सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ (Mohol) तालुक्यात रविवारी भाविकांच्या एका बसचा आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये (Solapur Accident) तिघांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे. देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोलापूर-पुणे महामार्गावरील कोळेवाडी येथे हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोळेवाडी येथील रस्त्यावर एका कंटेनरची दुचाकीशी धडक झाली. त्यानंतर हा कंटेनर राँग साईडला गेला आणि मिनी बसला जाऊन धडकला. कंटेनर वेगात असल्यामुळे त्याची धडक बसताच मिनी बस पलटी झाली. त्यामुळे अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले.
यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातात दुचाकीस्वार दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.