राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्याने त्याच्याच जन्मदात्री आईला अमानुषपणे बेदम मारहाण केली आहे. पदाधिकाऱ्याने हा आरोप फेटाळला असला तरी त्याच्या आईने मात्र समोर येऊन आपबिती कथन करत मुलाचं पितळ उघडं पाडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष मारुती देशमुख याच्यावर आईला मारहाण केल्याचा आरोप आहे. मारुती देशमुख यांनी आईला बेदम मारहणा केल्याने त्या महिल्चेया पाठीवर, हातावर तसेच मानेवरही मारहाणीचे व्रण उठले आहेत.
मारूती देशमुख यांची नुकतीच मावळ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कार्ला येथील आई एकविरा देवी ट्रस्टचं विश्वस्त पद ही त्यांच्याकडे असल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आईला मारहाण केली होती असा आरोप आहे. मात्र आपण आईला मारल्याचा खोटा बनाव रचत माझ्या लहाने भावाने, राजेंद्र देशमुखने गुन्हा दाखल केला, पण आपण मारहाण केली नाही असा दावा मारूती देशमुखनी केला आहे. मला अजित दादांनी पद दिलं म्हणून मला बदनाम करण्याचा हा डाव आहे. उलट आमदार सुनील शेळकेंचा माझ्यावर विश्वास आहे. असा खुलासा मारुती देशमुखांनी केला.
पण मुलाचे हे वक्तव्य ऐकल्यावर ती माऊली स्वत:पुढे आली आणि मुलाचे पितळ उघडे पाडत सर्व आपबिती कथन केली.
जन्मदात्या आईलाच मुलाकडून मारहाण
देशमुख यांची आई सात-आठ महिन्यांपूर्वी मारुती आणि दुसरा मुलगा विलास देशमुखांकडे राहायला आल्या, त्याआधी त्या पुण्यात राहणारा लहान मुलगा राजेंद्र देशमुख यांच्याकडे राहत होत्या. मात्र, आता मूळगावी देवघर या ठिकाणी जायचा हट्ट धरला आणि त्या तिथं राहायला आल्या. मात्र, आपली आई घरी राहायला आली हे मारुती देशमुख आणि कुटुंबियांना आवडलं नाही, रुचलंही नाही. मग आपली आई ही पुण्यात लहान भावाकडे परत जावी, म्हणून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला, असा आरोप लहान मुलगा राजेंद्र यांनी केला आहे. यातूनच दोन दिवसांपूर्वी मारुती देशमुखांनी आईला बेदम मारहाण केली.
मात्र मारुती यांनी हे आरोप फेटाळले. पण त्यानंतर त्या महिलेने पुढे येत सर्व कहाणी कथन केली. पोटच्या मुलाची अब्रू वाचवण्यासाठी मी मूळगावी आले पण मुलाने मात्र माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला. कार्ला येथील आई एकविरा देवी ट्रस्टचे उपाध्यक्ष पद ही मारुती देशमुखांकडे आहे. मात्र स्वतःच्या आईवर ते अन्याय करत असल्यानं चहुबाजूंनी त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
खरं तर अजित पवार अशा समर्थकांना खपवून घेत नाहीत, ते जाहीरपणे असं बोलून ही दाखवतात. मात्र प्रत्यक्षात अजित दादा तशी कृती करताना काय दिसत नाहीत. म्हणूनचं मारुती देशमुखांवर अजित दादांनी कारवाई करण्याची मागणी बंधू राजेंद्र देशमुखांनी केलाय. त्यामुळं आता अजित पवार कठोर पावलं उचलत मारुती देशमुखांची पक्षातून हकालपट्टी करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.