आयपीएलमधून प्रसिद्ध झालेला भारतीय क्रिकेटपटू यश दयाल (Yash Dayal) एका मोठ्या वादात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील गाझियावाद येथील एका तरुणीने त्याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते.सदर प्रकरणी यश दयालवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र आता यश दयालच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशमधील गाझियावाद येथील एका मुलीने यशवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात यशला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. पण आता आणखी एका प्रकरणामुळे यश दयालच्या अडचणी वाढणार आहेत. कारण आता जयपूरमधील एका तरुणीने यश दयालवर अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत.
आता जयपूरमध्येही यश दयालविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल-
जयपूरमधील एका मुलीने यश दयालवर सांगानेर सदर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यश दयालने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे आमिष दाखवून आणि तिच्यावर भावनिक दबाव आणून सुमारे दोन वर्षे तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप मुलीने केला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी ती 17 वर्षांची होती.
आयपीएल खेळण्यासाठी जयपुरला आला अन् अत्याचार केला-
पोलिसांनी या प्रकरणात बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत (POCSO कायदा) गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की, यश दयाल आयपीएल 2025 दरम्यान जयपूरला आला तेव्हा त्याने मुलीला सीतापुरा येथील एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. सदर पीडितेने 23 जुलै रोजी तक्रार दाखल केली.
उत्तर प्रदेशमधील महिलेची तक्रार काय?
उत्तर प्रदेशमधील तक्रारदार महिलने तक्रारीत म्हटलं आहे की, गेल्या पाच वर्षांपासून मी यश दयालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. लग्नाच्या बहाण्याने माझे भावनिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केले जात आहे. यश दयालने मला त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली आणि नेहमीच माझ्यासोबत पतीसारखा वागला. त्यामुळे मी त्याच्यावर विश्वास ठेवू लागली. जेव्हा फसवणूक माझ्या लक्षात आली आणि तिने विरोध केला तेव्हा मला मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर माझा मानसिक छळही करण्यात आला. या प्रकरणाची कायदेशीर पद्धतीने लवकरात लवकर आणि निष्पक्षपणे चौकशी करावी. हे पाऊल केवळ तिच्यासाठीच नाही तर अशा संबंधांना बळी पडणाऱ्या सर्व मुलींसाठी महत्त्वाचे आहे, अशी मागणीही सदर महिलेने केली आहे.
यश दयालची कारकीर्द-
27 वर्षीय यश दयालने सप्टेंबर 2018 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये यूपीसाठी लिस्ट-अ मध्ये पदार्पण केलं. त्याच वर्षी या युवा खेळाडूनं रणजी करंडकातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर यश दयाल फेब्रुवारी 2019 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीद्वारे यूपीसाठी टी-20 पदार्पण करण्यात यशस्वी झाला.