साप्ताहिक राशिभविष्य:( २० ते २६ ऑक्टोबर २०२४ )

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मेष

२४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योग हा गुंतवणुकीसाठी चांगला राहील. बाकी सप्ताहातील सर्व दिवस चांगले आहेत, त्यामुळे कोणत्याही कामाला अडथळा येणार नाही; आणि तुमचा कामातील उत्साह अगदी टिकून राहील. इतरांनी तुम्हाला काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. कारण जे चांगले आहे त्याचाच विचार करायचा आणि पुढे चालायचे ही तुमची वृत्ती राहणार आहे, त्यामुळ कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही निर्णय घेणे त्रासाचे राहील. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली असेल. घरामध्ये कोणतेही निर्णय घेताना ज्येष्ठांना दुखवून चालणार नाही. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील. आनंदी राहाल.

वृषभ

गुरुपुष्यामृत योग जोरदार असेल. या दिवशी केलेली गुंतवणूक आगामी काळासाठी चांगली असेल. सध्या कोणताही ताणतणाव घ्यायचा नाही. अगदी स्वच्छंदी जीवन जगायचे असे तुम्ही ठरवले तर ते काय वावगे ठरणार नाही. कारण सध्याचे दिवस हे स्वच्छंदीच असणार आहेत. सर्व दिवसांचा कालावधी चांगला असेल. कोणत्याही दिवसात त्रास होणार नाही. सध्या तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असेल. आपले मत इतरांना लगेच पटणारे असेल. सप्ताहातील वाटचाल प्रगतीच्या दिशेने असेल. आर्थिक मदत मिळेल. राजकीय क्षेत्रात कामातील उत्साह वाढेल. शेजाऱ्यांशी जेवढ्यास तेवढे राहा. धार्मिक कार्यात सहभागी होताना मागील अनुभव विसरू नका.

मिथुन

२४ ऑक्टोबर रोजीचा गुरुपुष्यामृत योग हा धनस्थानातून होत आहे. दिनांक २०, २१ हे दोन दिवस फारसे अनुकूल नाहीत, त्यामुळे या दिवसांत कोणतेही महत्त्वाचे काम करू नका, ते पुढे ढकला. इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका, त्यामुळे वादविवाद वाढू शकतात. आपला एखाद्या गोष्टीशी काहीही संबंध नाही अशा ठिकाणी न बोललेले चांगले. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करू नका. नाहीतर त्रास वाढू शकतो. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात चाललेल्या घडामोडीत बदल होणार आहेत. तेव्हा हे बदल स्वीकारणे याशिवाय पर्याय नाही. नोकरदार वर्गाचे काम वेळेत पूर्ण होईल. त्यासाठी पळापळ होईल. आर्थिकदृष्ट्या मोठी गुंतवणूक टाळा. कुटुंबाशी वाद टाळा. जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जा.

कर्क

२४ ऑक्टोबर रोजीचा गुरुपुष्यामृत योग हा तुमच्या राशीतूनच होत आहे. हा एक आनंदाचा दिवस असेल असे म्हणायला हरकत नाही. दिनांक २२, २३ हे दोन दिवस मात्र विचार करून बोला. प्रत्येक गोष्टीत नकारात्मक भूमिका टाळा, त्यामुळे होणाऱ्या कामालाही अडचणी येऊ शकतात. दिवस अनुकूल नाहीत म्हणून काम करायचे नाही असे नाही. या दिवसांत प्रयत्न वाढवावे लागतात. इतरांवर अवलंबून राहून चालत नाही. आपले काम वेळेत कसे पूर्ण होईल याकडे लक्ष द्या. प्रत्येक गोष्टीत समतोल साधा म्हणजे त्रास होणार नाही. व्यवसायात मोबदला चांगला मिळेल. नोकरदार वर्गाला कामात व्यस्त राहावे लागेल. वायफळ खर्च टाळा. संतती सौख्य लाभेल. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. जोडीदाराचा आदर करा.

