मुंबानगरीतील दहिसर पश्चिम एम.एच.बी पोलीस ठाण्याच्या (Police) हद्दीतील गणपत पाटील नगर परिसरात दोन कुटुंबात तुफान हाणामारीची घटना घडली आहे. दोन कुटुंबातील या भांडणात चक्क चाकू आणि कोयताने एकमेकांवर जोरदार हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जुन्या वादातून दोन कुटुंबीयांतील मारहाणाच्या घटनेचं गंभीर गुन्ह्यात रुपांतर झालंय. या घटनेत 3 जण जागीच ठार झाले असून 4 जण गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
हमीद शेख (वय 49 वर्षे), रमणलाल गुप्ता (वय 50 वर्ष) आणि अरविंद गुप्ता (वय 23 वर्ष) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे असून हे सर्व गणपत पाटील नगर मधील रहिवाशी आहेत. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आज दोन्ही बाजूने तुफान राडा झाला होता. याच राड्यामध्ये गणपत पाटील नगर परिसरात असलेला दुकानदारांकडून चाकू आणि कोयता घेऊन दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये, तीन जणांचा जीव गेला असून 4 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी, सध्या एम.एच.बी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम एच बी पोलीस ठाणे गणपत पाटील नगर या झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या शेख व गुप्ता परिवारांमध्ये 2022 मध्ये क्रॉस गुन्हे दाखल होते. तेव्हापासून त्यांचे वैमनस्य आहे. आज रोजी 4.30 वाजेच्या सुमारास गणपत पाटील नगर गल्ली नंबर 14 चे रस्त्यावर राम नवल गुप्ता याचा नारळ विक्री स्टॉल समोर अमित शेख हा दारू पिऊन आलेवर त्यांचेत वाद सुरु झाले. दोघांनी आपले मुलांना बोलावले. त्यानंतर, गुप्ता त्याची मुले अमर गुप्ता, अरविंद गुप्ता व अमित गुप्ता यांची आणि हमीद नसिरुद्दीन शेख, त्याची मुले अरमान हमीद शेख व हसन हमीद शेख यांच्यामध्ये हाताने व धारदार शस्त्राने मारामारी झाली. सदर मारहाणीमध्ये राम नवल गुप्ता (वडील) व अरविंद गुप्ता हे मयत झाले असून अमर गुप्ता व अमित गुप्ता जखमीआहेत. तसेच हमीद शेख (वडील) हा सुद्धा मयत झाला असून त्याचा मुलगा अरमान शेख व हसन शेख जखमी आहे. शताब्दी हॉस्पिटल येथून मृतदेह PM करिता पाठवले आहेत. क्रॉस खुनाचे गुन्हे दाखल करन्याचे काम सुरु असून आरोपी जखमी असल्याने अटक बाकी आहे.