महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार रविंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या उपस्थितीत याबाबतचं प्रमाणपत्र रविंद्र चव्हाण यांना देण्यात आलं. दरम्यान, मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात किरेन रिजिजू यांनी मोठं विधान केलं आहे. काँग्रेसने दिलेलं टेन्शन, दोन वेळा झालेला पराभव यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला वेळेआधी सोडून गेले, असं रिजिजू यांनी म्हटलंय.
आंबेडकरांना मानणारा वर्ग काँग्रेसला…
किरेन रिजिजू यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर सकडून टीका केली. तसेच आमचा पक्ष भारतीय संविधानाचा सन्मान करतो, असंही त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना लोकसभा निवडणुकीत भाजपला मत मिळाली नाही. संविधानाला वाचविण्यासाठी भाजपला मत देऊ नका असं आम्हाला सांगण्यात आल्याचं काही दलित बांधवांनी मला सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग कधीही काँग्रेसला मत देणार नाही, असा विश्वास व्यक्त करत काँग्रेसने बाबासाहेबांना अपमानित केलेलं आहे, असा मोठा दावा रिजिजू यांनी केला.
तसेच, बाबासाहेबांना भाजप पुरस्क्रुत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 71 वर्षानंतर पंतप्रधान मोदींनी मला कायदामंत्री केलंय. दलित व्यक्तीला बाबासाहेबांच्या खुर्चीवर बसवण्याची संधी मोदींनी दिली, असं म्हणत त्यांनी मोदींच्या कार्यशैलीचं कौतुक केलं.
…म्हणून बाबासाहेब आपल्याला वेळेआधी सोडून गेले
तसेच काँग्रेसने दिलेलं टेन्शन, दोन वेळा झालेला पराभव यामुळे बाबासाहेब आपल्याला वेळेआधी सोडून गेले, असं मोठं विधान त्यांनी आपल्या भाषणात केलं. संविधान दिवस साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. आम्ही पक्ष आणि देशाच्या संविधानाचा सन्मान करतो, असेही रिजिजू म्हणाले. जीन्स पॅन्ट घालून सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे रवींद्र चव्हाण यांना अध्यक्ष बनवलं आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या निवडीविषयी दिलं.
काँग्रेस नेमकं काय उत्तर देणार?
दरम्यान, आता रिजिजू यांनी केलेल्या विधानानंतर महाराष्ट्रात राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहेत. रिजिजू यांनी केलेल्या या विधानावर काँग्रेस नेमकं काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.