महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात उष्णतेची लाट सुरु आहे. विदर्भात सूर्य आग ओकत आहे. विदर्भातील शहराचे तापमान प्रचंड वाढले आहे. देशात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातून होत आहे. आता जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर म्हणून चंद्रपूरची नोंद झाली आहे. रविवारी चंद्रपूर शहराचे तापमान ४४.६ अंश सेल्सियसवर गेले. वाढलेल्या तापमानामुळे चंद्रपूर शहरात दुपारच्या सुमारास संचारबंदी सदृश्य परिस्थिती दिसत आहे. शहरात शुकशुकाट दिसून येत आहे. चंद्रपुरात रात्री देखील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे.
चंद्रपूरचा पारा ४४ अंशाच्या वर गेला आहे. यासोबतच हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेच्या इशारा दिला आहे. चंद्रपूरच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुपारी बारा ते चारच्या दरम्यान रस्ते निर्मनुष्य झाले आहे. नागरिक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, दुपट्टे,गॉगल वापरत आहे. वाढलेल्या तापमानामुळे चंद्रपूर महानगरपालिकेने ठिकठिकाणी सूचना फलक देखील लावले आहे. त्यात पुढील काही दिवस उच्च तापमानाचे असणार असून स्वतःची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २२ आणि २३ एप्रिलला विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातील अनेक शहरांचे तापमान ४० अंशाच्या वर आहे. अकोला ४४.३, अमरावती ४४.४, बुलढाणा ३९.६, ब्रह्मपुरी ४४.४, चंद्रपूर ४४.६, गडचिरोली ४२.६, गोंदिया ४२.२, नागपूर ४४.०, वर्धा ४४.०, वाशीम ४२.६, यवतमाळ ४३.६
नाशिकमध्ये नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नाशिकच्या कमाल तापमानात दोन अंशाने घसरण झाली आहे. परंतु उष्म आणि दमट वातावरणामुळे शहरवासीय त्रस्त १८ एप्रिलच्या तुलनेत कमाल तापमानात दोन अंशाने घसरण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमध्येही तापमानाचा पारा ४३°c च्या वरती गेला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हाने जीवाची लाहीलाही होत आहे. गेल्या तीन दिवसांतच पाऱ्याने ४० हून ४५ अंश सेल्सियसपर्यंत मजल मारली आहे. रविवारपासून तीन दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांतील लोकांना घरातून बाहेर पाय काढणे अवघड झाले आहे. हवामान विभागाने सोमवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, नागपूर या शहरांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे
मुंबई आणि उपनगरांत रविवारी सामान्य तापमान गेल्या काही दिवसांच्या तुलनेत अधिक नोंदवले गेले. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीरसह २० राज्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचाही अंदाज
राज्यात उन्हाची तिव्रता आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्याचवेळी काही जिल्ह्यांत हवामान विभागाने तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.