काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% कर लादण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता भारताने एक मोठे पाऊल उचलले आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने तीन भारतीय अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले की, भारताने नवीन अमेरिकन शस्त्रे आणि विमाने खरेदी करण्याची आपली योजना पुढे ढकलली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या मालावर कर लादल्यानंतर हे पाऊल उचलले आहे. यामुळे अमेरिकेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
विमाने आणि शस्त्रे खरेदी योजना पुढे ढकलली
रॉयटर्सच्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात ही विमाने आणि शस्त्रे खरेदीची घोषणा करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे अमेरिकेला जाणार होते. मात्र आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ही योजना पुढे ढकलली असल्याचे समोर आले आहे. भारताने अमेरिकन विमाने खरेदी केली असती तर त्याचा फायदा अमेरिकन अर्थव्यवस्थेला झाला असता, मात्र आता भारताने आपली योजना पुढे ढकलल्याने अमेरिकेला फटका बसण्याची शक्यता आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कराबाबत आपली भूमिका बदलली आहे. भारत पहिल्या दिवसापासून अमेरिकेसोबत चर्चा करत आहे. या अहवालाबाबत भाष्य करणाऱ्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, भारतावर शुल्क लावल्याने द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत, त्यामुळे हा संरक्षण करार पुढे ढकलला जाण्याची शक्यता होता, मात्र याबाबत त्वरित निर्णय होईल याची अपेक्षा नव्हती.
50 टक्के कर
अमेरिकेने 29 जुलै रोजी भारतावर 25 टक्के कर लावल्याची घोषणा केली होती. त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी पुन्हा 25 टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला अतिरिक्त कर 21 दिवसांच्या आत लागू होणार आहे. म्हणजेच 27 ऑगस्ट 2025 पासून हा कर लागू होणार आहे. मात्र या तारखेपूर्वी निघून 17 सप्टेंबर 2025 पूर्वी अमेरिकेत पोहोचलेल्या वस्तूंवर हा कर आकारला जाणार नाही. विशेष म्हणजे हा कर इतर सर्व शुल्क आणि करांव्यतिरिक्त असणार आहे, मात्र काही विशेष प्रकरणांमध्ये यात सूट दिली जाण्याची शक्यता आहे.