सिंह
गुरुपुष्यामृत योग या दिवशी नको ती गुंतवणूक करू नका. आपल्याला झेपेल अशाच गोष्टी करा. म्हणजे नुकसान होणार नाही. दिनांक २४, २५ हे दोन दिवस चढउताराचे आहेत, त्यामुळे या दिवसांत स्वत:ची कामे बाजूला ठेवून दुसऱ्यांमध्ये डोकावून बघू नका. स्पर्धात्मक गोष्टींच्या नादी लागू नका. एखादे काम कमी झाले तरी चालेल. मात्र त्रास करून घेऊ नका. मोठे धाडस करून निर्णय घेणे योग्य राहणार नाही. तेव्हा हे निर्णय चांगल्या दिवसांत घ्या. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसात प्रयत्नांना यश मिळू शकते. व्यवसायातील अनुभव चांगला असेल. नोकरदार वर्गाला नवीन कामाचे नियोजन करावे लागेल.आर्थिक बचत करणे योग्य राहील. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होईल. मित्र-मैत्रिणींशी करमणूक होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. ज्येष्ठांची कृपा राहील.

कन्या

२४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योग हा लाभस्थानातून होत आहे. या संधीचा लाभ घ्या. गुंतवणूक करायला हरकत नाही. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्र ग्रहाचे भ्रमण हे अतिशय लाभदायक असेल. ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात आणि ती पूर्ण होत नव्हती, ती सध्या पूर्ण होणार आहे. मिळालेल्या संधीचा उपयोग कसा करून घ्यायचा हे मात्र तुम्हाला चांगले जमते आणि सध्या तेच होणार आहे. व्यवसायातील पारडे जड होईल. अपेक्षित फळ मिळेल. नोकरदार वर्गाला प्रसिद्धी मिळेल. आर्थिक त्रास कमी होईल. राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग येईल. घरगुती वातावरण चांगले राहील. भावंडांना मदत कराल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. धार्मिक कार्यात सहभाग राहील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.

तूळ

गुरुपुष्यामृत योग हा दिवस शुभ राहील. या दिवशी चांगल्या गोष्टींचा शुभारंभ होईल. दिनांक २०, २१ या दोन दिवसांत प्रत्येक काम हे नियोजनात्मक करावे लागेल. नाहीतर धावपळ होईल, त्यामुळे तुमची चिडचिड होईल. समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेण्याची मानसिकता राहणार नाही. मी म्हणेल तेच बरोबर अशी वृत्ती राहील, त्यामुळे स्वत: त्रास वाढवून घ्याल. अशा दिवसांत केव्हाही संयम ठेवणे गरजेचे राहील. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. चांगल्या दिवसांमध्ये अचानक प्रस्ताव येऊ शकतात ते स्वीकारा. व्यवसायात मोबदला चांगला मिळेल. नोकरदार वर्गाला कामाचा हुरूप वाढेल. समाजसेवेची आवड राहील. आर्थिकदृष्ट्या बाकी राहिलेले उधारीचे व्यवहार पूर्ण होतील.

वृश्‍चिक

२४ ऑक्टोबर रोजीचा गुरुपुष्यामृत योग भाग्यस्थानातून होत आहे. याचा पुरेपूर वापर करून घ्याल. आपली इच्छा पूर्ण करून घ्याल. दिनांक २२, २३ हे दोन दिवस तसे अडचणीचे आहेत. म्हणजेच या दिवसांत कोणतेही काम करायला गेलात तर अडथळा येऊ शकतो. शिवाय असे दिवस असले की तुम्ही मात्र चर्चेला उधाण आणता व वाद वाढवत बसता; तेव्हा कोणतीही चर्चा करू नका म्हणजे वाद होणार नाहीत. कोणाशीही संवाद साधताना तो जपूनच करा. इतरांना सल्ला देणे टाळा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील परिश्रम वाढतील. नोकरदार वर्गाचा कामातील आलेख चढता राहील. आर्थिक लाभ होईल. शेजाऱ्यांशी व नातेवाईकांशी दोन हात लांब राहा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.

