मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघ सध्या कायम चर्चेत आहे. अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाकडून उमेदवार देणार नाही, अशी चर्चा होती. परंतु त्यांनी महेश सावंत यांना उमेदवारी देत माहीममध्ये भगवा फडकलाच पाहिजे असा आदेश दिला. मात्र सध्या माहीममध्ये एक राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
उद्धव-आदित्य ठाकरेंची माहीममध्ये सभा नाही-
माहीम विधानसभा मतदारसंघात सध्यातरी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची कोणतीच जाहीर सभा नसल्याचं समोर आलं आहे. 18 नोव्हेंबरपर्यंतच्या वेळापत्रकात तुर्तासतरी माहीम-दादरमधील जाहीर सभेबाबत कोणताच उल्लेख नाहीय. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरेंचा अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा?
माहीम विधानसभेत ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महेश सावंत यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या 18 नोव्हेंबरपर्यंतचं प्रचार दौऱ्याचं नियोजन समोर आलं आहे. यामध्ये माहिम मतदारसंघात दोघेही येणार नसल्याचं चित्र समोर आले आहे. त्यामुळे काकांची पुतण्याला छुपी मदत आहे का?, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
माहीममध्ये काय घडतंय?
एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांवर टीका करतात. दुसरीकडे त्यांच्यात कौटुंबिक साटंलोटं आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय कारण माहीममधून विधानसभा लढणारे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरे आणि अमित यांचे चुलत भाऊ आदित्य ठाकरे यांच्या तूर्तास प्रचारसभा नसल्याचं चित्र दिसतंय. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या 18 तारखपेर्यंतच्या सभांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दादर-माहिम मतदारसंघासाठी दोघांच्याही प्रचारसभा किंवा रोडशो वगैरे नाहीत.
आदित्य ठाकरेचं संपूर्ण वेळापत्रक-
आदित्य ठाकरे हे मुंबईत 9 नोव्हेंबरला शिवडी, वरळी, 10 नोव्हेंबरला वरळी, भायखळा, 13 नोव्हेंबरला कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व मतदारसंघात आदित्य ठाकरेंची प्रचार सभा असणार आहे. त्यानंतर 15 नोव्हेंबरला चेंबूर, घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, 16 नोव्हेंबरला गोरेगाव, दहिसर, मागाठाणे इथं आदित्य ठाकरेंचा प्रचार दौरा असेल. त्यानंतर थेट 18 नोव्हेंबरला वरळी आदित्य ठाकरेंची प्रचार रॅली असणार आहे.
अमित ठाकरेंचा जोरदार प्रचार-
राजकीय पक्ष आणि उमेदवारांचा प्रचार सर्वत्र जोरदार सूरू आहे. त्यातच मनसेची निशाणी असलेली रेल्वे इंजिन पुढचे काही दिवस दादर माहीम परिसरात रस्त्यावर धावताना दिसणार आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी एका माल वाहू टेम्पोच रेल्वे इंजिन तयार करण्यात आलं आहे. जुन्या पद्धतीचं हे इंजिन तयार करण्यात आलं असून यावरून अमित ठाकरे प्रचार करणार आहेत.