अनेकांच्या मनावर राज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

Spread the love

लेखन बुलंद टीम:

मराठी चित्रपटसृष्टीमधून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा शूटिंगला सुरुवातही केली होती. ते अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांच्या समोर आले होते. त्यांना एका कार्यक्रमात सर्व मराठी कलाकारांनी सलामी दिली होती. पण त्यांचं आज निधन झाल्याची अत्यंत दुर्देवी बातमी समोर येत आहे. अतुल परचुरे यांनी वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनमुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे.

अतुल परचुरे यांनी अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील गेल्या काही वर्षांमधील अळी मिळी गुपचिळी, होणार सून मी ह्या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका सकारली होती. तसेच त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केलं आहे.

अतुल परचुरे यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या प्रसिद्ध नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर मराठी प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं आणि त्यांच्या कामाचं कौतुकही केलं.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हळहळले
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत अतुर परचुरे यांच्या निधनच्या वृत्तावर शोक व्यक्त केला आहे. “प्रिय अतुल खरं खरं सांग आयुष्याच्या रंगमंचावरून अशी धक्कादायक एक्झिट घेताना तुझ्यावर, तुझ्या नाटकांवर अलोट प्रेम करणाऱ्या, अनेकानेक भूमिकांचा आनंद घेणाऱ्या रसिकांची तू काहीच पर्वा केली नाहीस. चटका लावून निघून गेलास. तुझ्या गालावरची गोड खळी आणि प्रसन्न हास्याने मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा अतुल परचुरे नावाचा अभिनेता आमच्यात नाही, हे वास्तव स्वीकारणे जड आहे. वेदना देणारे आहे. तुझ्या मराठी मालिका, नाटके आणि चित्रपट, इतकंच नव्हे तर हिंदी मालिका आणि चित्रपटातूनही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या भरोशावर तू जीवघेण्या आजारावर मात केलीस आणि ‘खरं खरं सांग..’ या नाटकातून तू पुन्हा रंगमंचावर दमदार एंट्री केली. तुझ्यातला अभिनेता सगळ्यांनी अनुभविला आणि सायंकाळी ही बातमी खूप धक्का देवून गेली. माझी विनम्र श्रद्धांजली..!!”, अशा शब्दांत बावनकुळे हळहळले.

राजन विचारे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण
ठाकरे गटाचे ठाण्याची माजी खासदार राजन विचारे यांनी अतुल परचुरे यांच्या निधनच्या वृत्तावर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत हळहळ व्यक्त केली आहे. “ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झाल्याचे वृत्त कळले. अतुल परचुरे यांनी नुकतीच कॅन्सर सारख्या मोठ्या आजारावर मात करून नव्या जोमाने प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सुरुवात केली होती पण आज त्यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनमुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली असून परमेश्वर या दु:खातून सावरण्याचे बळ परचुरे कुटुंबियांना देवो व त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना”, असं राजन विचारे म्हणाले आहेत.

निरंजन डावखुरे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण
भाजप आमदार निरंजन डावखरे यांनीदेखील अतुल परचुरे यांच्या निधननंतर शोक व्यक्त केला आहे. “मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने आपली छाप उमटविणारे अभिनेते अतुलजी परचुरे यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. स्व. अतुलजी परचुरे यांना विनम्र श्रद्धांजली. त्यांनी सहजसुंदर अभिनयातून साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांच्या पत्नी सोनियाजी यांच्यासह सर्व कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो”, असं निरंजन डावखरे म्हणाले आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *