उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा गडचिरोलीमधील अहेरीत आहे. यावेळी बोलातना अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. गडचिरोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम हे सध्या अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत. गडचिरोलीत आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यावेळी विरोधकांना टोला लगावताना अजित पवार यांनी म्हटले की “घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे समाजाला आवडत नाही. आम्ही पण अनुभव घेतलाय, मी चूक मान्य केलीय” यावेळी अजित पवारांनी महायुतीच्या सरकारनं सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थित जनतेला दिली.
“धर्मरावबाबा आत्राम वस्ताद असून वस्ताद त्याच्या हाताखाली शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही. वस्ताद एक डाव राखून ठेवतो. अजूनही चूकभूल करु नका, तुमच्या वडिलांसोबत राहा. वडील लेकीवर प्रेम करतात तेवढं प्रेम लेकीवर करु शकत नाही, असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
या यात्रेत अजित पवारांनी राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती लोकांना दिली. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर राज्यभरातील माझ्या मायमाऊली भगिनींना होत आहे. आम्ही अनुसूचित जातीसाठी बार्टी, मातंग समाजासाठी आर्टी, बहुजन समाजासाठी सारथी, ओबीसी समाजाकरता महाज्योती, अल्पसंख्याक समाजासाठी मार्टी आणि आदिवासी समाजाकरता टार्टी संस्था काढलेल्या आहेत. याशिवाय मुलींना मोफत शिक्षण, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता, तीन गॅस सिलिंडर मोफत यांसारख्या सवलती आम्ही देऊ केल्या आहेत. शेतकऱ्यांची वीज बिलं आम्ही माफ केली असल्याचे अजित पवारांनी सांगितले.