दिल्लीत एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. दक्षिण दिल्लीतील नेब सराय भागात एका घरातील तीन जणांची चाकूने हत्या करण्यात आली. ज्यात एक पुरुष, त्याची पत्नी आणि मुलीचा समावेश आहे. कुटुंबातील चौथा सदस्य असलेला त्यांचा मुलगा फिरायला बाहेर पडल्याने तो वाचला. दिल्ली पोलीस सध्या घटनास्थळी उपस्थित असून या प्रकरणाचा तपास करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या घटनेबाबत पोलीस मुलाची चौकशी करत आहे. सकाळी फिरायला गेल्याचे मुलाने सांगितले. घरी वडील, आई आणि बहीण होते. तो घरी परतला तेव्हा तिघांचेही रक्ताने माखलेले मृतदेह घरात पडले होते. तिन्ही सदस्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर दक्षिण दिल्लीतील नेब सराय भागात लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुढील तपास सुरु असल्याचे पोलीस अधिकारींनी सांगितले आहे.