धनु

षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण म्हणजे दुधात मिठाचा खडा. म्हणजे चांगल्या दुधात विरजण लागल्याशिवाय राहणार नाही. या उदाहरणावरून एक गोष्ट लक्षात घ्या. आपणही सर्व काही चांगले असताना कारण नसताना वाद वाढवू नका आणि परिस्थितीला सावरण्याचा प्रयत्न करा. क्रोधावर नियंत्रण ठेवा म्हणजे त्रास होणार नाही. जे काही करायचे आहे ते शांतपणे, हे लक्षात ठेवल्यास अडचणी निर्माण होणार नाहीत. प्रत्येक गोष्टीत आपलेच खरे करू नका. थोडे इतरांनाही समजून घ्या. व्यवसायात नको ती उलाढाल करू नका. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. आर्थिक बचत करणे योग्य राहील. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा.

मकर

गुरुपुष्यामृत योग हा भागीदारी व्यवसायासाठी चांगला राहील. दिनांक २१, २२ व २६ असा हा तीन दिवसांचा कालावधी चांगला कसा जाईल ते पाहा. एखादी गोष्ट मनात नसताना ती केली तरी त्याचा त्रास होईल. परिस्थितीनुसार निर्णय घेणे योग्य राहील. होऊन गेलेल्या गोष्टींवर नकारात्मक विचार करू नका. सकारात्मक विचार करायला शिका म्हणजे मानसिकता चांगली राहील. बाकी दिवस चांगले असतील. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाने कोणतेही व्यवहार करताना जरा जपूनच करावेत. आर्थिक जबाबदारी वेळेत पार पाडा. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे हलके वाटेल. मुलांचे लाड पुरवाल. जोडीदाराशी मतभेद टाळा. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा.

कुंभ

गुरुपुष्यामृत योग या दिवशी विचार करून गुंतवणूक करा. मागील दिवस विसरू नका. न झेपणारी जबाबदारी घेऊ नका. दिनांक २४, २५ हे दोन दिवस चांगले नाहीत. या दिवसांत एक घाव दोन तुकडे करून चालणार नाही. मागील अनुभव विसरू नका. आपले काम इतरांनी करावे ही अपेक्षा ठेवू नका. इतरांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही, त्यामुळे तुम्ही प्रत्युत्तर कराल. मात्र प्रत्युत्तर करण्याची सध्या वेळ नाही हे लक्षात ठेवा. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये मिळालेल्या वेळेचा उपयोग करून घ्या. व्यवसायात पूर्वीपेक्षा सध्याची परिस्थिती चांगली असेल. नोकरदार वर्गाला चांगले काम केल्याबद्दल वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. आर्थिक व्यवहार चोख ठेवा. राजकीय क्षेत्रात व्यासपीठ गाजवाल. घरगुती वातावरण चांगले राहील. उपासना फलद्रूप होईल.

मीन

गुरुपुष्यामृत योग लाभदायक राहील. दिनांक २६ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. मागील काही दिवसांपासून कोणते काम करावे, कोणते काम करू नये, ही जी द्विधावस्था होत होती ती होणार नाही. निर्णय पटकन घेता येतील, त्यासाठी उशीर लागणार नाही. काम अगदी ठरवून ठेवल्याप्रमाणे होईल, त्यामुळे तुमचाही उत्साह टिकून राहील. आतापर्यंत ज्या व्यक्तीविषयी तुमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होत होते ते गैरसमज दूर होतील. तुमच्यामध्ये परिवर्तन घडेल. व्यवसायात देवाण-घेवाण वाढेल. नोकरदार वर्गाचे स्वप्न पूर्ण होईल. आर्थिक व्यवहार जपून करा.

 

(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *