नवी मुंबईमध्ये ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या नावाने ही गृहनिर्माण योजना जाहीर;वाचा सविस्तर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

सिडकोतर्फे 11 ऑक्टोबर 2024 रोजी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला 26,000 घरांच्या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला. सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये 67,000 घरे (सदनिका) बांधण्यात येत आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 26,000 घरांकरिता ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या नावाने ही गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. सदरची घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांकरिता नवी मुंबईतील खारघर, खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसर, मानसरोवर, पनवेल, तळोजा व उलवे नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

तीन टप्यांत राबवली जाणार सोडत
या महागृहनिमाण योजनेचे तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात अर्ज नोंदणी व कागदपत्रे सादर करणे, दुसऱ्या टप्प्यात बुकिंगच्या रकमेचा भरणा व सदनिकांकरिता पसंतीक्रम देणे आणि तिसऱ्या टप्प्यात सोडतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नवी मुंबईसारख्या पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असलेल्या शहरात घर घेण्याची संधी या योजनेद्वारे चालून आली आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

दोन गटांमध्ये होणार सोडत
सिडको महागृहनिर्माण योजना-गट ही योजना सर्वांसाठी घर’ या संकल्पनेवर आधारित आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न असलेल्या समाजघटांना निश्चित किंमतीत परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. योजनेत दोन आर्थिक गट समाविष्ट आहे. पहिला गट हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आहे. तर दुसरा गट हा अल्प उत्पन्न गट (एलआयजी) असेल. या दोन्ही गटांमधून अर्ज करण्यासाठी वेगवेगळे नियम आणि अटी आहेत.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गट
ज्या अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असेल, तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातील असेल. या गटात अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय अर्ज नोंदणीच्या वेळी 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असायला हवे तसेच अर्जदार किंवा त्यांचा, तिचा पती, पत्नी आणि अविवाहित मुले यांना भारतात पक्के घर असू नये. यासह अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात 15 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य असावे. या गटासाठी सरकारकडून 2.5 लाखांचे अनुदान लागू आहे. यामध्ये 1.5 लाख रुपये केंद्र सरकारकडून आणि 1 लाख रुपये राज्य सरकारकडून दिले जातील. सह-अर्जदाराने (पत्नी, आई, आश्रित इ.) यापूर्वीच सरकारी अनुदानाचा लाभ घेतला असेल, तर अर्जदाराला सरकारच्या अनुदानाचा लाभ घेता येणार नाही.

2. अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) नेमक्या अटी काय?
ज्या अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त असेल, तो अल्प उत्पन्न गटातील आहे. अर्जदाराचे वय अर्ज नोंदणीच्या वेळी 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. अर्जदार किंवा त्यांचा, तिचा पती, पत्नी आणि अविवाहित मुले यांच्या नावावर नवी मुंबईत घर नसावे. अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात 15 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य असावे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *