दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे दोघांना २० हजार रुपयांचा दंड आणि चार दिवसांची कैद

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मद्यपान करून वाहन चालविणे पिंपरी-चिंचवड शहरातील दोघांना चांगलेच महागात पडले आहे. शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयाने मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या दोघांना २० हजार रुपयांचा दंड तर, एकाला चार दिवसांची आणि एकाला तीन दिवसांची साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे.दत्तात्रय आतिश टिपरे (वय, २६ रा. साने चौक, चिखली) यांना चार दिवसांची तर राजकुमार गरजुप्रसाद भारती (वय ४५, रा. गणेश मंदिर, नेहरुनगर) यांना तीन दिवसांची साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे.

पिंपरी वाहतूक पोलिसांनी मागील वर्षी दत्तात्रय टिपरे आणि राजकुमार भारती या दोघांवर मद्यपान करून वाहन चालविल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण मोटार वाहन न्यायालय शिवाजीनगर येथे सुनावणीसाठी दाखल करण्यात आले. न्यायालयाने दोघांना दोषी ठरवून दत्तात्रय टिपरे यांना २० हजार रुपये आर्थिक दंड आणि चार दिवसांची साधी कैद तर राजकुमार भारती यांना २० हजार रुपये आर्थिक दंड आणि तीन दिवसांची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहन चालक मद्य प्राशन करुन वाहने येगात तसेच वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून धोकादायकरित्या चालवित असतात. वाहन चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होत असतात. मद्य प्राशन करून वाहन चालविणारे वाहनचालक स्वतःचे तसेच इतरांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण करत असतात. अशा वाहनचालकांना वेळीच प्रतिबंध करणे गरजेचे असल्याने पिंपरी- चिंचवड वाहतूक शाखेमार्फत मद्यपान करून वाहन चालविणा-या चालकांविरोधात शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात येत असतो. याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर म्हणाले, ‘स्वतःच्या व इतरांच्या जीवाच्या सुरक्षे करिता तसेच न्यायालयीन कार्यवाही टाळण्यासाठी वाहन चालकांनी मद्य प्राशन तसेच इतर कोणत्याही स्वरूपाच्या मादक पदार्थांचे सेवन करून वाहन चालवू नये’.

धुळवडीच्यादिवशी मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या २७२ जणांवर खटले
धुळवडीच्यादिवशी ब्रीथ ॲनलायजर यंत्राद्वारे मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीत २७२ वाहनचालकांनी मद्य पिऊन वाहने चालविल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध खटले दाखल केले आहेत. पुढील कारवाई न्यायालयाच्या माध्यमातून केली जाणार आहे. न्यायालयाकडून समज पाठवून मद्यपी चालकांना बोलावून घेतले जाईल. दंडात्मक किंवा वाहन परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *