वाशिम कारंजा तालुक्यातील सोमठाणा गावात धक्कादायक घटना घडली आहे, गावामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे गावकऱ्यांनी चक्क प्रेत ग्रामपंचायत कार्यालयात ठेवल्याचं समोर आलं आहे. कारंजा तालुक्यातील सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्यामुळे गावकऱ्यांना मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करण्याची वेळ येत असल्याने गावकऱ्यांनी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात ठेवून ग्रामपंचायतच्या कारभाराचा निषेध केल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपासून पावसाने देखील जोरदार हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि गावात स्मशानभूमी नसल्यामुळे गावकऱ्यांनी चक्क प्रेत ग्रामपंचायत कार्यालयात ठेवून निषेध केला आहे.
पावसाळ्यामध्ये मयत झालेल्या व्यक्तीला अग्नी देण्यासाठी गावात कुठेही स्मशानभूमी नसल्यामुळे याचा मोठा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागतोय. गावात दोन स्मशानभूमी या कागदोपत्री आहेत. मात्र, प्रत्यक्षात एक ही कार्यरत नसल्याने या संदर्भात ग्रामपंचायतला गावकऱ्यांनी वारंवार गावात स्मशानभूमीची मागणी करून सुद्धा गेल्या वीस वर्षापासून ग्रामपंचायत लक्ष घालत नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी काल (बुधवारी, ता.10) गावातील एका मयत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयातच नेऊन ठेवल्याने ग्रामपंचायत कार्यालयात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर पोलीसांनी गावात येऊन मध्यस्ती केल्यानंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे. स्मशानभूमी प्रश्न मार्गीलावण्यासंदर्भात प्रयत्न करून त्या लवकरच बांधण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर मृतदेहावर अंत्यविधी करण्यात आली आहे.
20 वर्षांपासून स्मशानभूमीअभावी त्रस्त
गेल्या 20 वर्षांपासून स्मशानभूमीअभावी त्रस्त असलेल्या सोमठाणा गावातील नागरिकांनी अखेर संताप व्यक्त करत काल (बुधवारी) ग्रामपंचायत कार्यालयात थेट मयत व्यक्तीचं प्रेत ठेवून आंदोलन छेडलं. या घटनेमुळे ग्रामपंचायत कार्यालयात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “गावात स्मशानभूमी नाही, यामुळे अनेक वेळा अंत्यसंस्कारासाठी मोकळी जागा शोधावी लागते. ग्रामपंचायतीकडे वारंवार निवेदने दिल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे अखेर मयत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी योग्य जागा उपलब्ध नसल्याने, गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात संताप व्यक्त केला.” या संतप्त नागरिकांच्या भूमिकेनंतर पोलिसांनी घटनास्थळी हजर होऊन मध्यस्थी केली आणि वातावरण शांत केलं. यावेळी ग्रामपंचायतीने लवकरच स्मशानभूमीची जागा निश्चित करून काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी गावकऱ्यांनी सांगितलं की, “आम्ही 20 वर्षांपासून मागणी करत आहोत. आता मात्र ही शेवटची वेळ आहे. यापुढे आम्ही गप्प बसणार नाही. जर वेळेवर काम सुरू झालं नाही, तर आम्ही शांत राहणार नाही.”