शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या यात्रेत आज कावडधारकांच्या दोन गटांत तुंबळ मारामारी झाली. यात तीन जण जखमी झाले. त्यापैकी दोघांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. शरद सुरेश गुरव (वय ४०, रा. माळशिरस, सोलापूर) व सिद्धू प्रकाश आळगे (वय २४, रा. इंदापूर, पुणे) अशी जखमींची नावे आहेत.
येथील शंभू महादेव यात्रेचा आज मुख्य दिवस होता. कावडी मुंगी घाटातील डोंगरावरून चढवून गडावर आल्या. दरम्यान, इंदापूर, माळशिरस व नातेपुते येथील कावडी पायरी मार्गाने मंदिराकडे जात होत्या. यावेळी श्रीराम मंदिर परिसरात आपल्या गावची कावड पुढे नेण्याच्या कारणावरून तिन्ही कावडीच्या गटातील भाविकांमध्ये चुरस निर्माण झाली. त्यावेळी एकमेकांना धक्काबुक्की झाली.
यावेळी भाविकांनी स्थानिक व्यावसायिकांच्या दुकानातील नारळ उचलून फेकून मारले. त्यानंतर मंदिर परिसरात गेल्यानंतरही कावडी नाचवत असताना दोन्ही गटांत पुन्हा मारामारी झाली. यामध्ये शरद गुरव व सिद्धू आळगे हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर शिंगणापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले, दुसऱ्या एक घटनेत अमृतेश्वर मंदिरानजीक पटवर्धन कुरोली व वाघोली या कावडीधारक भाविकांच्या दोन गटांत कावड नाचवण्याच्या कारणावरून मारामारी झाली. यामध्येही एक भाविक जखमी झाला.