कोरोगाव भीमा येथे आज (1 जानेवारी) म्हणजेच नववर्षच्या पहिल्याच दिवशी 207 वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हजारो अनुयायी उपस्थित आहेत. ज्यामध्ये अजित पवार, दत्ता भरणे, अॅड. प्रकाश आंबेडकर आणि अनेक मान्यवरांचा समावेश आहे. येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि संबंध देशभरातील राज्यांमधून असंख्य अनुयायी दाखल झाले आहेत. अवघे जग नववर्षाचा पहिला सूर्योदय पाहात असताना हे अनुयायांनी मात्र या कोरेगाव भीमा येथे सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था
कोरोगाव भीमा येथील विजयस्तंभाचे दर्शन घेण्यासाठी राजकीय नेत्यांसोबत सामान्य जनताही मोठ्या उत्साहात हजर झाली आहे. ज्यामुळे येथील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी दरवर्षीच मोठ्या प्रमाणावर अनुयायांची गर्दी असते. त्यामुळे पोलीसफाटाही मोठ्या प्रमाणावर तैनात केले जातो. 1 जानेवारीला कोरेगाव भीमाच्या वर्धापन दिनानिमित्त होणारा कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आला आहे. यामध्ये 4,500 सुरक्षा कर्मचारी, 120 एकर पार्किंग क्षेत्र, सुमारे 380 PMPML बस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची समर्पित टीम यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला राज्य आणि देशभरातून अभ्यागतांची लक्षणीय गर्दी होईल अशी अपेक्षा आहे.
कोरेगाव भीमा येथे अनुयायांची गर्दी
अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर एक्स पोस्टद्वारे प्रतिक्रिया देताना म्हटले की, भीमा-कोरेगाव शौर्य दिवस हा आपल्या पूर्वजांच्या जातीय अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात एक पाऊल पुढे टाकण्याची आठवण आहे. तब्बल 500 (499 महार आणि 1 मातंग) सैनिक आणि अलुतेदार सैन्याने त्यांच्या ब्राह्मणवादी पेशव्यांच्या शासकांवर केलेल्या विजयापासून प्रेरणा घ्या. त्यांच्या पराक्रमाची सकारात्मक आठवण ठेवा आणि बाबासाहेबांना जे हवे होते तेच स्वतंत्र आंबेडकरी राजकीय आकांक्षेचे प्रतीक म्हणून वापरा. आज आणि नजीकच्या काळात तुम्ही जयस्तंभाला भेट द्याल तेव्हा सैनिकांचा सन्मान करा आणि बाबासाहेबांच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपले मत द्या – एक स्वतंत्र आंबेडकरवादी राजकीय शक्ती.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा समर्थकांना संदेश
दरम्यान, भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतूक मार्गातही बदल केला आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी वाहतुकीचे विशेष नियोजन केले आहे.