महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर राज्यातून हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध वाढला होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाचा जी.आर. रद्द केला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज मुंबईत संयुक्त विजयी मेळाव्याचे आयोजन केले होते.
जवळपास २० वर्षांनी एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या मेळाव्यात इथून पुढेही एकत्र राहण्याचे संकेत दिले आहेत. याचबरोबर, शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) एक्स अकाऊंटवरही उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर करत त्याला “ठाकरे ब्रँड” असा कॅप्शन दिला आहे.
दरम्यान, ही पोस्ट आणि ठाकरे बंधूंच्या या विजयी मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी, “ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब हयात असतानाच शिवसेनेचे २८८ आमदार निवडून आले असते,” असे विधान केले आहे.