रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पंजाबचा पराभव करुन पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात बंगळुरुनं पंजाबचा 6 धावांनी पराभव केला. बंगळुरुनं दिलेल्या 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 185 धावांचीच मजल मारता आली.
या विजयासह बंगळुरुचं आणि या संघाचा गेली 18 वर्ष भाग असणाऱ्या विराट कोहलीचं स्वप्न साकार झालं. कृणाल पंड्याने 4 षटकांत अवघ्या 17 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स घेतल्या. तर, रोमारियो शेफर्डने श्रेयस अय्यरला तंबूचा रस्ता दाखवला. त्याआधी कोहलीच्या 35 चेंडूंमधील 43 तर रजत पाटीदारच्या 16 चेंडूंमधील 26 धावांच्या खेळींनी आरसीबीच्या 190 च्या धावसंख्येत महत्त्वाचं योगदान दिलं.
विराट कोहलीची हृदयाला भिडणारी प्रतिक्रिया!
विराट कोहली म्हणाला, हा विजय चाहत्यांसाठी आणि संघासाठी महत्त्वाचा होता, मी प्रत्येक हंगामात जिंकण्याचा प्रयत्न केला आणि शक्य तितके सर्व काही दिले. पण हा दिवस येईल असे कधीच वाटले नव्हते, आम्ही जिंकल्यानंतर भावनिक झालो. एबीडीने फ्रँचायझीसाठी जे काही केले आहे ते जबरदस्त आहे. त्याला सांगितले की, हे जितके तुमचे आहे तितकेच ते आमचे आहे’. त्यामुळे कप उचलून पोडियमवर येण्यास तो पात्र आहे. माझे हृदय बंगळुरूसोबत आहे, माझा आत्मा बंगळुरूसोबत आहे.
पुढे विराट म्हणाला की, आज रात्री, मी बाळासारखी झोपेन. देवाने मला दृष्टीकोन आणि प्रतिभेने आशीर्वाद दिला आहे आणि शक्य तितके मनापासून काम केले. यावेळी लिलावात, लोकांनी आमच्या रणनीतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, पण आमच्याकडे जे होते त्यावर आम्ही समाधानी होतो. व्यवस्थापनाने आम्हाला सकारात्मक ठेवले, खेळाडू अद्भुत होते. हा क्षण माझ्या अनुभवातील सर्वोत्तम आहे.
18 वर्षांची प्रतीक्षा संपली
आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात आरसीबी संघाचे मन तीनदा तुटले. 2009, 2011 आणि 2016 मध्ये, आरसीबी अंतिम फेरीत पोहोचला, परंतु प्रत्येक वेळी विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगत राहिले. 2025 मध्ये, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाचे नशीब बदलले आणि त्यांनी पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली.