की दिवस चांगले असो वाईट अंगातला आळस मात्र जात नाही. तेव्हा हा आळस बाजूला सारा आणि कामाला लागा. म्हणजे तुमची वाटचाल सुलभतेकडे राहील. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. खर्चाचा ताळमेळ योग्य पद्धतीने घाला. मित्रांची मदत मिळेल. मुलांसोबत करमणूक होईल. उपासना फलद्रूप होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क
लक्ष्मी प्रसन्न राहील असे ऐकायलाही छान वाटते ना! आणि हो हे खरेच आहे. या सप्ताहात तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्नच राहणार आहे. कारण आत्तापर्यंत जेवढी तुम्ही उलाढाल केलेली नाही. तेवढी या सप्ताहात झाली आहे असे वाटेल. आगामी काळासाठी केलेली गुंतवणूक फायद्याची ठरली. सध्या कोणाकडून अपेक्षा राहणार नाही. कारण कामे अगदी ठरवून ठेवल्यासारखी होतील. अमावास्या कालावधी चांगला राहील. व्यवसायातील आवकजावक वाढेल. नोकरदार वर्गाला कामात येणारे अडथळे दूर होतील. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे हलके वाटेल. संतती सौख्य लाभेल. स्वत:साठी वेळ काढाल. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
सिंह
शुभ ग्रहाची साथ उत्तम राहील. सध्या ही कटकट आहे ती कटकट आहे, हा त्रास आहे तो त्रास आहे हे जाणवणार नाही. कारण सध्या दिवस चांगले आहेत. चांगल्या गोष्टींसाठी पाठपुरावा करावा लागणार नाही. त्या सहज मार्गी लागणार आहेत. मनोबल वाढेल त्यामुळे अपेक्षा जरी नसली तरीसुद्धा इतरांकडून येणारे प्रस्ताव चांगले असतील. चांगल्या प्रस्तावाला प्रतिसाद द्या. प्रगतीचा वेग चांगला राहील. अमावास्या कालावधी ठीक राहील. व्यवसायात मोबदला चांगला मिळेल. नोकरदार वर्गाला कामामध्ये झालेला बदल स्वीकारावा लागेल. आर्थिक बाबतीत शुभ घटना घडतील. सामाजिक कार्यात सहभाग राहील. नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. भावंडांशी हितगुज साधाल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. मानसिक शांतता मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
कन्या
दिनांक २४ रोजी महत्त्वाचे काम पुढे ढकला, कारण या दिवशी जे काम करायला जाल त्या कामांमध्ये उशीर होईल आणि त्या दिवसाचे काम पुढच्या दिवशी होईल. त्यामुळे या दिवशी महत्त्वाचे काम पुढे ढकला. बाकी दिवस चांगले असतील. अमावास्या कालावधी पराक्रमाचा असेल. केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे, हे मात्र तुम्ही मनामध्ये सतत घोळवत असता. तुम्ही कोणावर अवलंबून राहत नाही तेव्हा सध्या हे काम होणारच आहे. घेतलेले निर्णय यशस्वी होतील. सध्या सर्व गोष्टी मनासारख्या होणार आहेत. व्यवसायात यशाचा प्रकाश पडेल. नोकरदार वर्गाला निवारण मार्ग मिळेल. जोडीदाराची मदत मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. शेजाऱ्यांना मदतीचा हात पुढे कराल. आध्यात्मिक गोष्टींची आवड राहील. मानसिक शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील.
तूळ
दिनांक २५, २६, २७ असे हे तीन दिवस चढउताराचे राहणार आहेत. तेव्हा या दिवसांत कोणत्याही गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला जाऊ नका. इतरांनी काय करावे काय करू नये याचा कोणाला सल्ला देत बसू नका. त्यामुळे गोष्टी अंगलट येऊ शकतात. परिस्थिती कशीही असो ती सावरण्याची ताकद तुमच्याकडे पाहिजे. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत एक घाव दोन तुकडे न करता शांतपणे तोडगा काढायचा म्हणजे त्रास होणार नाही. स्वत:च्या कामाची जबाबदारी इतरांवर टाकू नका. बाकी दिवस चांगले असतील. अमावास्या कालावधीही ठीक राहील. व्यवसायात नवे प्रयोग टाळा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांना दिलेला शब्द पाळावा लागेल. आपली आवकजावक पाहून खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा, त्यामुळे नुकसान होणार नाही. काटकसर करा. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. कुटुंबाला विश्वासात घेऊन काम कराल.
वृश्चिक
दिनांक २८, २९ हे दोन दिवस घाई गडबड करून कोणतेही काम करू नका. कारण तुमची ही एक सवय तुम्हाला गोत्यात आणणारी असते हे लक्षात ठेवा. समोरच्यावर लगेच विश्वास ठेवायचा आणि तो म्हणेल ती पूर्व दिशा असे समजून पुढे जायचे, याचा त्रास होऊ शकतो. तेव्हा मागचा पुढचा विचार करून मगच निर्णय घ्या. आपल्या आवाक्यात असलेल्याच गोष्टी करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. अमावास्या तुमच्या राशीतूनच होत आहे. तेव्हा शांत राहा. व्यवसायात इतरांच्या सल्ल्याने कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालेल. आर्थिकदृष्ट्या तोंडी व्यवहार करणे टाळा. समाज माध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य मिळेल. घरगुती वातावरण चांगले राहील. जोडीदार आनंदी असेल.
धनु
दिनांक ३० तारखेला अमावास्या आहे. हा एकच दिवस अनुकूल नाही. तेव्हा या दिवशी आपले काम भले नि आपण भले हे सूत्र अंगी बाणा. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. चांगल्या दिवसांमध्ये राहिलेली कामे करून घ्या. चांगले दिवस असतात त्यावेळी तुम्ही नुसतीच करमणूक करता आणि दिवस वाया घालवता. चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांत कळते. म्हणून नुसतीच करमणूक न करता राहिलेल्या कामांनाही प्राधान्य द्या. व्यवसायात मोबदला चांगला मिळेल. नोकरदार वर्गाला काम चांगले केल्याबद्दल वरिष्ठांकडून शाब्बासकी मिळेल. मनसोक्त खर्च कराल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य मिळेल. मुलांचे कौतुक कराल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
मकर
दिनांक २४ हा एकच दिवस सोडला तर चंद्रग्रहाचे भ्रमण भाग्य स्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. अमावास्या कालावधी चांगला राहील. बऱ्याच दिवसांतून असे ग्रहमान आलेले आहे. म्हणजे सध्याचे दिवस चांगले आहेत असे म्हणायला हरकत नाही. ज्या गोष्टींसाठी फार कष्ट करावे लागत होते ते कष्ट कमी होतील. सध्या तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तुम्हाला जे करायचे आहे तेच करणार आणि ते इतरांकडूनही करून घेणार. याच गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळेल. स्वत:साठी वेळ द्याल. व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी मिळेल. आर्थिक लाभ होईल. सर्वांगीण विकास घडेल. घरगुती वातावरण चांगले राहील. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल, पण त्यात सहभागी होता येणार नाही.
कुंभ
दिनांक २५, २६, २७ या तीन दिवसांत कोणतेही काम करताना भावनिक गोष्टी टाळा. कोणतेही निर्णय घेताना द्विधावस्था होणार नाही याची काळजी घ्या. इतरांवर अवलंबून राहिलात तर काम होणार नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणावर अवलंबून राहूच नका. सध्या आपल्याला आपल्या कामाकडे लक्ष द्यायचे आहे. कोण आपल्याला चांगले म्हणते कोण वाईट म्हणते याचा विचार करून चालणार नाही, त्यामुळे हा त्रास वाढू शकतो. बाकी दिवस चांगले असतील. अमावास्या कालावधी चांगला असेल. व्यवसायातून उत्पन्न चांगले मिळण्यासाठी प्रयत्न वाढवा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. राजकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल राहील. आर्थिक सफलता मिळेल. नातेवाईकांच्या शुभेच्छा पाठीशी राहतील. भावंडांची संपर्क साधाल. कुटुंबाची काळजी घ्या. आहाराचे पथ्य पाणी सांभाळा.
मीन
षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण म्हणजे अनुकूल दिवसांची तीव्रता कमी असते. अशा दिवसांत कोणतेही काम करताना सतर्कता बाळगावी लागते. संघर्षदायक वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. एखादी गोष्ट नाही पटली तर ती सोडून द्यायची, त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे नाही म्हणजे त्रास होत नाही. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करून चालत नाही. शांततेच्या मार्गाने परिस्थिती हाताळावी लागते हे लक्षात ठेवा. अमावास्या कालावधी चांगला राहील. व्यवसायात नवी गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. खर्च कमी करा. कुटुंबाशी मतभेद निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या.