अजित पवारांच्या संपर्कात असलेले पिंपरी चिंचवडमधील हे माजी नगरसेवक करणार ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 अजित पवार यांनी आगामी विधानसभेसाठी पुणे, पिंपरी-चिंचवडवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. अशातच आपली ताकद वाढवण्यासाठी अजित दादा गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नात होते. पण, ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक रवी लांडगे आज अजित पवारांच्या घड्याळाची साथ सोडून उद्धव ठाकरेंची मशाल हाती घेणार आहेत.

 

साधारणतः दोन वर्षांपूर्वी भाजपचा राजीनामा दिल्यापासून लांडगे अजित पवारांच्या संपर्कात होते. लोकसभेत ही लांडगेंनी घड्याळाचा दणक्यात प्रचार केला. मात्र, भोसरी विधानसभेची जागा भाजपला सुटणार असल्यानं आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केलेल्या रवी लांडगेंना महायुतीतून तिकीट मिळणार नाही हे उघड आहे. म्हणूनचं रवी लांडगेंनी महाविकासआघाडीत जाण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

 

अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी आधीचं शरद पवार गटात प्रवेश करत, तुतारीसाठी दावा केला आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळेल, ही शक्यता गृहीत धरून रवी लांडगे मशाल हाती घेण्यासाठी मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत लांडगेंचा प्रवेश होणार आहे.

 

कोण आहेत रवी लांडगे?
माजी विरोधी पक्ष नेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे चिरंजीव, तसेच, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे म्हणजे, रवी लांडगे. भाजप युवा मोर्चाचं शहराध्यक्ष पद त्यांच्याकडे होतं. 2017 च्या महापालिका निवडणुकीत रवी लांडगे बिनविरोध निवडून आलेले एकमेव नगरसेवक होते. गेल्या अनेक वर्षांपासून रवी लांडगे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. तसे, वेळोवेळी त्यांचे प्रयत्न पाहायलाही मिळाले आहेत.

 

दोन वर्षांपूर्वी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर रवी लांडगे अजित पवारांच्या संपर्कात होते. मात्र, भोसरी विधानसभेची जागा भाजपला सुटणार असल्यानं आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या रवी लांडगे यांनी अखेर अजित दादांची साथ सोडून महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. विधानसभेच्या तिकीटासाठी त्यांनी ठाकरेंच्या मशालीची निवड केल्याचं कळतंय. तसेच, आज त्यांचा पक्षप्रवेशही होणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *