मुंबईकरांसाठी सावधानतेचा इशारा! बाप्पाच विसर्जन करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

सध्या मुंबईसह महाराष्ट्रात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काही जण दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस तर काही जण दहा दिवस गणपती बाप्पा विराजमान असतात. यानंतर मात्र आपल्या लाडक्या बाप्पााला निरोप देण्याची वेळ येते. मुंबईत गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. मुंबईतील अनेक भाविक हे समुद्रात किंवा कृत्रिम तलावात गणेश मुर्तींचे विसर्जन करतात. मात्र यंदा गणपती मूर्ती विसर्जन करताना मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.

गणेश विसर्जनादरम्यान मुंबईतील समुद्रात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र मुंबईच्या समुद्रात दरवर्षी काही अपायकारक मासे आढळतात. त्यामुळे गणपती मूर्ती विसर्जन करताना मुंबईकरांनी कोणती विशेष काळजी घ्यावी, याबद्दलच्या सात सूचना मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आल्या आहेत. तसेच अनंत चतुर्दशी दिनी सर्व विसर्जनस्थळी नागरिकांनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या तसेच विसर्जनस्थळी जबाबदारीने आणि सतर्कतेने वागावे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस दलाद्वारे दिल्या जाणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

विसर्जनादरम्यान घ्यावयाची काळजी

१. समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नये.

२. मूर्ती विसर्जनाकरीता महानगरपालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी.

३. अंधार असणा-या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाणे टाळावे.

४. महानगरपालिकेने पोहण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये.

५. समुद्रात किंवा तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अग्निशमन दलाचे जवान, पोलिस किंवा जीवरक्षकांना कळवावे.

६. अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

७. भाविकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात जाऊ देऊ नये.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी भरती आणि ओहोटीवेळी काय काळजी घ्याल?

यंदा अनंत चतुर्दशी दिवशी (दिनांक १७ सप्टेंबर २०२४) समुद्रात सकाळी ११.१४ वाजता ४.५४ मीटरची भरती, सायंकाळी ५.२२ वाजता ०.८६ मीटरची ओहोटी, रात्री ११.३४ वाजता ४.३९ मीटर उंचीची भरती असेल. दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे ५.२७ मिनिटांनी ०.४८ मीटरची ओहोटी, सकाळी ११.३७ वाजता ४.७१ मीटरची भरती, सायंकाळी ५.४९ वाजता असेल. या भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मत्स्यदंशापासून बचाव करा, वेळीच प्रथमोपचार घ्या
मुंबईतील समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या मासे दिसून येतात. या पार्श्वभूमीवर विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच ‘१०८ रूग्णवाहिका’ देखील तैनात करण्यात आली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *